प्रामाणिकपणे कमावणारा असेल तर मुलींनी जास्त नखरे करू नयेत

माझी एक कॉलेजच्या गुणवत्ता यादीत चमकणारी एमबीए करणारी दोस्त. तिच्या आईवडलांनी तिला मनाला मुरड घालून एका सुखवस्तू घरातल्या, वडिलोपार्जित किराण्याचा व्यवसाय करणाऱ्या बारावी पास मुलाशी लग्न करायला तयार हो सांगितले. तिच्या शिक्षणाला साजेसा मुलगा आपल्या जातीत मिळणे शक्य नाही, हे तिच्या आईवडीलांनी पाहिले होते. आईवडलांच्या शब्दाबाहेर कधीच न जाणारी ती मुलगी त्यांच्या याही म्हणण्याला काहिशा नाराजीनेच तयार झाली. लग्न झाले. सासरच्या मागणीनुसार एमबीएचा गाशा गुंडाळला गेला, तिच्या नोकरीचा तर प्रश्नच अस्तित्वात येणे शक्य नव्हते आणि नवऱ्याच्या व्यवसायात बायकोचे काय काम? असे म्हणून त्याही संधीची वाट लावली गेली. सासरच्या पद्धतीनुसार मोठ्ठा घुंघट काढून कोणाला काय हवे काय नको ते बघणे, त्यानुसार घरातली कामे करणे यात तिचा वेळ जायला लागला. सुरुवातीला जरी काहिशी कोमेजली असली तरी नंतर हेच आपले भाग्य समजून तिने तेही मान्य केले आणि मनापासून सगळे करायलाही लागली. आता त्यांच्या लग्नाला २ की ३ वर्षे झाली आहेत पण अजून मूल झालेले नाही. तिच्या सगळ्या तपासण्या करून झाल्या आहेत (माहेरी! हा खर्च आम्ही का करायचा? खोटे नाणे आमच्या पदरी घातले आहे, आता निस्तरा तुमचे तुम्हीच असा सूर) आणि त्यांच्या निष्कर्षातून तिच्यात कसलाच दोष नसल्याचे समोर आले आहे. तिचा नवरा कसल्याही चाचण्या करून घ्यायला तयार नाही कारण तो त्याचा अपमान समजला जातोय त्याच्या घरी. या वैद्यकीय गोष्टींची पुरेशी जाण नसलेले सासरचे लोक मूल न होण्याबद्दल तिलाच दोषी मानत आहेत.. आणि आता त्यांनी गोष्टी घटस्फोटापर्यंत आणून ठेपवल्या आहेत. तिला माहेरी पाठवून दिले आहे. समाजावरचा, आईवडीलनवऱ्यावरचा, समाजाच्या चांगुलपणावरचा विश्वास तर तिचा उडालाच आहे पण स्वतःवरचाही विश्वास ढेपाळला आहे तिचा. अतिशय जबरदस्त नर्व्हस झाली आहे. घरातून बाहेर पडणे दूरच पण ईश्वराच्या भजनी लागली आहे. तिला धीर देऊन या सर्वातून बाहेर कसे काढायचे असा पेच आम्हां दोस्तांसमोर आता पडला आहे. काय मिळाले तिला नखरे न करता आईवडलांच्या म्हणण्यानुसार एका कमावणाऱ्या मुलाशी लग्न करून?

हा नियम सरधोपट लाऊ इच्छित नाही मी पण अशी उदाहरणे अगदी जवळच्या लोकांत घडलेली पाहून ताकही प्यायचे म्हटल्यास फुंकर मारली तर त्यात दोष हा कोणाचा समजायचा?