बहुतेक माणसं बाह्यांगावरून दुसऱ्याची परीक्षा करतात. बाह्यांग आकर्षक, प्रभाव पाडणारं नसेल तर अंतरंगातही काही नसेल असं गृहीत धरलं जातं. त्यात मुद्दाम डोकावायला कोणी जात नाही. पण बाह्यांग प्रभाव पाडणारं असेल तर अंतरंग चांगलं असलंच पाहिजे अशी समजूत करून घेतली जाते. दोन्ही बाबतीत प्रत्यक्ष अनुभव कधी काळी वेगळा आला तर आपली काही चूक तर होत नाही ना अशी शंका येते.
मात्र अंतरंग चांगलं असल्याची खात्री पटल्यास बाह्यांगही चांगलं वाटू लागतं. पण त्याला ज्यास्त वेळ लागतो.
साधारणपणे श्रीमंत माणसाला सर्व सद्गुण चिकटवले जातात. त्याबाबत एक सुभाषित आहे ते असं :
यस्यास्ति वित्तं स नर: कुलीन: स पंडित: स श्रुतवान गुणज्ञ:।
स एव वक्ता स च दर्शनीय: सर्वे गुणा: कांचनमाश्रयंते ॥