जिथे मुला मुलीला एकमेकाची ओळख ही केवळ ( बाह्यओळख ) व्यावहारीक पातळीवरच होते. एकमेकांचा स्वभाव , अंतरंग जाणून घ्यायची संधी यात बहुतेकदा मिळत नाही. त्यामुळे समोरच्याची पात्रता या बाह्यरुपावरच ठरवली जाते जे या पद्धतीत अनिवार्य आहे.
एकमेकांचा स्वभाव, अंतरंग वगैरे खऱ्या अर्थाने, पूर्णपणे वगैरे जाणण्यासाठी आख्खा जन्म पुरा पडत नाही. मग तो ठरवलेला विवाह असो की प्रेमविवाह. मात्र एकदोन गप्पाष्टकांत आणि/किंवा गाठीभेटींत आपला आणि एखाद्या व्यक्तीचा स्वभाव जुळण्यासारखा आहे की नाही याचा बऱ्यापैकी चांगला अंदाज येऊ शकतो, आणि दोघे एकमेकांशी 'क्लिक' होणे, अगदी 'बस, लग्न करेन तर याच व्यक्तीशी' ही स्थिती उभयपक्षी येणे (प्रेमात पडणे यालाच म्हणत असावेत का? खात्री नाही.) हेही शक्य असते. (अनुभवाचे बोल!) त्यातच मग अजिबातच तडजोड करता न येण्यासारखे कोणतेही घटक उभयपक्षी नाहीत याची खात्री या सुरुवातीच्याच गप्पाष्टकांत दोन्ही बाजूंनी मोकळेपणाने बोलून करून घेतलेली असली आणि ते संभाव्य अडथळे अगोदरच दूर करून ठेवलेले असले, आणि बाकी काहीही आले तरी त्याला जोडीने सामोरे जाण्याची उभयपक्षी तयारी असली, तरी तेवढे पुरेसे असते. त्याकरिता दीर्घपरिचयाची आवश्यकता असतेच असे नाही. आणि ही बोलणी व्यावहारिक पातळीवरच व्हावी लागतात, असेही नाही.
माझा आणि माझ्या पत्नीचा परिचय एका वधूवरसूचकमंडळामार्फत झाला. त्या अर्थी तो ठरवून केलेला विवाहच म्हणावा लागेल. उभयपक्षी आमच्या पालकांचा हातभार हा वधूवरसूचकमंडळात जाऊन नाव नोंदवणे आणि त्यानंतर स्थळाची माहिती कळल्यावर आमच्यात संपर्क साधून देणे एवढ्यापुरताच मर्यादित होता. सुरुवातीला फोनवरून एकदा जुजबी गप्पा झाल्यानंतर माझ्या त्यानंतरच्या भारतभेटीत एकदोन गाठीभेटींत दोघांचाही निर्णय पक्का झाला होता. फोनवरील पहिल्या जुजबी संभाषणापासून (ज्या वेळी दोघांनीही त्याचा पुढे फारसा गंभीर विचार केलेला नव्हता) माझ्या भारतभेटीपर्यंतचा काही आठवड्यांचा मधला कालावधी (ज्यात दोघांतही पुन्हा काही संपर्क झालेला नव्हता) वगळल्यास आमचा गप्पाष्टके-गाठीभेटी-साखरपुडा-लग्न हा प्रवास (आता लग्नाची वगळता इतर तारखा आठवत नाहीत, पण) फार तर दोन आठवड्यांत पार पडला असावा. पण निर्णय आमचा दोघांचा होता - पालकांचा त्यात (शिंचे कुठे पळून जातात आणि तास-न्-तास गायब असतात याची चिंता करण्याव्यतिरिक्त) काहीही संबंध नव्हता. (एकदा ठरल्यानंतर अर्थात लग्नापर्यंत मग गाठीभेटींची सत्रे, मित्रमैत्रिणींच्या, गणगोताच्या ओळखी वगैरे प्रकार भरपूर चालू होतेच.) बरे बोलणी व्यावहारिक पातळीवर म्हणावीत तर तशीही फारशी काही झाल्याचे आठवत नाही. म्हणजे "असे नेमके काय विचारायचे असते?" हे माहीत नसणे हीच दोघांचीही मूळ अडचण. त्यामुळे भरपूर इकडच्यातिकडच्या, तुला-काय-आवडते-मी-अमूक-वाचते-अच्छा-तुला-अमूक-कॉमिक-आवडते-का-मी-अमूकतमूक-कॉलेजात-होतो-अरे-मी-अमक्यातमक्या-ठिकाणी-पूर्वी-नोकरी-करत-होते-ना-तिथे-असेतसे-छापाच्या आणि एकंदरीत सूर्याखालील वाटेल त्या विषयावरील गप्पा यांव्यतिरिक्त दुसरे काय करणार? पण यातूनसुद्धा या व्यक्तीशी, व्यक्तीच्या साधारण स्वभावाशी, बोलण्याच्या लकबींशी, आवडीनिवडींशी, एकंदरीत विचार करण्याच्या साधारण पद्धतीशी आपण जुळवून घेऊ शकू की नाही याचा उभयपक्षी जुजबी पण बऱ्यापैकी चांगला अंदाज येतोच येतो. (स्वभावाच्या खाचाखोचा नीट कळायला आयुष्य जाते आणि तसेही लग्नानंतर ते उपलब्ध असतेच. त्यातून मग जे खटके उडायचे ते लग्नानंतर तसेही उडतातच आणि त्या खटक्यांतूनच एकमेकांचा नीट परिचय होतो, आणि असा परिचय खऱ्या अर्थाने लग्नानंतरच सुरू होतो. मग तो प्रेमविवाह असो की ठरवून केलेला विवाह. जोपर्यंत सहजीवनाला सुरुवात होत नाही तोपर्यंत एकमेकांचा असा निकटपरिचय होऊ शकत नाही. मग लग्नाअगोदर कितीही दीर्घपरिचय, हिंडणेफिरणे असले तरी.) आता या बोलण्यात 'व्यावहारिक' ते काय? (नाही म्हणायला "तू पूर्ण शाकाहारी आहेस, आणि मी नाही, यामुळे तुला काही अडचण नाही ना?" हा प्रश्न किंवा "लग्नानंतर तू नोकरी करावीस की नाही हा सर्वस्वी तुझा प्रश्न आहे. व्हिसाच्या नियमांप्रमाणे तूर्तास तुला नोकरी करणे शक्य नाही. पुढेमागे ग्रीनकार्ड मिळाले तर शक्य होईल. ग्रीनकार्ड प्रक्रिया चालू आहे, पण त्याला सद्यपरिस्थितीत किती वेळ लागेल हे माझ्या हातात नाही. माझा सध्याचा व्हिसा संपायला फार मुदत नाही, आणि तो संपायच्या आत जर ती प्रक्रिया पुरेशी पुढे गेली नाही तर कदाचित आपल्याला गाशा गुंडाळून भारतात परतही यावे लागेल आणि मला भारतात एखादी नोकरी शोधावी लागेल. तेवढ्या अवधीत ती प्रक्रिया आवश्यक तेवढी पुढे जाण्याची शक्यता वाईट नाही, पण खात्री देण्यासारखीही नाही. आहे ही परिस्थिती अशी आहे, आणि यावर दोन्ही हाताची बोटे दुमडून आशावादी राहण्यापलीकडे माझे काहीही नियंत्रण नाही. यात तुला काही अडचण आहे का?" अशी स्पष्ट पूर्वकल्पना, या बाबी जर 'व्यावहारिक' या खात्यात मोडत असतील, तर तेवढी 'व्यावहारिक' बोलणी झाली होती खरी. पण तेवढीही व्हायला नकोत काय? 'प्रेमविवाहां'तसुद्धा अशी स्पष्ट पूर्वकल्पना देणे अपेक्षित नाही काय? की 'एवीतेवी प्रेमात आहे, घेईलच सावरून!' असे काही गृहीत धरणे अपेक्षित आहे?)
ठरवून लग्न करताना एकमेकांविषयी मनापासून प्रेम किंवा एकमेकांविषयी आदर नसतो किंवा असूच शकत नाही असे कोणी म्हटले? माझ्या मते प्रेमात पडून लग्न करणे आणि लग्नात पडून प्रेम करणे या दोहोंत तसा फारसा फरक नसावा. किंवा असलाच, तर लग्नात पडून प्रेम करणे हे कांकणभर सरसच ठरावे. कारण ठरवून लग्नात पडताना जाणूनबुजून, आपण नेमके कशात पडतोय याबद्दल शक्य तितक्या खात्रीनिशी, डोळसपणे पडणे शक्य असावे. उलटपक्षी, प्रेम आंधळे असते असेही ऐकलेले आहे. (खात्री नाही; चूभूद्याघ्या!) एकंदरीत, हा 'प्रेमविवाह' म्हणवला जाणारा प्रकार - त्यात वस्तुतः तसे काही गैर नसले तरी - गरजेपेक्षा अधिक 'हाइप' (मराठी?) करून ठेवला गेला आहे अशी अलीकडे माझी धारणा होऊ लागली आहे.
बाकी ठरवून केलेले लग्न हा एक व्यवहार आहे या आपल्या मताबद्दल असे म्हणावेसे वाटते की लग्न हाच मुळात एक व्यवहार आहे. दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या काही विशिष्ट भावनिक, शारीरिक आणि सामाजिक (क्रम हवा तसा लावून घ्यावा.) गरजा पूर्ण करण्याकरिता केलेला तो एक व्यवहार आहे. (व्यवहार नसल्यास अधिकृत शिक्कामोर्तबाचे काही कारण उरते असे वाटत नाही.) अर्थात, या व्यवहारातसुद्धा प्रेम असणे हे महत्त्वाचे आहे याबद्दल वाद नाही. मात्र व्यवहाराच्या पूर्ततेसाठी, व्यवहारानंतर प्रेम असणे हे अधिक महत्त्वाचे की व्यवहाराअगोदर प्रेम असणे हे गरजेचे, हा कळीचा मुद्दा आहे. माझ्या मते, व्यवहारानंतर प्रेम असणे निश्चितच महत्त्वाचे आहे, आणि त्याकरिता व्यवहाराअगोदर ते तसे असण्याची पूर्वअट आवश्यक नसावी. उलटपक्षी, व्यवहारापूर्वी असलेले प्रेम ही व्यवहारानंतरच्या प्रेमाची हमी नाही, असेही निरीक्षण आहे. (लग्नानंतर काही वर्षांनी न पटल्याने मोडलेले प्रेमविवाहही पाहिलेले आहेत.)
असो.