मी कुठेही पुरुषांची बाजू घेतलेली नाही. ते पुरुष आहेत म्हणून त्यांना काहीही करायचा अधिकार नाहीच मुळी. पण आजकाल या सारख्या बातम्या आपण रोजच वाचतो. दुसऱ्याच्या अनुभवाने जर आपण शहाणे होणार नसलो तर आपल्या शिक्षणाचा काय फायदा? आता  राहिला माझ्या मुलीचा मुद्दा. सर्वप्रथम मी माझ्या मुलीला हा धडा दिला असता की अनोळखी माणसांवर विश्वास ठेवायचाच नाही. ज्याला आपण ओळखत नाही त्याच्या बरोबर त्याच्या प्रायव्हेट गाडीतून जाणे हाच मुळी मूर्खपणा आहे. आपण बसमधून किंवा रेल्वेतून प्रवास करतो अगदी पुरुषांच्या डब्यातूनही करतो. तेही आपल्या ओळखीचे नसतात. पण तिथे धोका कमी असतो. कारण त्या गर्दीत प्रत्येकाची मानसिकता विकृत नसते. आपल्याला मदतही मिळू शकते. याचा अर्थ असा मुळीच नाही की बाई एकटी दिसली की पुरुषांनी तिचा गैरफायदा घ्यावा. पण आजकाल ही वृत्ती बोकाळलेली दिसते हे तर तुम्ही मान्य कराल की नाही आकांक्षाताई? आता एक सांगते आकांक्षाताई, मला मुलगी नाही. पण माझ्या बहिणीला तीन मुली आहेत. तिच्या यजमानांची बदली पूर्ण भारतातच नाही तर नेपाळलाही झाली होती. त्यावेळी तिच्या मुली अनुक्रमे १०, ६ आणि ३ वर्षांच्या होत्या. त्यांना सेंट्रल स्कूलमध्ये जावे लागत होते. शाळा घराजवळ नव्हती. पण त्यांना तिने स्पष्ट सांगितले होते की चांगल्या कपड्यात असला तरी कोणत्याही अनोळखी माणसावर विश्वास ठेवायचा नाही. काही प्रॉब्लेम आला तर शाळेतच थांबायचे.ती जेव्हा बंगलोरला होती तेव्हा  एकदा खूप पाऊस पडत होता.माझी मोठी भाची त्या दिवशी शाळेत गेली नव्हती. दुसरी भाची एकटीच होती. धुवांधार पावसात ती अर्ध्या वाटेत अडकली. ती एका झाडाखाली उभी राहिली. (ही गोष्ट १९७८/७९ ची आहे तेव्हा मोबाईलच नाही तर तिच्या घरी फोनही नव्हता. ) तिथून जाणाऱ्या एका माणसाने तिला बघितले. तो तिच्याजवळ गेला. तिला नाव पत्ता विचारून घरी सोडतो म्हणाला. पण तिने नावही सांगितले नाही आणि त्याची मदतही साफ नाकारली. त्यावर तो म्हणाला की मी वाईट माणूस नाही. माझ्यावर विश्वास ठेव. बघ मी किती चांगले कपडे घातले आहेत. पण ती त्याला म्हणाली " माझ्या आईने मला सांगितले आहे की कोणावर विश्वास ठेवायचा नाही. मी तुमच्या बरोबर येणार नाही. माझी आई येईल." शेवटी तो माणूस तिच्यापासून थोड्या अंतरावर जाऊन उभा राहिला. जेव्हा माझी बहिण तिथे पोचली तेव्हा त्याने स्वतः तिला सांगितले की तुम्ही मुलीवर फारच चांगले संस्कार केले आहेत. मी तिला खूप पटवायचा प्रयत्न केला की मी वाईट माणूस नाही पण ती माझ्यावर विश्वास ठेवायला तयार नाही. ती एकटी होती म्हणून मी लांबून तिच्यावर लक्ष ठेवून होतो. आता मला सांगा आकांक्षाताई यात माझ्या बहिणीने काय वाईट शिकवण दिली होती? ६ वर्षांची चिमुरडी हे करू शकते तर आजची विवाहित तरुणी का नाही? तेव्हा हे प्रकार इतके सर्रास होतही नव्हते. आज त्या तीनही मुली आपापल्या क्षेत्रात आघाडीवर आहेत.  पुरुषांची आजची मानसिकता बदलली आहे त्याला तुम्ही आम्ही काय करू शकतो?