तुमचा मुद्दा नीट कळतो आहे, असे वाटते. पण तरीही या व्यवहारात काही गैर असावे, असे वाटत नाही.
मुळात, व्यवहार = केवळ आर्थिक परिस्थिती हे समीकरण तितकेसे बरोबर नाही. पगार/कमाई याबद्दलच्या अपेक्षांना मी व्यवहराचे/चा एक उदाहरण/प्रकार म्हणू शकेन. तुम्ही म्हटल्याप्रमाणे रंग-रूप, उंची-जाडी, जातपात याबद्दलच्या अपेक्षा ही व्यवहाराची आणखी काही रूपे. त्याहूनही(मला वाटणारे) महत्त्वाचे घटक म्हणजे एकमेकांचे करिअर, जीवनशैली यांविषयीची बरेच वर्षांपासून पाहिलेली स्वप्ने/आखलेले बेत (लाँग टर्म गोल्स?) यांबद्दलच्या अपेक्षा. आता या व्यावहारीक अपेक्षांमध्ये (नि पर्ययाने व्यवहारात) नेमके गैर ते काय? उदा. अमेरिकेत स्थायिक न होता भारतात कायमचे परतणे, ही माझी निवड आहे; त्यामागे एक विशिष्ट, निश्चित विचार, उद्दिष्ट आहे; तर माझ्या निवडीशी नि विचारांशी पूर्ण फारकत असलेली मुलगी (उदा. जिला अमेरिकेत कायमस्वरूपी रहायचे आहे, स्थायिक व्हायचे आहे. ) माझी सहचारिणी होणे अव्यवहार्यच नाही काय? मग अशा वेळी व्यवहार्य विचार करणे स्वाभाविक नाही काय? त्यामुळे या व्यवहार्य गोष्टी नि अपेक्षांबद्दल एकमत झाल्यावरच लग्नाच्या दृष्टीने आलेल्या स्थळाचा विचार होणे, हे गैर नक्कीच नाही.
किंबहुना मला तर वाटते प्रेमविवाहाप्रमाणेच ठरवून केलेल्या लग्नातही दोन्ही बाजूंना जोडीदाराची निवड करण्याचा आणि त्यासाठी आलेले स्थळ ठराविक निकषांवर/अपेक्षांवर तपासून पाहण्याचा अधिकार मिळतोच. ही स्तुत्य बाब आहे. पूर्वीच्या काळी (नि आजही काही विशिष्ट समाजांमध्ये) हा अधिकारही मिळत नसे/नसतो. आता यात सापेक्षता इतकी आहे की कोणत्या अपेक्षा अवास्तव आहेत नि कोणत्या वाजवी आहेत, हे व्यक्तीनुरूप ठरते.
थोडक्यात, तुम्ही ज्याला व्यवहार म्हणता, त्यात मला काही गैर वाटत नाही. जोवर कोणतीही एक बाजू आपल्याच अपेक्षांच्या पूर्ततेची अपेक्षा धरून, समोरच्या बाजूवर त्यासाठी बळजोरी करून/दबाव आणून कोणाचीही घुसमट होऊ देत नाही, तोवर गैर काहीही नाही. अपेक्षांच्या उतरंडीमध्ये दोन्ही बाजूंच्या ज्या किमान, दोन्ही बाजूंना पटणाऱ्या व्यवहार्य अपेक्षांवर दोन्ही बाजूंचे एकमत झाले आहे; आणि ज्यांवर पूर्ण एकमत झालेले नाही, परंतु त्यांना मुरड घालण्याची किंवा अगदी त्या बदलण्याचीही तयारी आहे, व त्याबद्दलचे ढोबळ बेतही आखले गेले आहेत/जाणार आहेत, अशा पायाभूत व्यवहारावर लग्न, संसार व सहजीवनाचा डोलारा उभरला जाणेच इष्ट, असे माझे मत आहे. हा पाया शक्य नि आवश्यक तितका मजबूत असला, की समस्या नि त्रास कमी होतात - मग तो प्रेमविवाह असो किंवा ठरवून केलेले लग्न. प्रेमविवाहात असा काही व्यवहार नसतो, हे बाकी मला मान्य होत नाही अगदी उत्पन्न/पगार याबद्दलचा नसला तरी खाली टग्यांनी म्हटल्याप्रमाणे शारीरिक, भावनिक, सामाजिक इ. गरजांबद्दलचा असावाच!