सतीश साहेब.....
शिवाजी जवरेंची ही गझल वाचा.....   लगागागा ४ ह्या वियद्गंगेत रचलेली एक चांगली रचना आहे..... खास आपल्यास्तव इथे देतो आहे.


कुणाच्या 'बा'सही नाही कळे-१२ मतिवाला
पडे-लोळे तरीही ना मळे-१२ मतीवाला.

कसाही वाजवी पावा कधी उजवा कधी डावा
जिथे लोणि दिसे तेथे वळे-१२ मतीवाला

तसा हा लाल किल्ल्याच्या उभ्या दारात ना मावे
प्रसंगी चाळणीतुनही गळे-१२ मतीवाला

उभ्या ओसाड या रानी बघा तो दावतो पाणी
म्हणे खोट्या तरंगांना-तळे-१२ मतीवाला

उसाला नी कपाशीला किती मी घाम शिंपावा?
करे मिर्ची न खुर्चीचे खळे १२-मतीवाला

सकाळी फेकुनी देतो दुपारी वेचुनी घेतो
पुन्हा रात्री वडे त्याचे तळे-१२ मतीवाला

कधीचे बांधुनी आहे बघा बाशिंग गुडघ्याला-
कधी भरती म्हणे घटका-पळे-१२ मतीवाला

कधीचे लोटतो आम्ही-बघा दिल्लीकडे याला
फिरुनी हा इथे वाळू दळे-१२ मतीवाला

विदेशिचा नको गुत्ता म्हणे मी काटला पत्ता-
पुन्हा का त्याच वाटेने पळे-१२ मतीवाला?

--शिवाजि जवरे...."आवेग " गझल संग्रह्,किर्ति प्रकाशन्,औरंगाबाद-२००४

कैलास गायकवाड