गेले आठ दिवस वर्तमानपत्रात बलात्कारांच्या विविध बातम्यांनी नुसता धिंगाणा घातलाय :
सरकारी पदाधिकारी असलेल्या महिलेवर ती पर्यटन करून परतत असताना तिची गाडी अडवून, तिच्या पतीला व मुलाला बाहेर काढून चार गुंडांनी तिला गाडीसकट पळवले व तिच्यावर बलात्कार केला.

एका चाळीस वर्षे वयाच्या महिलेला तिच्या मुलाच्या नेहमी घरी ये-जा असणाऱ्या मित्राने तुमचा मुलगा दारू पिऊन रस्त्यात पडलाय असे सांगितल्यावर व मी तुमच्याबरोबर गाडी घेऊन त्याला घरी आणायला येतो सांगितल्यावर त्या महिलेने त्या मुलावर विश्वास ठेवला. परिणाम? त्याने तिच्यावर आडरस्त्याला गाडी नेऊन बलात्कार केला.

आर्मी जवानांनी एका तरुण युगुलातील मुलाला खड्ड्यात फेकून दिले व मुलीला जवळच्या मोकळ्या जागी नेऊन बलात्कार केला.

दोन मुलींना त्यांच्या वर्गमित्रांनी काही बहाण्याने एका मित्राच्या घरी नेऊन त्यांच्यावर अन्य अनोळखी दोन माणसांसह बलात्कार केला!

आता ह्या सर्व उदाहरणांवरून असा निष्कर्ष काढायचा का, की मुली-स्त्रियांनी घराबाहेर पडूच नये, कारण कोण, कधी, कसे, केव्हा, कोणत्या निमित्ताने त्यांचा गैरफायदा घेईल ह्याची सुतराम खात्री नाही? बाहेर पडल्यावरही त्या सदैव गर्दीच्याच भागात कशा काय राहू शकणार? दिवसाढवळ्या जिथे बलात्कार होतात तिथे कोणतीच स्त्री सुरक्षित नाही. मग काय प्रत्येक पुरुषाकडे तिने संशयानेच पाहायचे का? आता असेच संशयाचे संस्कार मुलींवर करायचे का? आत्मसंरक्षणासाठी तिने धडे घेतले तरी ती एकावेळी अशी किती जणांशी दोन हात करू शकणार आहे? मग स्त्रीने नक्की करायचे तरी काय? कोणत्याही  प्रकारे प्रोव्होकेटिव्ह वर्तन न करताही, केवळ ती स्त्री आहे म्हणून तिच्यावर असे लैंगिक अत्याचार होतात आणि शिवाय आपण त्या स्त्रीलाच सुनावायचे का, की ती कशी चुकली म्हणून?