सर्वप्रथम, पाश्चात्य जगतापैकी केवळ उत्तर अमेरिकेसंबंधी (मुख्यतः संयुक्त संस्थानांसंबंधी आणि अत्यल्प प्रमाणात कॅनडासंबंधी) अनुभव असल्यामुळे तेवढ्याच संदर्भाआधारे बोलू शकतो, पाश्चात्य जगताविषयी सरसकट विधाने करू इच्छीत नाही.
अमेरिकेत स्त्रियांविरोधी गुन्ह्यांचे प्रमाण भारताच्या मानाने कमी असण्याबद्दल कोणत्याही विद्याच्या आणि विद्याच्या निकषांच्या तपासणीअभावी आणि तुलनेअभावी साशंक आहे, परंतु एकंदर अनुभवावरून स्त्रियांविरोधी गुन्ह्यांकडे (ते घडून गेल्यानंतर) पाहण्याच्या अमेरिकन समाजाच्या एकंदर कलाबाबत आणि दृष्टिकोनाबाबत आपल्या विधानाशी बराचसा सहमत आहे.
मात्र अनोळखी व्यक्तीकडून लिफ्ट घेणे हे कृत्य अमेरिकेतही फारसे निर्धोक मानले जाऊ नये. याचा लिफ्ट मागणाऱ्याच्या किंवा लिफ्ट देणाऱ्याच्या लिंगाशी काहीही संबंध नसावा, तर (स्त्रियांविरुद्धच्याच नव्हे, तर एकंदरीतच) गुन्ह्याच्या शक्यतेशी थेट संबंध असावा. किंबहुना नेमक्या याच कारणास्तव अनोळखी व्यक्तीला लिफ्ट देणे हेसुद्धा अमेरिकेत (लिंगनिरपेक्षतः) धोकादायक मानले जावे, आणि सामान्यतः सजग व्यक्तीने रस्त्यावरच्या कोण्या अनोळखी व्यक्तीला (अशी व्यक्ती कितीही सभ्य किंवा निर्धोक वाटली तरी) लिफ्ट देण्यास कचरण्याकडे कल असावा. आणि रस्त्यावर अडचणीत सापडलेल्या सजग (स्त्री किंवा पुरुष) व्यक्तीनेसुद्धा अनोळखी व्यक्तींकडून लिफ्ट घेणे टाळण्याकडे (आणि लिफ्ट देऊ करणारी अनोळखी व्यक्ती जरी विश्वासार्ह वाटली तरी अशा व्यक्तीकडून फार फार तर पोलिसांना किंवा मदत करू शकणाऱ्या तत्सम अधिकाऱ्यांना संपर्क साधण्याहून अधिक मदत घेण्याचे टाळण्याकडे) कल असावा. किमानपक्षी असे वागणे हे सर्वसामान्य शहाणपण मानले जावे.
कितीही झाले तरी आपल्या (स्त्री असो किंवा पुरुष) संरक्षणाची प्राथमिक जबाबदारी ही आपल्या स्वतःवरच असते, आणि कोणतीही अनोळखी व्यक्ती ही वरकरणी कितीही सभ्य आणि 'सुरक्षित' वाटली तरी केवळ बाह्यस्वरूपावरून त्याची खात्री देता येत नाही. त्यात बंदिस्त वाहनात अनोळखी व्यक्तीबरोबर असणे, मग ते लिफ्ट घेण्यासाठी असो किंवा लिफ्ट देण्यासाठी असो, हे स्वतःस दुसऱ्या व्यक्तीच्या अधीन करण्यासारखे आहे. लिफ्ट देणारा (देणारी) आणि घेणारा (घेणारी) या दोहोंपैकी एक व्यक्ती गुन्हेगारी प्रवृत्तीची असल्यास दुसऱ्या व्यक्तीस ते धोकादायक आहे. याचा दोहोंपैकी कोणाच्याही लिंगाशी किंवा कपड्यांच्या लांबीशी काहीही संबंध नाही. हे भारताइतकेच अमेरिकेतही खरे आहे.
अमेरिकेतही सर्वच भाग हे वाटेल तेव्हा एकट्याने हिंडण्यासाठी (मग ते स्त्रीने असो किंवा पुरुषाने) सुरक्षित आहेत अशातला भाग नाही.
तेव्हा स्त्रियांविरोधी गुन्हा घडून गेल्यानंतर त्याकडे पाहण्याचा अमेरिकन समाजाचा दृष्टिकोन हा भारतीय समाजाच्या तुलनेत कितीही अधिक न्याय्य आणि सहानुभूतिपूर्ण असला, तरी मुळात (कोणत्याही प्रकारच्या) गुन्ह्याला बळी न पडण्याकरिता आवश्यक ती खबरदारी घेणे ही प्राथमिकतः गुन्ह्याला बळी पडू शकणाऱ्या (स्त्री किंवा पुरुष) व्यक्तीचीच जबाबदारी राहते. त्याला कोठेही पर्याय नाही. अमेरिकेतसुद्धा!
बाकी पाश्चात्त्य संस्कृतीबद्दल भारतात अफाट गैरसमज आहेत, आणि अनेकदा भारतीय सामाजिक स्थितीतील दोषांवर पांघरूण घालून 'तरीही आम्हीच श्रेष्ठ' अशी स्वतःचीच पाठ थोपटण्यासाठी असे गैरसमज कामी येतात, नव्हे पुढे केले जातात, ही एक दुर्दैवी परंतु खरी बाब आहे. पाश्चात्त्य देशांत बायका सरसकट सर्वत्र अत्यंत तोकडे, जवळपास नाहीतच असे, 'उत्तान', 'भडक' वगैरे कपडे घालून सर्रास हिंडत असतात अशी काहीशी समजूत असते की काय कोण जाणे. आता समुद्रकिनाऱ्यावर कोणी पायघोळ कपडे घालून जात नाही हे खरेच आहे (आणि का जावे? ), परंतु अमेरिकेतील अठरा वर्षांच्या आजवरच्या माझ्या वास्तव्यात मी रस्त्यावर नग्नपणे किंवा केवळ अंतर्वस्त्रांनिशी भटकणारी स्त्री पाहिलेली नाही हेही तितकेच खरे आहे. किंबहुना अशा रीतीने कोणी हिंडल्यास त्याकडे अमेरिकन समाजही फारशा सहानुभूतीने पाहणार नाही, आणि बहुधा तो सार्वजनिक सभ्यतेविरुद्ध गुन्हाही ठरेल. परंतु या दोन टोकांमधील एखादी स्थळानुरूप आणि प्रसंगानुरूप उचित वेशभूषा केल्यास त्याबाबत कोणालाच काही गैर वाटणार नाही, आणि अशा स्त्रीकडे हपापलेल्या नजरेने तर निश्चितच पाहिले जाणार नाही.
'स्थळानुरूप आणि प्रसंगानुरूप वेशभूषा' म्हणजे काय, याची व्याख्या अमेरिकेतही विविध भागांत वेगवेगळी असू शकते, परंतु गुढग्यापासून सुमारे चार बोटे वर येऊन संपणारी अर्धी चड्डी (शॉर्ट्स अशा अर्थी) ही स्त्रियांसाठी किंवा पुरुषांसाठी (अमेरिकेच्या बहुतांश भागात कार्यालयीन वेशभूषा म्हणून उचित मानली जात नसली तरी) कार्यालयाबाहेरील वावराकरिता सभ्य वेशभूषा मानली जावी. आणि वास्तविकतः अशा अर्ध्या चड्डीत (मग ती पुरुषाने घातलेली असो किंवा स्त्रीने) 'उत्तान', 'भडक', 'मादक', 'अश्लील' किंवा 'असभ्य' असे काहीही नसते. परंतु याच मोजमापाची चड्डी भारतात एखाद्या मुलीने घातली असता रस्त्यावरच्या बघ्यांच्या नजरेचे तर सोडाच, परंतु सर्वप्रथम संबंधित मुलीच्या वडिलांचे किंवा भावाचे तोंड आंबट होण्याची शक्यता आजही बरीच असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, 'पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणा'च्या किंवा 'फ्याशनी'च्या नावाखाली भारतात अनेकदा कशा प्रकारचे कपडे खपवले जातात किंवा माध्यमांतून नाचवले जातात, याचाही तपास घेणे आवश्यक आहे असे वाटते. बहुधा असे 'पाश्चात्त्य फ्याशनी'च्या नावाखाली खपवले जाणारे बहुतांश कपडे हे पाश्चात्त्य देशांतही आक्षेपार्ह मानले जावेत, किंवा सामान्य समाजात तसे कपडे घालण्याचा फारसा कोणी विचारही करू नये, असा अंदाज आहे. (मोठ्यांचे सोडा, माझ्या मागच्या भारतभेटीत माझ्या शाळकरी वयाच्या मुलासाठी नेहमीच्या वापराकरिता कपडे विकत घेण्याच्या प्रयत्नात असता, दुकानदाराने पुढे केलेले बहुतांश कपडे हे तो शाळेत घालून गेल्यास 'मवाली किंवा ग्यांगस्टर प्रवृत्तीचा मुलगा' म्हणून त्याची शाळेतून हकालपट्टी होईल अशी भीती वाटल्याने ते नाकारावे लागले. आजकाल भारतात शाळकरी वयाच्या मुलांसाठीसुद्धा साधे, सोज्ज्वळ, 'सोबर' कपडे मिळणे दुरापास्त होऊ लागले आहे काय? सगळे लहान मुलांचे कपडे हे चकचकीत, भडक आणि चित्रविचित्र, काहीबाही लिहिलेले, थोडक्यात 'झटॅक' असलेच पाहिजेत काय?)
बाकी सार्वजनिक ठिकाणी घाणेरड्या नजरा, स्पर्श वगैरेंबाबत सहमत आहे. बाकीचे सोडा, सार्वजनिक ठिकाणी पूर्ण भारतीय पेहराव परिधान केलेल्या एखाद्या स्त्रीने नाइलाजास्तव आपल्या मुलास अंगावर पाजावयास घेतले, आणि अगदी वरून पदराने किंवा ओढणीने झाकून जरी घेतले, तरी त्याकडे टक लावून पाहत बसणारा एखादा हीरो आजूबाजूस अनेकदा निघतो. (बाकी सार्वजनिक स्थळांबाबत सोडा, भारताकडेजाणाऱ्या आणि भारतीय प्रवाशांनी खच्चून भरलेल्या विमानांतही असा अनुभव येऊ शकतो. तेथे तर मुलास घेऊन आडबाजूस बसण्याची शक्यतानसते!) अमेरिकेत हा अनुभव येऊ नये. किंबहुना अमेरिकेत याचे कोणाला फारसे वाटूही नये.
त्यामुळे स्त्रियांकडे पाहण्याच्या एकंदर वृत्तीत भारतात अजून खूप प्रगतीची आवश्यकता आहे हे पटण्यासारखे आहे. केवळ कायदे करून हा प्रश्न सुटण्यासारखा नाही, कारण कायद्यांच्या दर्जावर, कायदे करणाऱ्या (स्त्री किंवा पुरुष) व्यक्तींच्या वृत्तीवर आणि कायद्यांच्या अंमलबजावणीची जबाबदारी असणाऱ्या (स्त्री किंवा पुरुष) व्यक्तींच्या त्यातील स्वारस्यावर सर्व अवलंबून आहे. शिक्षणाबद्दल म्हणायचे झाले तर कोण कोणाला शिकवणार आणि कोण कोणाकडून शिकणार हा प्रश्न आहे. शेवटी 'आपली संस्कृती महान' म्हणून 'पाश्चात्य संस्कृती'वर सगळे ढकलून देण्याची पळवाट जोपर्यंत उपलब्ध आहे, तोपर्यंत कठीण आहे.
मात्र, तोपर्यंत (आणि त्यानंतरही) समाजावर विसंबून न राहता स्वतःची सुरक्षितता (स्त्रीने किंवा पुरुषाने) शक्य तितकी स्वतःच सांभाळणे, त्यासाठी सतर्क असणे हे निश्चितच आपल्या हातात आहे.
(आणि या सर्वाचा मुलींच्या किंवा मुलांच्या अवास्तव मागण्यांशी काहीही संबध नाही, हेही तितकेच खरे! )