आकांक्षाताई तुम्ही पुन्हा पुन्हा एकच चूक करत आहात. मी एकच मुद्दा धरून वसले नाही. तुम्हीच तुमचा मूळ लेख पुन्हा एकदा वाचा. मला एवढेच म्हणायचे आहे की ज्या असहाय्य आहेत त्यांना पर्याय नाही. पण थोडासुद्धा विचार न करता अनोळखी माणसांवर विश्वास ठेवण्याचे आजचे दिवस आहेत का? अहो, करणारे घरात शिरूनही काही करू शकतात. म्हणून आपण आपल्या हाताने अनोळखी माणसांना घरात घ्यायचे का? मुळात 'स्त्री ही उपभोग्य वस्तू आहे' ही पुरुषांची मानसिकता जो पर्यंत बदलत नाही तो पर्यंत स्त्री कुठेच सुरक्षित नाही. आणि आज चंगळ्वाद इतका बोकाळला आहे की माणसाला आपण काय करतो याचे भान राहिलेले नाही. तुम्ही पेपरमध्ये वाचताच की आज हे प्रकार करणारी मुले १६ ते २०/२२ या वयोगटातली आहेत. आयुष्यातली आव्हाने पेलून स्वतःला सिद्ध करण्याच्या वयात ही मुले कुठे चालली आहेत? तुम्ही म्हणता तो एक मुद्दा बरोबर आहे की फक्त मुलींना उपदेश करण्यापेक्षा मुलांच्या पालकांनी मुलांची मानसिकता बदलायला हवी आहे. आता एक सांगते. मला २१ वर्षांचा मुलगा आहे. एकुलता एक. पण त्याला चुलत बहिण आहे. ती ही एकुलती एक. मी पूर्वीच त्याला हे सांगितले आहे की जशी घरात तुझी बहिण तशाच बाहेर मैत्रिणी. प्रत्येक नात्याला एक मर्यादा असते. ती पाळली तर कोणतेही नाते वाईट नसते. मुलामुलींचा गृप करून कुठेही बाहेर फिरायला किंवा पिकनिकला जायचे नाही. कोणत्याही मैत्रिणीला आम्ही घरी नसताना घरी बोलवायचे नाही. (त्यांना शाळेनीच एकदा "सातच्या आत घरात" हा चित्रपट दाखवला होता.) मुख्य म्हणजे बहिण ही कोणत्याही नात्याने बहिणच असते. भले मग ती मानलेली असली तरीही. त्यामुळे हे लक्षात ठेव की तुझ्या मैत्रिणी या ही कोणाच्यातरी बहिणीच आहेत. आता तुमचा दुसरा मुद्दा. खेडेगावातील निम्न जातीतील किंवा आदिवासी स्त्रिया यांच्यावर अत्याचार होण्याचे प्रमाण जास्त आहे. याला कारण असे आहे की या स्त्रिया शिक्षित नाहीत. त्यांना स्वतःचे हक्क माहित नाहीत. प्रत्येक गोष्टीत त्या घरातल्या कोणत्या ना कोणत्या पुरुषावर अवलंबून आहेत. नवऱ्याने मारले तर आज किती स्त्रिया पोलिसांकडे तक्रार करतात? ही सुशिक्षितांची अवस्था आहे तर ज्यांच्यावर पिढ्यानपिढ्या पुरुषी वर्चस्वाचे संस्कार केले गेले आहेत त्यांनी पुरुषांना काय तोंड द्यावे? आपल्यावर कुठल्याही कारणाने हल्ला करणाऱ्या पुरुषाचा जीवही घ्यायचा अधिकार स्त्रीला आहे हे किती सुशिक्षितांना माहित आहे? मला एवढेच म्हणायचे आहे की फक्त पुरुषांना दोष देऊन काही फायदा नाही. जेव्हा आपण परिस्थिती बदलू शकत नाही तेव्हा आपण स्वतःला बदलायचे असते.