मला आज येथील नवीन प्रतिसाद वाचताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली : आपल्याकडे आभासी आयुष्यात व प्रत्यक्ष आयुष्यात बरीच मोठी दरी आहे. आज प्रसारमाध्यमे, टीव्ही-चित्रपट-नियतकालिके-फॅशन शोज इत्यादींमधून होणारे स्त्रीचे व तिच्या अंगप्रत्यंगाचे उत्तान दर्शन, तसेच कामभावना चाळवणारी दृश्ये ''प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य''च्या नावाने खपवले जाते. स्त्रीचे असे रूप किंवा एकदम सतीसावित्री रूप. त्याचा इतका भडिमार होतो की मनात स्त्रीविषयी तशीच प्रतिमा निर्माण होऊ लागते. पण त्या आभासी जगाचा प्रत्यक्ष राहणीमानाशी, जीवनशैलीशी, वास्तवाशी असा कितीसा संबंध येतो? रोजच्या आयुष्यात तुम्हाला घरात वा आजूबाजूला बिकिनी घातलेल्या वा अंगप्रदर्शन करणारे तोकडे कपडे घातलेल्या मुली अशा कितीशा दिसतात? (मी मुंबई वा दिल्लीसारख्या शहरांमधील फास्ट लेन बद्दल बोलत नाहीए... तर सर्वसामान्य आयुष्य जगणाऱ्यांविषयी बोलते आहे! ) आपल्या घरातील ''सुसंस्कारित'' वातावरण कोठे आणि चित्रपट, इंटरनेट, नियतकालिके, वर्तमानपत्रांतून दर्शन होणारे ''ग्लॅमरस'', नशीले वातावरण कोठे!!!! एकवेळ सुशिक्षित, सुजाण, समजदार व्यक्ती अशा अवस्थेत स्वतःच्या मनावर, वासनेवर विवेकाने ताबा ठेवू शकतो. किंवा ती भागविण्यासाठी समाजमान्य मार्ग अनुसरू शकतो. पण बाकीच्यांचे काय? जिथे फक्त कामवासनेची भूक असते तिथे स्त्री ''माणूस'' नसते; तर असते फक्त एक शरीर! आणि त्यात भरीस भर घालायला व्यसनांचा सुकाळ!  मला वाटते, केवळ शारीरिक शक्तीत स्त्री दुर्बल पडल्यामुळे किंवा असहाय ठरल्यामुळे अशा परिस्थितीत स्त्रीवर अत्याचार होतात. आता त्यात तिचा ''दोष'' इतकाच की ती कोणत्या तरी कारणामुळे अशा पुरुषांच्या संपर्कात आली !!!!!!

योनिशुचितेला आजही आपल्याकडे समाजात प्रचंड महत्त्व दिले जाते. स्त्रीचे चारित्र्य म्हणजे काचेसमान असते वगैरे वगैरे पाठ आजही घरांघरांतून ऐकायला मिळतात. बदलती गुन्हेगारी परिस्थिती जर नियंत्रणात येत नसेल वा आणता येत नसेल तर असे सांगणे/ मानणे/ समजणे आजच्या काळात कितपत योग्य आहे? बलात्कारित किंवा अत्याचारित स्त्रीविषयी समाजाचा दृष्टीकोन बदलायला हे फार आवश्यक आहे असे मला वाटते. बलात्कारामुळे शरीराबरोबरच स्त्रीच्या मनावरही अत्याचार होतो. पण समाजाने त्याकडे एक ''अपघात'' म्हणून पाहिल्यास तीच स्त्री त्यातून लवकर सावरू शकेल.
 
तसेच शालेय जीवनातच सुयोग्य प्रकारे मुलांना लैंगिक शिक्षण देणे अतिशय गरजेचे वाटते. आजकाल मुलांना माध्यमांमुळे सर्व प्रकारचे नको ते ज्ञान असते. परंतु शास्त्रीय व सामाजिक माहितीवर आधारित लैंगिक ज्ञान देणे, तसेच आपल्या भावनांचे व्यवस्थापन करायला त्यांना शिकवणे ही आता काळाची गरज बनले आहेत.

ज्या समाजात स्त्रीवर एवढ्या प्रमाणात अत्याचार होतात तो समाज सुसंस्कृत वा प्रगत कसा काय होऊ शकतो? कोणावरही आपल्या बलाचा दुरुपयोग करून अत्याचार करणे ही सामाजिक दुष्प्रवृत्ती मिटवण्यासाठी व कमी करण्यासाठी तितकेच ठोस व सकारात्मक सामूहिक प्रयत्न हवेत.
पाश्चात्यांचा चंगळवाद आपल्याकडे रुजला पण प्रत्येक स्त्रीकडे फक्त एक भोगवस्तू म्हणून न पाहता तिच्याकडे ''माणूस'' म्हणून पाहण्याची संस्कृती कधी रुजणार?