'साइनफेल्ड' ही मालिका फारशी पाहिलेली नसल्यामुळे ही केस माझ्या नजरेतून सुटली होती खरी. कबूल.

मात्र, 'क्कुसुम' ही मालिका उपग्रहकृपेने अथपासून इतिपर्यंत बऱ्यापैकी पाहिलेली आहे. त्यातल्या क्कुसुमसारखी तीनतीनदा नवरे बदलून (आणि शेवटच्या बदलात पहिल्याच नवऱ्याकडे परत येऊन) सदा सुहागन राहणारी केस भारतातल्या सव्वीस वर्षांच्या माझ्या वास्तव्यात मी पाहिलेली नाही, हेही तितकेच खरे.

नाही, म्हणजे अशा केसिस भारतात प्रत्यक्षात घडत असतीलही. माझ्याच नजरेतून सुटल्या असतील. नाही म्हणत नाही. पण त्यावरून भारतीय संस्कृतीबद्दल काही सरसकट निष्कर्ष निदान मी तरी काढू शकत नाही.

तसेच, गाणी (इंप्रॉंप्टू [मराठी?] असोत किंवा कोणीतरी अगोदर लिहून दिलेली असोत) म्हणत एकमेकांचा झाडांभोवती पाठलाग करत ठरलेल्या एखाद्या भारतीय विवाहाची केसही माझ्या पाहण्यात किंवा ऐकण्यात आलेली नाही. अर्थात, माझे डोळे आणि कान उघडे नसणे हे याचे कारण असूही शकेल, नाही असे नाही. किंवा, अशा पद्धतीने विवाह ठरवणारे हे आपला विवाह नेमका कसा ठरला हे गुपित माझ्यापासून लपवत असू शकतील, ही दुसरी शक्यता. (चित्रपट काढणाऱ्यांना तेवढे बरे सांगायला जातात!)

किंवा, 'हम दिल दे चुके सनम' या (माझ्या मते अत्यंत टुकार) हिंदी चित्रपटात दाखवल्याप्रमाणे, सवय नसताना मिरच्यांची भजी आणि अन्य गुजराती खाद्यपदार्थांचा भडिमार झाल्याने त्यांच्या अतिसेवनाच्या परिणामातून घडणाऱ्या एखाद्या घटनेच्या* परिणामी एखाद्या मुलीने एखाद्या मुलाच्या प्रेमात पडणे, ही भारतीय मुलींची प्रेमात पडण्याची सर्वसाधारण 'मोडस ऑपरंडी' (मराठी?) असावी, किंवा अशा रीतीने प्रेमात पडणे हा भारतीय संस्कृतीचा - किंवा गेलाबाजार गुजराती संस्कृतीचा - परिपाक असावा, यावर माझा तरी विश्वास बसू शकत नाही. अनुभवींनी खुलासा करावा.

(* 'समीऽऽऽऽऽऽर! हवा का झोंकाऽऽऽऽऽऽ! हीहीहीहीहीही!' आमच्या थेटरातले समस्त एनाराय-गुजराती पब्लिक त्या सीनला पोट धरधरून हसले होते, असे आठवते. अमेरिकेत पिक्चर बऱ्यापैकी चालला. भारतात पडला म्हणतात. ऐश्वर्या राय आम्हाला तेव्हापासून आवडत नाही. असो.)

विवाहातील सप्तपदीचे एकवेळ सोडा, परंतु ज्या विवाहापूर्वी मुलाच्या आईने 'या मुलीशी लग्न करशील, तर इस घर से मेरी अर्थी ही निकलेगी' असा 'निर्वाणी'चा इशारा देण्याचा महत्त्वाचा धार्मिक विधी पूर्ण होत नाही, असा कोणताही भारतीय/हिंदू विवाह हा कायद्याच्या दृष्टीने रद्दबातल ठरावा काय? हिंदू म्यारेज आक्टात असे काही कलम असल्याचे माझ्या तरी माहितीत नाही. अर्थात, माझी कायद्याची माहिती त्रोटक आहे, हे ओघानेच आले.

सांगण्याचा मुद्दा, बॉलीवूडपट किंवा केकता क्कपूरच्या मालिका पाहून ज्याप्रमाणे भारतीय संस्कृतीचे (ही जी काही चीज असेल ती) यथार्थ चित्र मनश्चक्षूंपुढे उभारता येत नाही, त्याचप्रमाणे हॉलीवूडपट आणि साइनफेल्डादि मालिकांच्या आधारावर अमेरिकन किंवा पाश्चात्त्य संस्कृतीबद्दल कल्पना रंगवणे हे फसवे ठरावे.

असो.