ज़या नवरा बाय्कोंची प्रथम भेट , किन्वा 'स्थळ बघणे' हा प्रकार काही व्यावहरीक गोष्टींची पुर्तता होत असेल तरच होते. जसे की मुलासाठी/ मुलीसाठी अमुक एक पगार , वय , जात , रुप , रंग , उंची , जाडी ई. सर्व गोष्टी यात येतात.

'बर्ड्ज़ ऑफ़ अ फ़ेदर फ़्लॉक टुगेदर' या न्यायाने, स्वतःसारख्या व्यक्तींबरोबर एकत्र येण्याची मानवाची प्रवृत्ती ही नैसर्गिक आहे. यात 'स्वतःसारखे'चे निकष काहीही असू शकतात, माणसामाणसागणिक वेगळे असू शकतात आणि एकाहून अधिकही असू शकतात. त्यामुळे वरील उदाहरणात अनैसर्गिक असे काही नाही.

प्रेमविवाहात यापैकी काही प्रस्थापित निकष कटाक्षाने पाळले न जाण्याची शक्यता असते हे वरकरणी मान्य होण्यासारखे आहे, परंतु यातही खरे तर विशेष असे काही नाही. सर्वप्रथम, अशा नियमांच्या चौकटीबाहेर जाणे हा प्रेमविवाहाचा प्राथमिक उद्देश नसावा; उलटपक्षी, प्रथम भेट ही अगोदरच, आणि बहुधा योगायोगाने, झाल्यानंतर दोघेही एकमेकांना वरकरणी अनुरूप वाटल्यास अशा एखाद्या निकषाच्या अपूर्ततेकडे दुर्लक्ष केले जाण्याकडे कल असावा. हेसुद्धा बहुतांश उदाहरणांत होत नसावे, जाणूनबुजून होत नसावे आणि एका मर्यादेपलीकडे होत नसावे.

पुण्याच्या एखाद्या मुलीने एखाद्या केनियन किंवा नायजीरियन मुलाशी किंवा मुंबईच्या एखाद्या मुलीने एखाद्या इराणी, पॅलेस्टीनियन किंवा थाई मुलाशी प्रेमात पडून लग्न केल्याची उदाहरणे तशी विरळा असावीत. (नाही म्हणायला पुण्यातल्या, पुण्यात कायमस्वरूपी राहणाऱ्या काही मराठी पुरुषांनी प्रेमात पडून जपानी स्त्रियांशी विवाह केल्याची काही उदाहरणे पाहण्यातली आहेत, पण ते अपवाद. आणि पुण्यामुंबईच्या मुलींना केनियन/नायजीरियन/इराणी/पॅलेस्टीनियन/थाई मुले मुळात भेटतील कोठे हा प्रश्न फिजूल आहे. मुंबईचे माहीत नाही, पण पुण्यात तरी एकेकाळी फर्ग्युसन किंवा वाडिया कॉलेजांत भरपूर असत; अजूनही असावीत.) किंवा, एखाद्या गर्भश्रीमंत मुलाने, ठरवून किंवा अपघाताने, एखाद्या दारिद्र्यरेषेखालील मुलीच्या प्रेमात पडून लग्न केल्याची उदाहरणे, हिंदी चित्रपटांतून सोडा, परंतु प्रत्यक्षात फार क्वचित घडत असावीत. किंवा, एखाद्या तरुण मुलाने आपल्या आईच्या वयाच्या स्त्रीशी किंवा एखाद्या तरुण मुलीने आपल्या आजोबांच्या वयाच्या पुरुषाशी प्रेमात पडून लग्न केल्याची उदाहरणेही फारशी नसावीत. तेव्हा प्रेमविवाहांतसुद्धा बहुतांशी तथाकथित 'व्यावहारिक निकष' कोणत्या ना कोणत्या पातळीवर, प्रत्यक्ष नाहीतर अप्रत्यक्षरीत्या, पाहिले आणि पाळले जात असावेत, आणि एखाद्या निकषाच्या बाबतीत थोड्याफार प्रमाणात 'आपल्या गटा'बाहेर जात असल्यास त्याकडे दुर्लक्ष केले जात असावे किंवा तेवढी 'सूट' दिलीघेतली जात असावी. आणि हेही जाणूनबुजून केले जात नसावे. आणि जेव्हा होत असावे तेव्हाही विरळा असावे.

आणि हे ठरवून केलेल्या विवाहांच्या बाबतीतसुद्धा होत नसावे असेही नाही. नाव नोंदवून किंवा जाणूनबुजून संशोधन करताना 'आपल्या गटां'चे काही निकष आपोआप लागू होत असतीलही कदाचित, परंतु कर्णोपकर्णी सांगून आलेल्या स्थळांच्या बाबतीत 'आपल्या गटा'च्या पारंपरिक निकषांच्या किंचित बाहेर त्याबद्दल फारसा किंवा काहीच विचार न करता जाऊन झालेल्या विवाहांची किमान दोन उदाहरणे माझ्या विस्तृत गोतावळ्यात आणि किमान एक उदाहरण माझ्या मित्रमंडळींमध्ये पाहण्यात आहे. यांतील कोणत्याही उदाहरणात कोणीही ठरवून 'आपल्या गटा'च्या पारंपरिक निकषांबाहेर जाण्याचा प्रयत्न केलेला नाही, मात्र अशा निकषांच्या किंचित बाहेरच्या सांगितल्या गेलेल्या स्थळांचा विचार करण्याकरिता यांपैकी कोणत्याही पक्षातील कोणत्याही व्यक्तीला मानसिक अडथळा आलेला नाही आणि यात आपण काही विशेष करत आहोत किंवा केले आहे अशी भावनाही यांपैकी कोणाच्या ठायी दिसून आलेली नाही. (अशी भावना असण्याचे खरे तर काही कारणही नसावे.)

अशी उदाहरणे तुलनेने कमी असावीत असा कदाचित एक दावा केला जाऊ शकतो. असतीलही. ठरवून केलेल्या विवाहांत निश्चित कमी असतील. परंतु प्रेमविवाहांतसुद्धा 'आपल्या गटा'च्या निकषांबाहेर जाण्याची उदाहरणे ही अपवादात्मक नसून नियम असावीत असे मानण्याचे काही कारण मला दिसत नाही. आणि प्रेमाच्या व्याख्येनेच असे अपवादात्मक 'आपल्या गटा'च्या निकषांच्या बाहेर जाणे हे ठरवून, जाणूनबुजून होत नसावे .(कोणाच्या प्रेमात ठरवून पडता येत नसावे, आणि अमूक निकष पूर्ण करणाऱ्या व्यक्तीच्या प्रेमात तर ठरवून पडता येत नसावेच नसावे. चूभूद्याघ्या.) मग प्रेमविवाहांत आणि ठरवून केलेल्या विवाहांत याही निकषावर फरक काय राहिला?

तसेही जातीय, धार्मिक किंवा आर्थिक समानता किंवा एकात्मता प्रस्थापित करणे हे लग्नाचे उद्दिष्ट नसावे. आणि, कोणीही काहीही म्हणो, पण विश्वशांती प्रस्थापित करणे हेही नसावे. तसेही कोणी अशा कोणत्या उदात्त हेतूने लग्न करत नाही, तर केवळ जोडीदार हवा असतो म्हणून लग्न केले जाते. मग लग्न करताना अनायासे असा एखादा 'आपल्या गटा'चा किंवा तथाकथित 'व्यावहारिक' निकष जर मोडला गेला, तर त्याचे कौतुक ते कसले? हा तर निव्वळ खाजगी मामला झाला. तसेही कोणी कोणाशी लग्न करावे हा केवळ ज्याचात्याचा अत्यंत वैयक्तिक प्रश्न आहे.  आणि मग लग्न करताना 'आपल्या गटा'च्या निकषाबाहेर जाणे (किंवा न जाणे) हा निव्वळ खाजगी मामला आहे, यात दखलपात्र असे काही नाही आणि लग्न करण्याचा तो उद्देशही नाही असे एकदा म्हटल्यावर, मग प्रेमविवाहांत ठरवून केलेल्या विवाहांपेक्षा असे 'आपल्या गटा'च्या निकषांबाहेर जाण्याचे प्रमाण यदाकदाचित किंचित जास्त जरी निघाले, तरी त्या बाबीला काहीही महत्त्व राहत नाही.

तसेही, असे विवाह करताना 'आपल्या गटा'च्या निकषांबाहेर जाणे ही त्या 'दुसऱ्या गटा'बाबत किंवा एकंदरीत 'इतर गटां'बाबत आत्मीयतेची किंवा बंधुभावाची तर सोडाच, पण भेदभावाच्या किंवा आकसाच्या अभावाचीसुद्धा हमी नाही. काहीसे समांतर उदाहरण घ्यायचे झाल्यास, मी पुरुष आहे, आणि माझा एका स्त्रीशी विवाह झालेला आहे. माझ्या मनात स्त्रियांबद्दल आकस नसेलही किंवा असेलही. मात्र, 'ज्याअर्थी मी पुरुष असून माझा एका स्त्रीशी विवाह झालेला आहे, त्याअर्थी माझ्या मनात स्त्रियांविषयी कोणताही आकस नाही' असा दावा मी केल्यास तो अर्थहीन ठरावा. मी पुरुष असून माझ्या एका स्त्रीशी विवाह केलेला असण्यातून असे काहीही सिद्ध होत नाही. (यातून जर काही सिद्ध होत असेलच, तर माझ्या मनात एका स्त्रीविषयी (माझ्या पत्नीविषयी) लग्नाच्या त्या क्षणापुरता तरी कोणताही आकस नव्हता, एवढेच फार फार तर सिद्ध व्हावे. 'माझ्या सर्व स्त्रियांविषयीच्या आकसातून एका स्त्रीशी लग्न करून मी सर्व स्त्रियांचा सूड तिच्यावर घेतला' असाही एक खोडसाळ निष्कर्ष यातून काढणे शक्य आहे, परंतु त्यात काही तथ्य नसल्याने तो सोडून देऊ.) किंवा, तोच तर्क जर पुढे चालवायचा झाला, तर माझ्याआधी माझे वडील आणि माझे आजोबाही पुरुष होते, आणि त्यांनीही एकेका स्त्रीशीच विवाह केला होता, या आधारावर 'माझ्या घराण्यात स्त्रीदाक्षिण्याची परंपरा आहे' असा दावा मी केल्यास तो फोल ठरावा. (तसेही पूर्वीच्या काळी स्त्रियांच्या आरोग्याची साधारण परिस्थिती फारशी खास नसल्याने अनेकदा स्त्रियांचे अकाली मृत्यू होत, आणि बिजवराची प्रथा सर्रास होती. त्या प्रथेस अनुसरून माझ्या एका आजोबांचे दोन वेगवेगळ्या वेळी दोन वेगवेगळ्या स्त्रियांशी विवाह झाल्याचे ऐकलेले आहे. माझ्या या आजोबांच्या ठायी दुप्पट स्त्रीदाक्षिण्य होते असे म्हणता येईल काय?)

तात्पर्य, 'आपल्या गटा'बाहेर विवाह करणे ही व्यापक पातळीवर गटसहिष्णुतेची हमी नाही. फार फार तर उभयपक्षी व्यक्तिगत सहिष्णुता यात (असलीच तर) कार्यरत असू शकेल. त्यामुळे व्यापक स्तरावर, सामाजिक दृष्टिकोनातून या 'गटाबाहेर जाण्या'ला काहीही महत्त्व नाही.

थोडक्यात प्रेम विवाहामध्ये मुलगी मुलाच्या आर्थिक परिस्थितीमध्ये थोडे कमी जास्त मान्य करेल.

याला फारसे महत्त्व नाही. कमीजास्त आर्थिक परिस्थितीचा मुलगा यात जाणूनबुजून निवडला गेलेला नसल्याने यात विशेष असे काहीही नाही.

परंतु ठरवून लग्न करताना मुलीकडचे त्यानी ठरवलेल्या पेक्षा कमी उत्पन्नाच्या स्थळाकडे बघणारच नाहीत.

असे होण्याची शक्यता असली, तरी असेही खात्रीने म्हणता येईलच, असे वाटत नाही. (चूभूद्याघ्या.)