धुंद होते शब्द सारे, धुंद होत्या भावना
वार्‍यासंगे वाहता त्या फुलापाशी थांब ना...

उत्तरायण चित्रपटातलं एक अप्रतिम गाणं. शुद्ध गंधार-रिषभाचा संवाद सुखावून जातो...

'वार्‍यासंगे वाहता त्या फुलापाशी थांब ना..'

एक सुंदर, तरल अर्थ असलेली ओळ. 'त्या' या अक्षरावर संगीतकाराने पंचमाची अतिशय हळवी जागा ठेवली आहे आणि गायकानेही तिला पुरेपूर न्याय दिला आहे. पंचमाला हलकेच स्पर्श करून आलेली 'त्या' या अक्षरावरची जागा ही एखादं सुंदर फुलपाखरू उडून एखाद्या मनमोहक फुलावर जसं विसावतं तशी 'फुलापाशी थांब ना..'तल्या षड्जावर येऊन अगदी अलगद विसावते!

'मेघ दाटून गंध लहरुनि बरसला मल्हार हा
चांदराती भाव गुंतुनी बहरला निशिगंध हा..'

या दोन्हीही ओळी फार सुंदर आणि अर्थपूर्ण.

गाण्याचं अ‍ॅरेंजिंग, ताल-ठेका, बासरीची सुरेलता, इत्यादी सगळं अगदी सुरेख जमून आलंय. गाण्याचं चित्रीकरणही सुंदर. शिवाजी साटम आणि नीना कुलकर्णी यां समर्थ कलाकारांनी आपल्या सहजसुंदर वावरामुळे या गाण्याचा प्रसन्न मूड अगदी छान राखला आहे. संगीतकाराने या कवितेवर, या गाण्याच्या चालीवर बर्‍यापैकी विचार केला आहे, चिंतनमनन केलं आहे असं जाणवतं. अभिजात संगीताच्या भाषेत 'संगीतकाराची उपज खूप चांगली आहे' असं म्हणता येईल!

असो, एका सुरेख गाण्याचं दान मराठी रसिकांच्या पदरी घातल्याबद्दल कवी कौस्तुभ सावरकर, संगीतकार अमार्त्य राहुल आणि गायक रवींद्र बिजूर या तिघांचंही कौतुक वाटतं. या गुणी मंडळींकडून अशीच काही चांगली दानं यापुढेही पदरात पडावीत हीच सदिच्छा!

-- तात्या अभ्यंकर.