टग्या यांनी ठरवून केलेल्या विवाहाची बाजू चांगली सांगितली आहे. त्यांचे, तसेच चक्रपाणिचे म्हणणे असे की जोडीदाराशी बोललो (विविध माध्यमातून), भेटलो आणि आवडलो. मग काही काळाने लग्न केले. हे म्हणजे वर्तमानपत्रात कायम येणारे परिचयोत्तर विवाहाचे उदाहरण झाले.

पण पत्रिका जुळवल्या, छायाचित्रे बघितली, एकदा(च) कुटूंबियासह भेटण्याचा कार्यक्रम झाला आणि लग्न झाले अशीही उदाहरणे असतात. हल्ली कदाचित कमी असावीत पण १० वर्षांपूर्वी जेव्हा माझ्या आजूबाजूला (माझ्याच) लग्नाचा विषय ऐरणीवर येत असे तेव्हा अशी उदाहरणे जास्त असत. अश्या प्रकारात धर्म, जात, पोटजात, वय, उंची, रंग, बांधा आणि सांपत्तिक व सामाजिक स्थान या मुद्द्यांवर मुख्यत्वे निर्णय घेतला जातो. म्हणून मला वाटते आकांक्षा यांनी व्यवहार असे म्हटले आहे. स्वभाव, आवडी, निवडी यांना निर्णयप्रक्रियेत फारसे स्थान नसते. माणूस आख्खा कळायला आयुष्य पुरे पडत नाही हे खरे, पण याच्या बरोबर आपले आयुष्य कसे जाईल याचा अंदाज काही भेटीत, गप्पात घेता येतो. निव्वळ आकडे (वयाचे, पगाराचे, पत्रिकेतले) पाहून ते कळेल असे मला वाटत नाही.

स्वभावाचा अंदाज न घेता लग्न केले आणि विसंवाद उद्भवला तर बहुतांश उदाहरणात स्त्रीला नमतेे घेण्यास सुचवले जाते. ती नमते घेईल न घेईल, पण 'समाज' म्हणतात त्या गटाचा दबाव आधी स्त्रीवर येतो. ती टोकाची बंडखोर असेल तर नाते तुटते पण बहुतांशी ती 'ऍडजस्ट' करते. माझ्या पाहण्यात तर असे आहे की आपण असे काही करतो आहोत हे पुष्कळ स्त्रियांच्या गावीच नसते. मुळात आपल्या कुटुंबाच्या आनंदात आपला आनंद असे ठासून डोक्यात भरलेले असते. हे मी माझ्या आईच्या पिढीतल्या बायकांबद्दल म्हणते आहे.

आता हळूहळू मी का म्हणून त्याग करायचा हा प्रश्न मुलींना पडू लागला आहे. आणि नाही लग्न केले तरी बिघडत नाही हे लक्षात येऊ लागले आहे.

प्रेमात पडण्यातला फरक असा की टग्या म्हणतात तसे प्रेम आंधळे असते. त्यात हा जो त्याग असतो त्यातून गमावलेला आनंदापेक्षा प्रेमातून मिळणाऱ्या एक्साईटमेंट (मराठी? ) च्या मानाने नगण्य भासतो. असतो की नाही ही वेगळी गोष्ट. प्रेमात पडण्याची रसायने मेंदूत तयार होतात ती जोडी जमवण्याच्या हेतूने. टग्या व चक्रपाणी यांनाही प्रेमात पडल्याची ही एक्साईटमेंट लग्नाआधी जाणवली असावी. (उदाहरण म्हणून नावे मुद्दा एव्हढाच की जोडी जमवण्यासाठी प्रेम आवश्यक. )

मुलींच्या अपेक्षा हा जो मूळ मुद्दा आहे तोच प्रेमात पडल्यावर बाद होतो. एकदा 'पडल्यावर' हाच जोडीदार हवा एव्हढीच अपेक्षा शिल्लक राहते. तसे घडल्यास मग बाकी कुठे गटारे आहेत, कुठे काय आहे काही फरक पडत नाही.