पण पत्रिका जुळवल्या, छायाचित्रे बघितली, एकदा(च) कुटूंबियासह भेटण्याचा कार्यक्रम झाला आणि लग्न झाले अशीही उदाहरणे असतात.

ठरवून केलेल्या विवाहांत याच पद्धतीस अनुसरले पाहिजे असे कोणतेही कायदेशीर किंवा नैतिक बंधन नसावे.

अश्या प्रकारात धर्म, जात, पोटजात, वय, उंची, रंग, बांधा आणि सांपत्तिक व सामाजिक स्थान या मुद्द्यांवर मुख्यत्वे निर्णय घेतला जातो. ... स्वभाव, आवडी, निवडी यांना निर्णयप्रक्रियेत फारसे स्थान नसते.

पुन्हा, ठरवून केलेल्या विवाहांत स्वभाव, आवडी, निवडी यांना निर्णयप्रक्रियेत स्थान असू नये किंवा गौण स्थान असावे असे कोणतेही कायदेशीर किंवा नैतिक बंधन असल्याचे ऐकिवात नाही. (स्वभाव, आवडी आणि निवडी यांना प्राधान्य देऊन केलेला दोन भारतीय प्रौढ भिन्नलिंगी हिंदू व्यक्तींमधील ठरवून केलेला विवाह हा हिंदू म्यारेज आक्टान्वये वैध ठरावा, असे वाटते. अर्थात मी कायदेतज्ज्ञ नाही; चूभूद्याघ्या.) अशा परिस्थितीत एखाद्याने अशा स्वातंत्र्याचा उपभोग न घेता स्वभाव, आवडी अथवा निवडी यांना स्थान अथवा प्राधान्य न दिल्यास ती त्या व्यक्तीची वैयक्तिक निवड आणि जबाबदारी ठरावी; ठरवून करण्याच्या विवाहपद्धतीचा तो दोष ठरू नये.

स्वभाव आणि आवडीनिवडी यांना निर्णयप्रक्रियेत प्राधान्य असावे असे मला व्यक्तिशः वाटते. तसे प्राधान्य देण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकास आहे, आणि त्याला कोणताही अडथळा नाही. ते स्वातंत्र्य वापरायचे की नाही, हा ज्याचात्याचा प्रश्न. न वापरल्यास दोष पद्धतीचा नाही; असल्यास त्या व्यक्तीचा आहे.

बाकीचे निकष (वय, उंची, आर्थिक स्थिती, जात-पोटजात, धर्म, मातृभाषा वगैरे) हे प्रामुख्याने यादी कमी करण्याचे घटक (शॉर्टलिस्टिंग फॅक्टर्ज़) म्हणून कामी यावेत. प्रेमविवाहांत असे शॉर्टलिस्टिंग आपोआप/अनायासे/योगायोगाने होत असल्याने असे निकष उघडपणे (ओवर्टली) लावण्याची गरज भासत नसावी, परंतु तरीही, आधी म्हटल्याप्रमाणे, असे घटक कमीजास्त प्रमाणात कोठेतरी सबकॉन्शस (मराठी?) पातळीवर कार्यरत असावेत, अशा निकषांच्या उल्लंघनाचे एकंदर प्रमाण मर्यादित असावे, आणि ठरवून केलेल्या विवाहांतसुद्धा असे उल्लंघन मर्यादित प्रमाणात क्वचित्प्रसंगी दिसून यावे. तसेही ठरवून केलेल्या विवाहांतसुद्धा हे सर्व निकष कटाक्षाने पाळलेच पाहिजेत असे कोणते कायदेशीर किंवा नैतिक बंधन नसावे.

माणूस आख्खा कळायला आयुष्य पुरे पडत नाही हे खरे, पण याच्या बरोबर आपले आयुष्य कसे जाईल याचा अंदाज काही भेटीत, गप्पात घेता येतो.

नेमका माझा मुद्दा! आणि असा अंदाज घेण्यास पद्धतीने अडवलेले नाही. पूर्ण स्वातंत्र्य आहे. बंधन जर असलेच, तर ते संबंधित पक्षांच्या आणि/किंवा त्यांच्या कुटुंबियांच्या मनातले आहे.

निव्वळ आकडे (वयाचे, पगाराचे, पत्रिकेतले) पाहून ते कळेल असे मला वाटत नाही.

मला वाटते असे (म्हणजे निव्वळ आकड्यांवरून निर्णय घेणे) कोणी करूही नये. (किंबहुना अनेकदा असे आकडे निरर्थक असू शकतात किंवा किमानपक्षी त्यांना महत्त्व नसते असे माझे वैयक्तिक मत आहे.) परंतु केल्यास तो दोष संबंधित व्यक्तींचा आहे, पद्धतीचा नव्हे. पद्धतीत असे कोणतेही बंधन नाही.

शेवटी विवाह हा कोणत्याही पद्धतीने केला तरी तो दोन जबाबदार व्यक्तींचा वैयक्तिक आयुष्यासंबंधीचा वैयक्तिक निर्णय आहे, 'कॅप्टिव ब्रीडिंग प्रोग्राम' (मराठी?) नव्हे, आणि उत्पन्न हमी योजना तर नव्हेच नव्हे, ही संबंधित पक्षांनी  लक्षात घेण्याची गोष्ट आहे. लक्षात न घेतल्यास जबाबदारी कोणाची? ती जबाबदारी संबंधित व्यक्तींची; ठरवून विवाहाच्या पद्धतीची नव्हे.

तसेही हे लक्षात घेऊ न शकणाऱ्या व्यक्ती प्रेमविवाहसुद्धा करू शकतील असे वाटत नाही. त्यामुळे विवाहाची पद्धत कोणतीही असो, त्रुटी पद्धतीची नाही, व्यक्तीची आहे.

आता हळूहळू मी का म्हणून त्याग करायचा हा प्रश्न मुलींना पडू लागला आहे. आणि नाही लग्न केले तरी बिघडत नाही हे लक्षात येऊ लागले आहे.

प्रश्न रास्त आहे. अधोरेखिताबद्दल 'जो जे वांच्छील तो ते लाहो'.

प्रेमात पडण्यातला फरक असा की टग्या म्हणतात तसे प्रेम आंधळे असते.

असे माझे म्हणणे नाही. हे वाक्य मी ऐकलेले आहे. ते जसेच्या तसे उद्धृत केले, एवढेच. एंडॉर्समेंट (मराठी?) नाही.

प्रेमात पडतानासुद्धा डोळसपणा दाखवणे (डोळसपणे प्रेमात पडणे) हे अशक्य नसावे, अशी शंका आहे. (खात्री नाही. चूभूद्याघ्या.)

टग्या व चक्रपाणी यांनाही प्रेमात पडल्याची ही एक्साईटमेंट लग्नाआधी जाणवली असावी.

खाजगी मामला आहे, सांगण्याची गरज नाहीच, पण (माझ्यापुरते बोलायचे झाले तर) 'होय' असे उत्तर द्यायला का कोण जाणे, पण संकोच वाटत नाही खरा.

मुद्दा एव्हढाच की जोडी जमवण्यासाठी प्रेम आवश्यक.

अगदी! नेमका माझा मुद्दा! पण या प्रकाराला 'प्रेमविवाह' असे अधिकृतरीत्या म्हटले जात नसल्याने (म्हणावे असा आग्रह नाही!) हा मुद्दा अनेकदा अनेकांच्या लक्षात येत नाही. आणि मग ठरवून केलेला विवाह म्हणजे निव्वळ व्यवहार असतो, नव्हे निव्वळ व्यवहाराव्यतिरिक्त काही असूच शकत नाही, अशा चमत्कारिक कल्पना जन्माला येतात. (बाय द वे, बीन देअर, डन द्याट. [मराठी?] एक वय असते डोक्यात अशा कल्पना असण्याचे. पुढे होपफुली [मराठी?] अक्कल येते. असो.)

मुद्दा प्रेमविवाहाला विरोध किंवा ठरवून केलेल्या विवाहाची भलावण हा नाही. दोन्ही विवाहाचे सारखेच वैध मार्ग आहेत. फक्त, दोन्हींमध्ये सारख्याच प्रकारच्या प्रक्रिया कार्यरत असू शकतात, केवळ एका प्रकारात त्या योगायोगाने होतात तर दुसऱ्या प्रकारात त्या काहीशा जाणूनबुजून, काहीशा नियंत्रित स्वरूपात होऊ शकतात एवढाच फरकही दोन्ही प्रकारांत राहू शकतो, एवढेच मांडण्याचा हा प्रयत्न आहे. आणि नेमके हेच लक्षात न घेतल्याने प्रेमविवाहाला क्वचित्प्रसंगी जनमानसात जे एका प्रकारचे अनावश्यक ग्लॅमर प्राप्त होते, आणि 'तो दुसऱ्या प्रकारचा विवाह म्हणजे निव्वळ व्यवहार असतो' अशा प्रकारच्या ज्या कल्पना निर्माण होतात, त्याबद्दल 'असे काही नसते, त्या दुसऱ्या प्रकारातही निव्वळ व्यवहार असावाच लागतो असे नाही, त्याशिवायही गोष्टी घडू शकतात, आणि बहुधा पहिल्या प्रकाराप्रमाणेच घडतात, फक्त जाणूनबुजून घडतात' हे दाखवून देऊन ते गैरसमज दूर करण्याचा हा उपद्व्याप आहे. अर्थात कोणाला पटले न पटले तरी व्यक्तिशः काहीही फरक पडत नाही.

मुलींच्या अपेक्षा हा जो मूळ मुद्दा आहे तोच प्रेमात पडल्यावर बाद होतो. एकदा 'पडल्यावर' हाच जोडीदार हवा एव्हढीच अपेक्षा शिल्लक राहते. तसे घडल्यास मग बाकी कुठे गटारे आहेत, कुठे काय आहे काही फरक पडत नाही.

'पडून उठल्यावर' किती फरक पडतो हा कळीचा मुद्दा ठरावा. आणि असे 'पडणे' हे केवळ व्याख्योक्त प्रेमविवाहांतच होऊ शकते याबद्दल साशंक आहे. तसेच 'पडल्यावर' फरक पडणे न पडणे हे व्यक्तीची मानसिकता, 'पडण्याची' तीव्रता आणि 'पडल्यावर उठण्यासाठी' लागणारा सापेक्ष वेळ यांवरही बऱ्याच अंशी अवलंबून राहावे असे वाटते. 'पडल्यानंतर उठणे' हे अतिशीघ्रतेने झाल्यास तरीही फरक पडू शकावा, अशी शंका आहे. असो.