आपल्या प्रतिसादातील या चर्चेच्या प्रस्तावाशी संबंधित भाग (अधोरेखन आणि ठळकीकरण माझे):

नावातली चूक दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद.  बरेच दिवसांत मुंबईच्या फाउन्‍टन भागातून फेरफटका मारला न गेल्याने थोडे विस्मरण झाले, असे दिसते आहे. दुकानाचे मूळ नाव Lund and Blockley  असेच होते, आणि देवनागरीतही ते पूर्वी बहुधा मूळ उच्चाराबरहुकूम लिहिलेले असावे. आता त्यांतला पहिला शब्द सुधारून लुंड असा रंगवला गेल्याचे काही वर्षांपूर्वी  ध्यानात आले होते.

माझ्या याअगोदरच्या एका प्रतिसादातील संबंधित मुद्दा, संदर्भाकरिता:

या दुकानाच्या नावाचा आपण दिलेला मुळाबरहुकुम उच्चार चुकीचा आहे. सर्वप्रथम, या नामद्वयातील दुसरे नाव 'ब्रॉकली' असे नसून 'ब्लॉकली' असे आहे. दुसरी गोष्ट म्हणजे, या नामद्वयातील पहिल्या नावाचा उच्चार मुळाबरहुकुम करायचा झाल्यास तो 'लुंड' असा नसून, मराठी कानांस अश्लील भासण्यासारखाच आहे. ... अधिक खात्रीसाठी हा दुवा पाहावा. दुव्यावर या नावाचा उच्चार ऐकण्याचीही सोय आहे. (दुवा त्या नावाच्या गावाबद्दल असला, तरी ते गाव ज्या भौगिलिक प्रदेशात आहे त्याच भौगोलिक प्रदेशात या आडनावाचेही मूळ असल्याकारणाने दोहोंत संबंध असावा, किंवा किमानपक्षी दोहोंचा उच्चार सारखा असावा, असा तर्क मांडता यावा. चूभूद्याघ्या.)

या अनुषंगाने:

'परभाषीय शब्दांचे लेखन, उच्चार आपल्या भाषेत करण्याची पाळी आल्यास तसे करताना ज्या भाषेतला तो शब्द आहे त्या भाषेतल्या त्या भाषेतल्या त्याच्या उच्चाराप्रमाणेच प्रमाणेच करावेत' या मूळ चर्चाप्रस्तावास अनुसरून, प्रस्तुत चष्म्याच्या दुकानाच्या नावाचे मराठीतील लेखन आणि उच्चार ठळकपणे - म्हणजे दुकानांच्या पाट्यांवर मोठ्या देवनागरी अक्षरांत, किंवा बोलताना स्पष्टपणे वगैरे - मूळ भाषेतील उच्चाराबरहुकुम करावा, की मराठी कानांस (आणि हिंदी कानांससुद्धा!) त्यातील काही भाग उघड‌उघड अश्लील वाटतो म्हणून त्याच्या लिखाणात आणि उच्चारात मराठीपुरता (किंवा देवनागरीपुरता) मराठीभाषक (किंवा मराठीभाषक आणि हिंदीभाषक) जनसामान्यांच्या सोयीप्रमाणे बदल करावा?

माझ्या मते या प्रश्नावर दोन्ही बाजूंनी मांडण्यासारखे मुद्दे असल्यामुळे - आणि शेवटी कंपनीला मुंबईत धंदा करायचा असल्याने - याचा निर्णय त्या कंपनीवर आणि मुंबईकरांवर/मुंबईकर मराठीभाषकांवर/मुंबईकर मराठीभाषकांवर आणि मुंबईकर हिंदीभाषकांवर सोडावा. इतरांची मते जाणून घ्यायला आवडेल.