.... मनोगतींना धन्यवाद.
                            (प्रतिसादांतील  संपादनाबद्दल प्रकाशकांना धन्यवाद. )
 विसूनानांची प्रथम क्षमा मागतो. मी लेख पूर्ण करण्याला प्राधान्य दिले. त्यामुळे प्रतिसादाला उत्तर देण्यास विलंब झाला.
आपण केलेल्या विचारणेच्या संबंधात आस्वाद-विवाद झाला, हे एका दृष्टीने चांगलेच झाले. आता आपण जरा संवादाकडे वळू.
 प्रथमतः मी नम्रपणे हे नमूद करू इच्छितो की, मी कुठला सांप्रदायिक नाही, गुरुकृपांकित नाही, स्वयंप्रज्ञ तर नाहीच नाही
 आणि वारसा म्हणून आम्हा भारतीयांना जे अमोल वाङ्गमय लाभलेले आहे, त्यातील चुका, असंबद्धता, विरोधाभास काढण्याची पात्रता येण्याइतका प्रगल्भ विचारवंतही नाही. हे वाङ्ग्मय मला तरी मातेसमान वाटते. माता कुरूप आहे म्हणून बालक तिचे स्तन्य नाकारीत नाही.
 धर्म या शब्दाचा अर्थ मला जो उमगला तो इतकाच की, ज्या मूळ तत्त्वापासून माझी फारकत झाली, त्या तत्त्वाशी मला
परत जोडून देणारी प्रणाली म्हणजे धर्म. यासाठी अनेकांनी कालौघात आपापले मार्ग हुडकले, त्यांच्या अनुभूती इतरांना सांगितल्या. त्यातून  जे वाङ्गमय संकलित होत गेले, ते आज आपल्या हाती आले आहे. त्यातील ज्ञान हे म्हणूनच संस्कारित आहे, हे नक्की. त्या त्या वेळच्या गरजा लक्षात घेऊनच त्या त्या सुधारणा होत गेल्या असणार आणि त्या सुधारणा समाजाने स्वीकारल्या यातच त्यांची योग्यता अध्याहृत होते. म्हणून मी कोणत्याही धार्मिक वाङ्गमयातील दोषाचा कधीही विचार करीत नाही. न्यूटनच्या सिद्धांतातील त्रुटी काढण्यासाठी मला प्रथम माझे आयुष्य त्या अभ्यासाला समर्पित करावे लागेल. असो.
 
 भारतीय वाङ्गमयामध्ये अनेक गीता उपलब्ध होतात. या गीता जीव, जगत्, आत्मा, परमात्मा, प्रकृती, उत्पत्ती, स्थिती,
लय यांचा प्रामुख्याने विचार करतात. मुळातच श्रीमद्भगद्गीता ही त्या गीतांसारखी निवृत्तीपर नाही. चुकीच्या धारणेतून निवृत्ती घ्यावयाची ही भूमिका येथे नाही. त्यामुळे हतवीर्य अर्जुनाला पुन्हा कर्मप्रवृत्त करणे, हा भगवंतांच्या उपदेशाचा उद्देश आहे.

 अर्जुन हा श्रीकृष्णाचा सगा आणि सखा आहे. दोघेही लहानपणापासून एकमेकांना जाणत होते. अर्जुन हा धर्मानुज आहे. तो
इंद्र तसेच प्रत्यक्ष शंकर यांच्याकडून कृपांकित आहे. द्रोणांनी त्याला विद्येत पारंगत केले होते; यात प्राप्त विद्येचे उपयोजनही त्यांनी शिकवलेले होते. हे सारे लक्षात घेतले तर अर्जुन हा ब्रह्मविद्येविषयी अनभिज्ञ होता असे म्हणता येत नाही. आज एकविसाव्या शतकात जगताना या विषयाचे आकर्षण माणसास आहे; एव्हढेच नव्हे तर मातीत काम करणारा शेतकरी तुमच्या-आमच्यापेक्षा अधिक अध्यात्म जाणणारा असतो, तर ज्या कालात वेद-शास्त्रे प्रमाण मानून व्यवहार चालत असत, त्या कालात कोणत्याही वर्णाची व्यक्ती समर्थपणे अध्यात्म जगत असणार असे म्हणणे वावगे होणार नाही.

श्रीमद्भगवद्गीता भारतीय तत्त्वज्ञानावरच आधारित आहे. भारतीय ज्ञानाचा निश्चित काल ठरविणे शक्य नाही, तथापि,
साधारणतः सात हजार वर्षांचा कालखंड मध्ये गेला असावा, असा कयास केला जातो. त्यामुळे मूळ काय, प्रतिक्षिप्त काय, हे आज ठरविणे अवघड आहे. आचार्य शंकराचार्यांनी ज्यावर टीका लिहिली, ती गीता तरी प्रमाण मानावयास हरकत नाही, कारण ज्ञानाविषयी पूर्ण निरभिमानी अशा आचार्यांना लाभलेली बुद्धिमत्ता अजोड होती. मोठमोठया नांवाजलेल्या पंडितांशी विवाद-संवाद साधून त्यांनी वैदिक विचारधारणांना पुनःप्रतिष्ठा मिळवून दिलेली आहे.

 श्रीमद्भगवद्गीतेचे अठरा अध्याय आहेत. प्रत्येक अध्यायाचा समारोप करताना ‘उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां’ असा उल्लेख
करून त्या त्या अध्यायातील विषयाचे शीर्षक पाहवयास मिळते. या शीर्षकाला योग शब्द जोडलेला आहे. या नांवांवरून नजर टाकली, तरी श्रीमद्भगवद्गीतेतील विचारांच्या मांडणीची कल्पना येईल :
अध्याय क्र.        शीर्षक                                          अध्याय क्र.        शीर्षक
१                             अर्जुनविषादयोग                          १०                         विभूतियोग
२                             सांख्ययोग                                   ११                          विश्वरूपदर्शनयोग
३                             कर्मयोग                                       १२                          भक्तियोग
४                             ज्ञानकर्मसंन्यासयोग                   १३                          क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोग
५                             कर्मसंन्यासयोग                          १४                          गुणत्रयविभागयोग
६                             आत्मसंयमयोग                           १५                           पुरुषोत्तमयोग
७                             ज्ञानविज्ञानयोग                          १६                           देवासुरसंपदविभागयोग
८                             अक्षरब्रह्मयोग                             १७                           श्रद्धात्रयविभागयोग
९                             राजविद्याराजगुह्ययोग                १८                          मोक्षसंन्यासयोग

कर्माचरणाला प्रेरणा लागते. प्रेरणा बुद्धीवर अवलंबून असते. बुद्धीवर झालेल्या संस्कारातून प्रेरणा उत्पन्न होत असतात.
यावरून असे म्हणता येते की, गीतेतील अध्यायाचे शीर्षक देताना ‘योग’ या पदाचा वापर बुद्धीवरील संस्कारांचा निदर्शक आहे. त्या त्या विषयाचा बुद्धीवर होणारा संस्कार त्यातून निर्देशित होतो. ब्रह्मविद्येची प्राप्ती होण्यासाठी असलेली साधने यातून क्रमाक्रमाने उपदेशिली गेली असल्याचे दिसते. असा साकल्याने उपदेश करून शेवटी भगवंतांनी अर्जुनाला ‘तुला योग्य वाटते ते कर’ अशी मुभाही दिली आहे.
 'सर्व्हायल ऑफ दि फिटेस्ट' या सूत्रातच युद्धाची अनिवार्यता सामावलेली आहे. माणसाला युद्ध टाळता येते, पण कधी? -
न्याय्यान्याय्यता ही उभयपक्षी स्वीकारार्ह असेल, तरच तडजोडीने मार्ग काढता येतो. कौरव-पांडव युद्ध टाळण्यासाठी प्रथम प्रयत्न केले गेले आहेतच. कुणाचेही म्हणणे स्वीकारायला कौरवांचा नकार होता वगैरे कथा बहुतेक साऱ्यांना माहित आहे.
 संशय किंवा भ्रांती ही कर्तृत्वाला ग्रहण लावते. ती विवेकाला, पर्यायाने बुद्धीला हतप्रभ करते. म्हणून प्रथम निष्प्रभ
झालेली बुद्धी मार्गी लावण्यासाठी विवेकाला जागे करणे महत्त्वाचे ठरते. अर्जुनाचा विवेक निष्प्रभ झाला. त्याच्या मनात भ्रांती निर्माण झाली. त्यामुळे तो किंकर्तव्यमूढ अवस्थेत गेला. त्याचा विवेक जागृत करण्यासाठी प्रथमतः श्रीकृष्णांनी त्याला त्याच्या क्षात्रवृत्तीची आठवण करून दिली. दुसऱ्या अध्यायाच्या अकराव्या श्लोकापासून हा उपदेश सुरू होतो. पुढे तिसाव्या श्लोकापर्यंत देहाची अनित्यता, आत्म्याचे अविनाशित्व समजावून देऊन भगवंतांनी मरणाबद्दल शोक निर्माण करणारी भ्रांती व्यर्थ असल्याचे सांगितले. पुढील आठ श्लोकांतून प्राप्त कर्तव्यापासून पळ काढला, तर होणारी अपकीर्ती व त्यातून प्राप्त होणाऱ्या दुःखमय स्थितीची कल्पना भगवंत देतात. अर्जुनाचा विवेक जागृत करण्यासाठी प्राथमिकतया त्याला कर्तव्यकर्माचे फल भगवंत दर्शवितात. भगवंतांच्या शब्दातील भाव स्पष्ट करण्यासाठी श्रीज्ञानेश्वरमहाराज दृष्टांत देताना सांगतात: नावेत बसणारा बुडणार नाही. स्वधर्म हा नावेसारखा आहे. त्याच्या यथार्थ आचरणाने मनुष्य पापाचा धनी होणार नाही. नोकराने मन लावून काम करणे त्याचे कर्तव्य आहे. असे करणारा नोकर बदनाम होणार नाही. त्याला अधिक बक्षिसी देणे (प्रमोशन) हे मात्र त्याच्या मालकावर अवलंबून आहे.

भगवंतांचा हा प्राथमिक उपदेश सांख्य तत्त्वज्ञानावर आधारित आहे. सं+आख्य=सांख्य. सांख्य शब्दाने साधक-बाधक
विवरण करणारे शास्त्र असा बोध होतो व त्या शास्त्राने संन्यासयोगाची व्याख्या केली आहे. अर्जुनाला युद्धातून संन्यास घ्यावयाचा आहे, हे इथे लक्षात घेतले तर भगवंतांच्या येथील उपदेशात्मक श्लोकाची उपपत्ती लक्षात येते. ‘हतो वा प्राप्स्यसे स्वर्गं... ’ यातून सांख्यतत्त्वज्ञानाप्रमाणे विचार करूनसुद्धा जे फळ मिळणार आहे, त्याची मर्यादा इथे दाखविली आहे. या मर्यादित पण आकर्षक फलाकडे लक्ष देऊन तरी ‘कृतनिश्चय हो’ असे ते अर्जुनाला सांगतात.

 मनुष्याचे जीवितकार्य दोन मार्गांनी होत असते. त्यातील एक आहे, तो सांख्यमार्ग व दुसरा आहे योगमार्ग. संन्यासमार्गात
कर्माच्या पूर्ण त्यागाची अपेक्षा, देहनाशाचा शोक न मानणे आणि सुख-दुःखे समत्वाने भोगणे सांगितले आहे. आता, सर्वांनीच संसारत्याग केला तर संन्याशांना भिक्षा कोण घालणार? सुख-दुःखे समत्वाने भोगायची खरे, पण वाट्यास आलेल्या सुख-दुःखांमागे कर्म आलेच. अशा प्रकारच्या शंकांचे समाधान सांख्यज्ञानाने होत नाही.  योगमार्गात कर्मापेक्षा ज्ञानाचे महत्त्व अधिक मानले जाते. भक्ती श्रेष्ठ खरी, पण तिलाही ज्ञानाची अपेक्षा आहे. ज्ञानाने कर्मबंध न राहाता समत्वबुद्धीने कर्माचरण शक्य होते. (हेच गीतेचे प्रमुख प्रतिपादन आहे. ) संन्यास न घेता देह-देही विषयक ज्ञानप्राप्तीनंतरही निष्काम बुद्धीने सदैव प्राप्त कर्म करीत राहाणे, हाच खरा पुरुषार्थ, असे या निष्ठेचे मत आहे. कर्मयोगाचे महत्त्व असे आहे की एकदा केलेले कर्म वाया न जाता पुढील जन्मी ते उपयोगी येते व जन्मोजन्मीचे शुभ संचित पुढे कधी ना कधी सद्गतीचा लाभ करून देते.   यात कार्यासाठी आवश्यक असलेली बुद्धी (व्यवसायात्मिका) एकाग्र निभ्रांत असावी लागते. विकल्पांमुळे मनुष्य कर्मकांडाच्या मागे लागतो व भोग, ऐश्वर्य
यांतच गुंतून पडतो. तिथे बुद्धीला ब्रह्मप्राप्तीसाठी आवश्यक स्थिरता लाभू शकत नाही. तेव्हा, भगवंत अर्जुनाला ‘हतो वा प्राप्यसे स्वर्गं.. ’ नंतर ‘कर्मण्ये वाधिकारस्ते... ’ जे सांगतात ते अर्जुनास उच्च पातळीवर नेऊन योगमार्गात स्थिर करण्यासाठी. अर्जुन हा क्षत्रिय असल्याने जे न्याय्य त्याचे रक्षण करणे, त्यासाठी जो अपराधी आहे त्याला कडक शासन करणे, प्रसंगी ठार करणे हे त्याचे प्राप्त कर्तव्य आहे. तो त्याचा धर्म आहे. त्या धर्माचे रक्षण त्याला करायला हवेच. या कर्तव्याविषयी तो अज्ञ नाही, हे खरे. त्याचा संभ्रम आहे तो स्वजनांना शत्रू समजून मारायचे कां नाही? अर्जुनाच्या या संभ्रमाचे निराकरण करणे व त्याला यथार्थ ज्ञान देणे हे भगवंतांना आवश्यक वाटत आहे.  युद्धात कोण जिंकेल, कोण हरेल हे काळ ठरवितो. मरणे-न मरणे या दोन्ही शक्यता तिथे असतातच. प्राप्त कर्तव्य निभावताना साधा-सरळ हिशोब जरी केला तरी अर्जुनाला लाभ होणार आहे. त्याने थोडा सखोल विचार केला व शास्त्रसंमत मार्गाने अधिक कुशल बुद्धीचा वापर करून त्याने ते कर्तव्य केले तर होणारा लाभ अधिक मोठा असणार आहे, हे भगवंत अर्जुनाला पटवून देण्यासाठी ‘कर्मण्ये वाधिकारस्ते... ’ने सुरुवात करतात. याचे फल पुढे ’जन्मबंधविनिर्मुक्ती’ असल्याचे भगवंत सांगतात.

(मृदुलाताईंना ‘दहशतवाद’ वाटणे स्वाभाविकच आहे, कारण शकुनी काय किंवा लादेन काय, एकाच मातीची लेकरे आहेत.
भास्करजींना कसाबला नाचवणारे आणि कृष्ण हे दोघेही सारखेच दोषी आहेत असे वाटत असेल तर नाइलाज आहे. देव करो आणि कसाबला योग्य न्याय मिळो. लादेनला ‘जगत् भूषण’ किताब देण्याचा यूनोने अवश्य विचार करावा. कांहीही कारण नसताना शेकडोंनी हकनाक मरण्यास निष्पाप माणसांचा कुठे दुष्काळ आहे?

 संजयजींस :  मला आपल्याबद्दल आदर वाटतो. एकाग्र निष्ठा मिळावी, यासाठी मोठी तपःश्चर्या करतात. आपल्याला
ती साध्य झाली आहे, असे वाटते. मी लेखावरील प्रतिसादांना उत्तर द्यावे, अशी आपली अपेक्षा गैर नाही. एक तर हे लिखाण जे झाले, ते मला मिळालेल्या प्रेरणेतून. हे लेखन पूर्ण करणे यास मी प्राधान्य दिले. ब्रह्मविद्येच्या (अध्यात्माच्या) दोन इयत्ता आहेत, एक निर्गुण-निराकार आणि दुसरी सगुण-साकार. केवळ निराकार मानायचे तर अपूर्णता येईल. निराकार-सगुण असे ब्रह्म मानायचे तर निर्गुण-साकार ही संकल्पना उभी करावी लागेल किंवा या दोन्हीतून फारतर जीवाचे स्वरूप मांडता येईल. हा प्रांत अर्थातच माझा नव्हे.

 आपण सात मुद्दे प्रस्तुत करून त्यांची उत्तरे मागीतली आहेत. मला वाटते, आपली ‘निराकाराचे अस्तित्व’ प्रणाली निर्दोष असेल, तर ती दुसऱ्यास पटवून देण्यासाठी आक्रमक होणे अनावश्यक आहे. अध्यात्म हा प्रांत नवीन खचितच नाही. या विषयावर अजूनही विचारवंत अभ्यास करीत आहेत. गीतेवरच किती तरी जणांनी वेगवेगळ्या दृष्टिकोनातून टीका लिहिली आहे. दहशतवादाशी तिचे असलेले साम्य हा एक नवा दृष्टिकोन समोर आला आहे! आपण उपस्थित केलेले मुद्दे तथ्यपूर्ण असते, तर कुणीही ते नाकारले नसते, एव्हढे मात्र खरे. आत्मबोध ही वैयक्तिक उपलब्धी आहे अन् ती आपल्याला प्राप्त झाली आहे, यापेक्षा अधिक भाग्य ते कोणते?

॥ हरये नमः ॥ )