मला वाटते बेशिस्त नागरिक हे सगळ्यात जास्त जबाबदार आहेत.
यातील 'रहदारीच्या नियमांच्या बाबतीत पुणेकरांची शिस्त वाखाणण्यासारखी नाही' हे गृहीतक (एके काळी पुण्यात वाढल्यामुळे निदान मला तरी) पटण्यासारखे आहे. मात्र प्रश्न तेवढ्यावर थांबत नाही.
पुणे रहदारीच्या शिस्तीबद्दल कधीच प्रसिद्ध नव्हते. मात्र मी पुण्याचा रहिवासी असताना (सुमारे अठरा वर्षांपूर्वीपर्यंत) ती मोठी समस्या असल्याचे कधी जाणवले नव्हते.
मात्र अलिकडच्या पुणेभेटींत असे आवर्जून जाणवते खरे. आणि पुण्याबाहेर राहून बेशिस्त वाहतुकीची माझी सवय जाणे हा याच्यातील एक घटक असू शकत असला, तरी तो मुख्य किंवा मोठा घटक आहे असे मला वाटत नाही.
मुख्य अडचण अशी आहे, की गेल्या काही वर्षांत पुण्यातील वाहनांची (आणि त्यातसुद्धा माहिती आणि बहिःस्रोतीकरण क्षेत्रातील तेजीच्या काळात अनेकांच्या हाती अचानक भरपूर अर्थार्जनशक्ती आणि क्रयशक्ती आल्यापासून विशेषतः चारचाकी वाहनांची) संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. (यात काही गैर आहे असा दावा नाही.) मात्र, अशा वाढीव वाहनसंख्येला आणि एकंदरीतच वाहतुकीला आवश्यक अशी मूलभूत सुविधासंरचना (इन्फ्रास्ट्रक्चर - यात रस्ते, रस्त्यांची संख्या, रस्त्यांची रुंदी, रस्त्यांची अवस्था, पार्किंगकरिता जागा वगैरे सगळेच आले) ही त्या प्रमाणात काहीच वाढलेली नाही. परिणामी रस्त्यात वाहनगर्दी अटळ, त्यात पादचाऱ्यांसाठी सुविधा असल्यास अपुऱ्या. (शिवाय झपाट्याने लोकसंख्यावाढ आणि त्या प्रमाणात वाढणाऱ्या सहाय्यक सुविधासंरचनेचा अभाव हाही एक घटक असू शकेल काय?) या सगळ्या घटकांमध्ये वाहनचालकांमधील एकंदर अंगभूत (सौम्य शब्दांत मांडायचे झाले तर) शिस्तीचा अभाव केवळ भर घालतो. (एकदा मी एका चौकात पाच वेगवेगळ्या दिशांनी जाणारी पाच वाहने चौकाच्या मध्यभागी एकाच बिंदूपाशी एकत्र आलेली पाहिली. परंतु जवळून पाहिले असता तो अपघात नव्हता असे लक्षात आले. पाचही वाहनचालक एकमेकांच्या आजूबाजूने शांतपणे वाट काढून जाण्यात मग्न होते.)
उपाय म्हणजे शिस्त पाळणाऱ्या नागरिकांनि बेशिस्त नागरिकांना
सार्वजनिकरित्या पुणेरी शालजोडीतील आहेर द्यावा.
हे का होणे नाही याचे कारण यूहन्ना ८:७ हे बायबलमधील सूत्र वाचल्यास लक्षात यावे. ('ज्याने कधीही कोणतेही पाप केले नाही, त्याने पहिला दगड फेकावा.' अर्थात येशूच्या या वचनाशी आम्ही सहमत नाही, परंतु त्याचे विवेचन पुन्हा कधीतरी.)