१) प्रथम कौरव (किंवा सद्य स्थितीत दहशतवादी) शासनास पात्र नाहीत आणि त्यांना शासन करणे अयोग्य असे माझे म्हणणे आहे हा तुम्हा सर्व लोकांचा गैरसमज मी दूर करू इच्छितो, तुम्ही काय म्हणता आहात ते नीट बघा:

"भास्करजींना कसाबला नाचवणारे आणि कृष्ण हे दोघेही सारखेच दोषी आहेत असे वाटत असेल तर नाइलाज आहे. देव करो आणि कसाबला योग्य न्याय मिळो. लादेनला ‘जगत भूषण’ किताब देण्याचा यूनोने अवश्य विचार करावा. कांहीही कारण नसताना शेकडोंनी हकनाक मरण्यास निष्पाप माणसांचा कुठे दुष्काळ आहे?"

माझं म्हणणं पहिल्या पासून आत्तापर्यंत एकच आहे आणि ते म्हणजे सारे प्रश्न मानव निर्मीत आहेत आणि ते सोडवण्यासाठी हिंसा (मग ते युद्ध असो की दहशतवाद) योग्य नाही

जवळजवळ सगळ्यांनी असा समज करून घेतला आहे की मी काल्पनिक जगात आहे आणि त्यांच्या मते दु:शासनाला शासन करायला युद्ध हा पर्याय आगदी योग्य आहे

मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण सगळ्यांनी युद्ध हा पर्याय नाकारला नाही तर युद्ध कशी थांबतील? तुम्ही कल्पना वाटत असली तरी विचार करून बघा युद्ध बेकायदा आहे असा सर्वसंमत जागतिक ठराव झाला तर एका क्षणात ही पृथ्वी युद्ध मुक्त होईल आणि मानवी प्रश्न सोडवण्याचे आपण जास्त बुद्धीमान पर्याय शोधू शकू.

तुम्हाला कल्पना नसेल दुसऱ्या महायुद्धात झालेली हानी भरून काढायला तब्बल दहा वर्ष लागली, किरणोत्सर्गामुळे जैव सृष्टीची अपरिमीत हानी झाली, कोण योग्य आणि कोण अयोग्य हे ठरवायची ही पद्धत?

सध्याची मानव निर्मीत आण्विक क्षमता सत्तर वेळा  पृथ्वीचा संपूर्ण विनाश घडवू शकेल एवढी आहे, कुठे आलो आहोत आपण?

२) आता हा तुमच्या प्रमाणेच सर्वांचा झालेला दुसरा गैरसमज बघा:

"ब्रह्मविद्येच्या (अध्यात्माच्या) दोन इयत्ता आहेत, एक निर्गुण-निराकार आणि दुसरी सगुण-साकार. केवळ निराकार मानायचे तर अपूर्णता येईल. निराकार-सगुण असे ब्रह्म मानायचे तर निर्गुण-साकार ही संकल्पना उभी करावी लागेल किंवा या दोन्हीतून फारतर जीवाचे स्वरूप मांडता येईल. हा प्रांत अर्थातच माझा नव्हे."

तुम्हा सगळ्यानां असं वाटतयं की मी निराकार (किंवा निर्गुण) ही एकमेव कल्पना घेऊन प्रकट जग नाकारतोय. माझं अध्यात्म जीवन विरोधी नाही. माझा तुम्हाला एकच सांगायचा प्रयत्न चालू आहे की अस्तित्व हे आकार आणि निराकार मिळून आहे, आकारात आपण सर्व वेगवेगळे दिसत असलो तरी निराकारात (किंवा स्वरूपात) एकच आहोत . 

मला पुढे जाऊन असं म्हणायचं आहे की मी अध्यात्माकडे अत्यंत मनस्वीपणे आणि कृतज्ञतेने जगण्याचे तत्त्वज्ञान म्हणून बघतो. माझ्या दृष्टीने आकार (किंवा अभिव्यक्ती) हा निराकाराचा फार लोभस पैलू आहे, जोपर्यंत देह आहे तोपर्यंत जीवन सौंदर्यपूर्ण आणि उत्सवपूर्ण असावे आणि आकार निराकारात विलीन होईल तेंव्हा त्या सोहळ्याची पर्मोत्कटता व्हावी ही चित्तदशा निराकाराला जाणण्याची फलश्रुती आहे.

कितीही गहन वाटला आणि आहे असे युगानुयुगे जरी सांगीतले गेले असले तरी अध्यात्म हा सगळ्यात सोपा विषय आहे कारण मूळात तुम्ही निराकार आहात पण ते तुम्हाला फक्त मंजूर होत नाही एवढाच माझ्या दृष्टीने प्रश्न आहे 

३)  अ) "आपण सात मुद्दे प्रस्तुत करून त्यांची उत्तरे मागीतली आहेत. मला वाटते, आपली ‘निराकाराचे अस्तित्व’ प्रणाली निर्दोष असेल, तर ती दुसऱ्यास पटवून देण्यासाठी आक्रमक होणे अनावश्यक आहे".

मी आक्रमक कसा होईन? तुम्ही प्रतिसादाच्या शिर्षकावर जाऊ नका. मूळात आक्रमण नको हेच तर माझं म्हणणं आहे. तुम्ही नीट बघा तुमच्या धारणा चुकीच्या आहेत असं मी म्हणत असल्यामुळे तुम्हाला मी आक्रमक वाटतो आहे.

ब) "अध्यात्म हा प्रांत नवीन खचितच नाही. या विषयावर अजूनही विचारवंत अभ्यास करीत आहेत. गीतेवरच किती तरी जणांनी वेगवेगळ्या दृष्टिकोनातून टीका लिहिली आहे. दहशतवादाशी तिचे असलेले साम्य हा एक नवा दृष्टिकोन समोर आला आहे! आपण उपस्थित केलेले मुद्दे तथ्यपूर्ण असते, तर कुणीही ते नाकारले नसते, एव्हढे मात्र खरे".

तुम्ही काय म्हणता आहात ते नीट बघाः माझ्या मुद्याना तुम्ही नाकारत नाही तर तुमच्याकडे त्याची उत्तर नाहीत. जी उत्तरं दिली गेलीत ती युद्ध हा पर्याय योग्य आहे असा दृष्टीकोन ठेवून दिली आहेत. माझं मूळात म्हणणं असं आहे की हिंसा हा आदी मानवी पर्याय आहे, आपल्याला जास्त बुद्धीमान पर्याय शोधायला हवेत.

क) "आत्मबोध ही वैयक्तिक उपलब्धी आहे अन ती आपल्याला प्राप्त झाली आहे, यापेक्षा अधिक भाग्य ते कोणते"? 

मला निराकार गवसला त्याचे मला अप्रूप आहेच पण इतकी डोळ्यासमोरची गोष्ट तुम्हाला का दिसत नाही याचं मला कुतुहल आहे कारण एकदा का तुम्हाला अमृत गवसले की तुम्हाला कळेल युद्ध खरोखरी व्यर्थ आहे, इथे दुसरा कुणीही नाही आपण स्वतःवरच हल्ला करत आहोत.

संजय