आपले म्हणणे पूर्णतः नाकारत नाही, कारण मला तरी ते बऱ्याच अंशी पटते.
अहो, माझं म्हणणं पहिल्या पासून आत्तापर्यंत एकच आहे आणि ते म्हणजे सारे प्रश्न मानव निर्मित आहेत आणि ते सोडवण्यासाठी हिंसा (मग ते युद्ध असो की दहशतवाद) योग्य नाही...
आपले हे जे म्हणणे आहे, त्यात नाकारण्यासारखे कांहीच नाही. किंबहुना, प्रत्येक युद्धाच्या पूर्वी अनेक प्रकारे युद्ध टाळण्यासाठी अनेक पातळीवर प्रयत्न केले जात असतात.
आपण सगळ्यांनी युद्ध हा पर्याय नाकारला नाही तर युद्ध कशी थांबतील?
ज्या ज्या वेळी युद्धाचे प्रसंग आले, त्या त्या वेळी युद्धाचा पर्याय शोधला जात होताच. जेव्हा सारेच मार्ग खुंटतात, तेव्हा दोन पक्ष एकमेकासमोर उभे राहातात. यात तुम्ही-आम्ही एक बघे म्हणून राहातो, मग तुमची आमची आध्यात्मिक पात्रता कांहीही असो.
माझा तुम्हाला एकच सांगायचा प्रयत्न चालू आहे की अस्तित्व हे आकार आणि निराकार मिळून आहे, आकारात आपण सर्व वेगवेगळे दिसत असलो तरी निराकारात (किंवा स्वरूपात) एकच आहोत .
ब्रह्म सत्य जगत् मिथ्या असे वचन आहेच. आपले हे म्हणणेही त्यामुळे नाकारायचा प्रश्न नाही.
माझ्या दृष्टीने आकार (किंवा अभिव्यक्ती) हा निराकाराचा फार लोभस पैलू आहे, जोपर्यंत देह आहे तोपर्यंत जीवन सौंदर्यपूर्ण आणि उत्सवपूर्ण असावे आणि आकार निराकारात विलीन होईल तेंव्हा त्या सोहळ्याची पर्मोत्कटता व्हावी ही चित्तदशा निराकाराला जाणण्याची फलश्रुती आहे.
सोहळ्याची परमोत्कटता म्हणजे शुद्ध आनंदाची प्राप्ती. मनुष्य योनीतील अत्युच्च प्रतीचे भोग भोगणारे सत् (निराकार अस्तित्व) शील यांना जो शुद्ध आनंद प्राप्त होत असतो, त्याचा विचार तैतिरीय उपनिषदात आहेच. ही अवस्था प्राप्त होण्यासाठी मात्र तेव्हढे संचित पदरी असायला हवे.
तुम्ही नीट बघा तुमच्या धारणा चुकीच्या आहेत असं मी म्हणत असल्यामुळे तुम्हाला मी आक्रमक वाटतो आहे.
आपल्या धारणात अंतर नाही, तर ते व्यक्त करण्यात आहे. कृपया असे समजू नका की साऱ्यांनाच या धारणा पचनी पडतील. जी गोष्ट माझ्यासाठी फार सोपी आहे, तीच गोष्ट इतरांसाठीही तितकीच सोपी नसते, हा निसर्गन्याय आहे.
हिंसा हा आदी मानवी पर्याय आहे, आपल्याला जास्त बुद्धीमान पर्याय शोधायला हवेत.
अहिंसा-सत्य-अक्रोध आदी दैवीसंपत्ती सांगितली गेली आहे. तेव्हा आपले हे म्हणणेही रास्त आहे. तरीही, 'सर्व्हाइव्हल ऑफ दि फिटेस्ट' हा प्रस्थापित निसर्गनियम देहधाऱ्यांना लागू होतो. यातच स्पर्धा, पर्यायाने शरीर, मन, वाचा या स्तरावर युद्ध आलेच. बुद्धिमान पर्यायाला सामुदायिक मान्यता मिळायला हवी आणि नेमकी तीच अडचण आहे.
इतकी डोळ्यासमोरची गोष्ट तुम्हाला का दिसत नाही याचं मला कुतुहल आहे
ज्याच्या त्याच्या मनाच्या सशक्ततेचे, बुद्धीच्या क्षमतेचे व शुभ संचिताचे हे फलित असल्याने, प्रत्येकाला ही गोष्ट दिसलेच असे गृहित धरता येत नाही. शाब्दिक जाणिव आणि चित्ताची नित्य अनुभूती या दोन भिन्न गोष्टी आहेत, असे मला अनुभवाने वाटते. असो.
(संजयजी, ही चर्चा खूप रंगली. विचारांची देवघेव झाली. तथापि, कांहींना ही चर्चा उदासीनता आणणारी ठरत आहे. आपण आता येथेच विराम घेऊ या. पुन्हा केव्हा तरी योग येईलच तेव्हा अधिक. लोभ असावा.)