कुठल्याही ठिकाणची खाऊ गल्ली हा आपला वीक पॉइंट आहे. खाण्याइतका दुसरा कोणताही छंद मला नाही. वेगवेगळ्या प्रकारचं वेज, नॉनवेज, वेगवेगळी हॉटेल्स ट्राय करणे या सारखी दुसरी आनंदाची गोष्ट नाही. मी ठाणेकर आहे. त्यामुळे ठाणे आणि मुंबईतील काही फेमस ठिकाणे सुचवीत आहे.

१. तहसीलदार कचेरी मिसळ : जुन्या ठाण्यातील तहसीलदार कार्यालयाचे कँटीन, येथील मिसळ फारच प्रसिद्ध आहे. जवळ जवळ चाळीस ते पन्नास वर्षे इतिहास असलेली आणि बऱ्याच नामवंत व्यक्तींनी चाखलेली ठाण्यातील मिसळ म्हणजे समस्त ठाणेकरांचा आणि मुंबईकरांचा वीक पॉइंट आहे. माझ्या वडिलांनी त्यांच्या लहानपणी खाल्लेली इथली मिसळ आणि आज मिळणारी मिसळ यांच्या चवीत काडिचाही फरक झालेला नाही. बाळासाहेबांपासून राज ठाकरेंपर्यंत, तसेच नामवंत मराठी कलाकार  आणि अनेक दिग्गज ठाण्यात आल्यावर मामलेदारची मिसळ खाल्ल्यावाचून परतत नाहीत. 'मामलेदारची मिसळ' या नावाचा उल्लेखच ठाण्यात पुरेसा आहे. ज्यांना तिखट खाण्याची आवड आहे, त्यांच्यासाठी तर मामलेदारची मिसळ म्हणजे केवळ पर्वणीच आहे. ठाण्यात येण्याचा योग आल्यास आवर्जून जाऊन खायला हरकत नाही. ठाणे पश्चिम, स्टेशनपासून पाच मिनिटे चालत अंतरावर तहसीलदार कचेरीचे कँटीन आहे. अवश्य खाऊन पहा.

२. हॉटेल मालवण : ठाणे पाचपाखाडी येथील हॉटेल मालवण माशांच्या वेगवेगळ्या व्हराईटीज साठी प्रसिद्ध आहे. येथील चिंबोरी मसाला, कुर्ल्या मसाला हे विशेष. ठाणे पश्चिम, स्टेशनपासून  पंधरा मिनिटे चालत अंतरावर किंवा रिक्षेने गेल्यास पाच मिनिटे अंतरावर हॉटेल मालवण आहे.

३. महेश लंच होम :  मासे प्रेमींसाठी आणखी एक प्रसिद्ध ठिकाण. थोडे नव्या स्टाईलचे आणि पॉश कॅटॅगरीत मोडणारे महेश लंच होम जरासे महागडे आहे. पण चव अतिशत उत्तम. क्रॅब सूप हा मला विशेष आवडलेला प्रकार. ठाणे पश्चिम, स्टेशनपासून  दहा ते पंधरा मिनिटे रिक्षेच्या अंतरावर, जे.के. सिंघानिया हायस्कूलच्या जवळ महेश लंच होम आहे.

४. सायबीणी गोमंतक : दादर पश्चिम येथे, स्टेशनच्या जवळ (जास्तीत जास्त पाच मिनिटे चालत) असलेले हे हॉटेलही चांगलेच जुने आणि माशांकरिता फेमस आहे. फिश थाळी हा माझा येथील आवडता मेनू. येथील सोलकढी तर बेस्ट.

५. तंदूर कॉर्नर : ठाणे पाच पाखाडी, हरिनिवास सर्कलजवळ असलेले तंदूर कॉर्नर हे तंदूरी चिकनसाठी उत्तमच. माझ्या लहानपणी दोन सरदारजींनी एका गाडीपासून सुरुवात करून आता दोन ते तीन मोठे स्टॉल्स टाकले आहेत. बाराही महिने अगदी श्रावणात देखील तुडुंब गर्दी हे तंदूर कॉर्नरचे वैशिष्ट्य. चिकन टिक्का आणि तंदूरी चिकन बेस्ट. ठाणे पश्चिम, स्टेशनपासून  दहा ते पंधरा मिनिटे चालत अंतरावर.

६. कॅनन पावभाजी आणि मुंबईची खाऊगल्ली : कॅनन पावभाजी बद्दल वेगळे काही सांगायची गरज नाही. सी. एस. टी स्टेशनच्या समोर असलेले 'कॅनन पावभाजी' मुंबईत  ज्याला माहित नाही असा माणूस सापडणे कठीण. उत्तम टेस्ट असणाऱ्या पावभाजीचा खमंग वास खाऊन झाल्यावर दिवस भर बोटांना येत राहतो. तिथूनच पुढे गेल्यास मुंबईची खाऊ गल्ली सुरू होते ती अगदी थेट चर्चगेट येईपर्यंत. या खाऊ गल्लीत काय मिळत नाही ते विचारा. आपल्या जिभेचे सर्व चोचले पुरवण्याची काळजी येथे घेतलेली दिसते. पाव भाजी, वडा पाव, चाट पासून मसाला डोसा, पुलाव, चायनीज, साऊथ इंडियन फ़ूड, वेगवेगळ्या प्रकारची जूसेस, इथपर्यंत या खाऊगल्लीत आपल्याला सगळेच मिळते आणि ते ही वाजवी दरात. अर्थात मुंबईतील सर्व ठिकाणे इथे नमूद करायला काही दिवस जातील. मुंबईत काय खायला मिळत नाही हाच मोठा प्रश्न आहे....

७. मणिज हॉटेल, माटुंगा पूर्व : रुइया कॉलेज जवळील 'मणीज' हे साऊथ इंडियन फूड आणि कॉफीसाठी खास प्रसिद्ध. कायम गर्दी असलेले आणि कॉलेज क्राऊडने भरलेले 'मणिज', येथे जाऊन  टाईमपास करायलाही खूप मजा येते.

८. कुंज विहार, ठाणे : जंबो वडापावची कन्सेप्ट या कुंज विहार हॉटेलची. माझ्या मते आता वडापावची किंमत सहा ते सात रुपये असावी. मी येथील जंबो वडापाव दोन रुपयांचा असल्यापासून खाल्लेला आहे. चव अतिशय उत्तम. आधी छोटे हॉटेल असणारे कुंज विहार आता फारच मोठे आणि पसरले आहे. ठाण्यात सगळीकडेच बटाटा वडा अतिशय उत्तम मिळतो. राजमाता वडा (राम मारूती रोड, ठाणे), दुर्गा स्नॅक्स, (गोखले रोड, ठाणे), श्रद्धा स्नॅक्स (घंटाळी, ठाणे), गजानान वडावाला (विष्णूनगर, ठाणे), कुलकर्णी वडावाले (स्टेशन रोड, ठाणे) ही त्यातील काही महत्त्वाची फेमस ठिकाणे.

असो, अजुनही बरीच मोठी यादी आहे. पुण्यातील हॉटेल्सही अतिशय उत्कृष्ट आहेत. त्यांची यादीही बरीच मोठी होईल. टिपिकल ब्राह्मणी जेवण हवे असल्यास पुण्यातील 'श्रेयस' हे थाळी रेस्टॉरंट मला आत्तार्यंत सर्वात जास्त आवडलेले आणि खरोखरीच अप्रतीम आहे.

उर्वरीत यादी पुन्हा केव्हातरी देऊ. धन्यवाद, दिलसे.