१. दूरभाष जेव्हां येतो तेव्हांच बोलावें लागतें. आपण कामांत मग्न असल्यास गैरसोय होते विरोपाचें तसें नाहीं. त्याला त्याच वेळीं उत्तर दिलें नाहीं तर चालतें. विरोप आमंत्रितासाठीं सोयीचा आहे.
२. दूरभाष अनुत्तरित राहाण्याची शक्यता कमी. त्यामुळें आमंत्रकासाठीं सोयीचें. विरोप अनुत्तरित राहाण्याची शक्यता जास्त. काम तातडीचे असल्यास आमंत्रकासाठीं गैरसोयीचें.
३. दूरभाषवर बोलतांना मोठ्यानें बोलल्यास बोलणारांच्या (दोन्ही बाजूंच्या) आजूबाजूच्यांना ध्वनिप्रदूषणाचा उपद्रव होतो. विरोपात नाहीं.
४. भिडस्त माणसें एखाद्या विषयावर स्पष्ट बोलणें टाळूं शकतात. परंतु तीच भिडस्त व्यक्ती बऱ्याच वेळां विरोप परखडपणें लिहिते असा माझा तरी अनुभव आहे.
५. दूरभाषवर खोटें बोललेलें ऐकणाऱ्याला कळण्याची शक्यता असते. विरोपाचें तसें नाहीं.
६. बऱ्याच वेळां बोलणाऱ्याचा स्वर त्याच्या शब्दापेक्षां बरेंच कांहीं सांगून जातो. विरोपाचें तसें नाहीं.  इथें विरोपाला मर्यादा आहे.
७. बहुतांश लोक बोलतांना शब्दाचा नेमका वापर करीत नाहींत. परंतु परिचयामुळें वाक्याचा अर्थ ऐकणाराला बरोबर कळतो. विरोपात तसें होण्याची शक्यता कमी. पण कमी प्रमाणांत कां होईना पण एकेका टोळक्याची विरोपाची विशिष्ट परिभाषा असते. शब्दांचे प्रचलित अर्थापेक्षां वेगळे अर्थ बरोबर लावले जातात. म्हणजेच दूरभषवरील संभाषणकलेप्रमाणेंच विरोपाची संभाषणकला देखील कमवावी लागते.
८. दूरभाषवर कमींत कमी वेळांत नेमक्या शब्दांत बोलणें ही जशी कला आहे तशीच विरोप लिहिणें ही देखील कला आहे.
९. दूरभाषवरील ध्वनिमुद्रित संभाषणाचा पुरावा न्यायालयांत ग्राह्य धरीत नाहींत वा संशयाचा फायदा बोलणारांस मिळतो. परंतु कागदावरील विरोपाची छापील प्रत मात्र पुआवा म्हणून ग्राह्य धरली जाते.
१०. महत्त्वाची गोष्ट म्हणजे दूरभाष हा नक्कीच विरोपापेक्षां महाग आहे.

सुधीर कांदळकर.