कॅसेटमध्ये गाणी रेकॉर्ड करण्याच्या व्यक्तिरिक्त आम्ही भावंडांनी शाळा - कॉलेजमध्ये असताना बऱ्याच मजा केल्या आहेत. पूर्वी आयताकृती टेप होता आईकडे तो पिशवी ज्याप्रमाणे हातात धरतो तसा उचलून इकडे तिकडे फिरवता यायचा. हलकाफुलका छान होता तो टेप. या टेपला रेकॉर्ड करण्यासाठी जो छोटा माईक होता तोही मला आठवत आहे. मस्त होता. या टेपच्या कॅसेटमधली गाणे पुढे मागे करण्यासाठी ज्या पट्या होत्या त्या हार्मोनियमच्या सारेगमच्या पट्यांप्रमाणे होत्या. या टेपमध्ये  आम्ही द्वंद्व गाणी टेप केली होती. शिवाय जाहिराती. त्यात एक प्रसिद्ध जाहिरात होती शोलेची ती केली होती. कुणी गाणे रेकॉर्ड करायच्या वेळी आवाज बंद करून ठेवायचा. सुरवातीला गाणी टेप करून पाहिजे ते गाणे शोधण्यात खूप वेळ जायचा. गाण्याच्या पुढे मागे जाऊन बघणे किंवा ते कॅसेटच्या दुसऱ्या बाजूला असेल म्हणून परत कॅसेट उलटी करून बघणे. नंतर आम्ही गाण्यांची यादी करून ठेवायला लागलो. गाण्याला तबल्याची साथ देण्यासाठी भांडी चमचे किंवा टेबलावर हाताने ठेका द्यायचो. असे गाणे ऐकताना खूप छान वाटायचे. कुणी भांडत असेल तर हळूच तिथे टेप लावून ते रेकॉर्ड करायचो. अशा अनेक गमतीजमती या लेखामुळे आठवल्या.