आजच्या म. टा. मध्ये वाचलेली बातमी माहितीसाठी जशीच्या तशी येथे देत आहे.
म. टा. तील मूळ बातमी : मराठीत होणार न्यायाधीशांची परीक्षा
दि. १४ मे २०१०
मॅजिस्ट्रेट आणि दिवाणी कोर्टाच्या न्यायाधीश पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग घेत असलेली परीक्षा आता मराठी भाषेतून देता येणार आहे. या व्यवस्थेमुळे कायदेतज्ज्ञ असलेल्या अनेक मराठी तरुणांना फायदा होणार आहे.
लोकसेवा आयोगाची मॅजिस्ट्रेट आणि दिवाणी कोर्टाच्या न्यायाधीश पदासाठीची परीक्षा मराठी भाषेतून घेण्यात यावी, अशी मागणी बऱ्याच दिवसांपासून करण्यात येत होती. प्रशांत गिरी यांनी याचसंदर्भात हायकोर्टात एक याचिका केली आणि देशातील अनेक राज्यात मॅजिस्ट्रेट आणि दिवाणी कोर्टाच्या न्यायाधीश पदासाठी स्थानिक भाषेत परीक्षा देण्याची सोय असल्याचे निदर्शनास आणले. या पार्श्वभूमीवर मुंबई हायकोर्टाने मॅजिस्ट्रेट आणि दिवाणी कोर्टाच्या न्यायाधीश पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग घेत असलेली परीक्षा मराठीतूनही घेण्यात यावी, असा आदेश दिला.