वाहतुकीच्या समस्येला तीन वर्ग जबाबदार आहेत असे वाटते
१. सरकार - रस्ते सुविधा, पोलिस, आर टी ओ
२. वाहनचालक नागरिक - तुम्ही-आम्ही, नववाहनचालकांचे पालक
३. वाहन उत्पादक
यातले सरकार आणि वाहनचालक यांबद्दल चर्चेचा चोथा झालेला आहे असे वाटते.
वाहन उत्पादकांविषयी मला सविस्तर मत मांडायचे आहे.
१. प्रथमतः वाहन उत्पादक हे नफा कमावण्यासाठी बाजारात उतरले आहेत हे एकदम मान्य. उद्योगधंदा म्हणजे अन्नछत्र नाही. याबद्दल माझे तीळमात्रही दुमत नाही.
२. अर्थात वाहने आणि वाहन उत्पादक धंदे हे नागरिकच चालवत असतात. तसेच सरकारदरबारी उद्योगधंदा हीसुद्धा एक व्यक्ती असते. (मनोगत वर कोणी वकील असतीत ते याबद्दल सविस्तर सांगू शकतील. )
३. वाहन उत्पादकांनी रहदारी सुधारण्यामध्ये सहभाग घेणे/घ्यायला लावणे गरजेचे आहे असे वाटते.
४. पण नफा कमवायचा सोडून ते असे का करतील? चांगला प्रश्न आहे.
क) सामाजिक जबाबदारी म्हणून
ख) सरकार कर सवलती देईल म्हणून
ग) वाहतूक सुरक्षित होऊन, आम जनता, पर्यायाने वाहन उत्पादकांचे कामगार सुरक्षित होतील
५. हे करायचे कसे?
क) वाहन उत्पादक प्रत्येक वाहन विकताना "वाहन सुरक्षितपणे कसे चालवावे" असे प्रशिक्षण घेतलेल्या गिऱ्हाईकाला काहीतरी सूट देईल (किंमत कमी करणे किंवा चार-दोन तेल-पाणी चकटफू करून देणे असे काहिसे. ) असे प्रशिक्षण दिल्याबद्दल सरकार त्या उत्पादकाला दर गिऱ्हाईकामागे काहीतरी कर सवलत देईल.
ख) शाळा-कॉलेजातून नवीन वाहनचालकांना "सुरक्षित चालकपणाचे" प्रशिक्षण देण्याकरताही करसवलत देता येईल.
आता भारताबद्दल बोलताना अश्या व्यवस्थेमध्ये चिक्काऽर भ्रष्टाचार होईल हे सांगायला कोणा तज्ज्ञाची गरज नाही. आणि हा बदल एका रात्रीतही होणार नाही. "दर दहा वर्षांनी एक नवीन पिढी येते" हे जर का खरे असेल. तर ज्या दिवसापासून वरील उपाय सुरू होतील त्यानंतर अंदाजे दहा वर्षांनी वाहतुकीत फरक जाणवेल असे वाटते.
आज जे "सराईत" वाहनचालक आहेत ("सराईत" नंतर "गुन्हेगार" वाचायची आपल्याला इतकी सवय लागली आहे की तो शब्द वापरायची सोय उरली नाही. ) त्यांच्या सवयी तर आता बदलणे महाकर्मकठीण काम आहे. त्यामुळे त्यांना सोडून द्या (तसेही ते बेफाम सुटलेलेच असतात. ) नवीन पिढीवर लक्ष केंद्रित करा.
===
वैयक्तिक दृष्ट्या आपण खालील गोष्टी करू शकतो-
क) नवीन पिढीला जबाबदारीने वाहन चालवायला शिकवा.
ख) त्यांच्यासमोर नियम मोडू नका. एरवीसुद्धा नियम मोडलेच पाहिजेत अशी काही बळजबरी नाही.
ग) इतर कोणी नियम मोडत असेल तर ते मुलांना दाखवून ते कसे चुकीचे आहे हे ठसवून द्या. आणि सर्वात महत्त्वाचे -
घ) रस्त्यावर (विशेषतः महामार्गावर) गाड्यांखाली येऊन अनेक प्राणी मरून पडलेले दिसतात. ते मुलांना दाखवा. आणि एक प्रश्न विचारा "तुला बेजबाबदारपणे गाडी चालवून असे मरायचे किंवा दुसऱ्या माणसाला असे मारायचे आहे का? "