स्वाक्षरीला भाषा असायलाच हवी असा कुठेही नियम आहे असे वाटत नाही. स्वाक्षरी म्हणजे एखादे चित्र किंवा खूणही असू शकते. फक्त प्रत्येक वेळेस तुम्ही तेच चित्र किंवा तीच खूण त्याच "वळणाने" काढू शकला पाहिजे. (जपानी-चिनी भाषा या चित्रभाषा आहेत का? ते लोक कशी स्वाक्षरी करतात?)

स्वाक्षरीला भाषेचा नियम लावला तर भारतातल्या अधिकाऱ्याला जपानी भाषा वाचता येत नाही म्हणून तो जपानी भाषेत सही केलेल्या जपानी माणसाला इमिग्रेशन चा शिक्का देणार नाही का? आता समजा मी मराठी असूनही लहानपणापासून जपानी भाषेतच सही करत असेन तर काय करणार?

वास्तवातले उदाहरण - माझा एक काका मोडी लिपीत स्वाक्षरी करीत असे.

स्वाक्षरी ही ओळख पटवण्याची खूण आहे. स्वाक्षरी हीच ओळख नव्हे.

आज अनेक ठिकाणी छायाचित्र आणि सरकारी ओळखपत्र असणे गरजेचे असते. त्यामुळे स्वाक्षरीचे स्थान गौण नसले तरी दुय्यम निश्चितच झाले आहे.

फार जुन्या काळी (प्रभू रामचंद्र ते छ. शिवाजी महाराज) अंगठी किंवा मुद्रा वापरत असत (लाखेवर किंवा शाईत). आधुनिक स्वाक्षरी हे त्याचेच एक रुपांतर आहे असे वाटते. आजही सरकार जेव्हा एखाद्या ठिकाणी टाळे ठोकते तेव्हा लाखेवर ठसा उमटवायची पद्धत कायम आहे असे वाटते.

त्यामुळे स्वाक्षरीला कोणी भाषेचा हट्ट धरल्यास त्याचे अज्ञान प्रेमळपणे दूर करावे.

(अर्थातच मी काही अज्ञान प्रकट केले असल्यास माझे अज्ञान दूर करणाऱ्याचा मी शतशः आभारी असेन.)