स्वाक्षरीला भाषा असायलाच हवी असा कुठेही नियम आहे असे वाटत नाही. स्वाक्षरी म्हणजे एखादे चित्र किंवा खूणही असू शकते. फक्त प्रत्येक वेळेस तुम्ही तेच चित्र किंवा तीच खूण त्याच "वळणाने" काढू शकला पाहिजे. (जपानी-चिनी भाषा या चित्रभाषा आहेत का? ते लोक कशी स्वाक्षरी करतात?)

म्हणजे, पु.‌लं.च्या "म्हैस"मधील बगूनाना पंचनाम्यावर अत्यंत गिचमीड अशा अक्षरात "नाना फडणवीस" अशी सही करतात, हुबेहूब तशीच, त्याच वळणाची सही ते इतरत्र सर्वत्र करू लागले, तर ती "त्यांची स्वाक्षरी" म्हणून ग्राह्य व्हावी काय?

किंवा, दुसऱ्या एखाद्या व्यक्तीची स्वाक्षरी मी हुबेहूब तशी, त्याच वळणाने सर्वत्र करू लागलो, तर कायद्याच्या कचाट्यात न सापडण्यासाठी ती "माझी स्वाक्षरी" आहे म्हणून मी दावा करू शकेन काय?

अधिकृत सरकारी कागदपत्रांवर मी माझ्या हस्ताक्षरात "दाम करी काम" अशी सही अधिकृतरीत्या करू शकेन काय?

किंवा, चिन्हे चालत असतील, तर मी (निवडणूकचिन्हांप्रमाणे) माझी अधिकृत सही "विझलेली मेणबत्ती" किंवा "पंक्चरलेली सायकल" अशी (चित्ररूपात) करू शकेन काय? (चटकन काढण्यासारखी याहून सोपी चिन्हे शोधायला हवीत. तूर्तास अश्लील किंवा सामाजिकदृष्ट्या आक्षेपार्ह चिन्हांचा विचार केलेला नाही.)

शंका प्रामाणिक आहेत. खात्रीलायक उत्तरांचे स्वागत आहे.