स्वाक्षरीला भाषा असायलाच हवी असा कुठेही नियम आहे असे वाटत नाही.
स्वाक्षरी म्हणजे एखादे चित्र किंवा खूणही असू शकते.
याबद्दल सर्वसाधारण काही नियम आहे असे वाटत नाही. किंबहुना परिस्थितीप्रमाणे नियम बदलू शकतो. काही ठिकाणी काही विशिष्ट व्यवहारांत स्वाक्षरीचे बाबतीत केवळ भाषेबद्दलच नव्हे, तर स्वाक्षरीच्या पद्धतीबद्दलही (फॉर्म्याट अशा अर्थी) काही अपेक्षा, नियम किंवा बंधने असू शकतात.
उदाहरणे:
१. अमेरिकेत एकदा एक ब्रोकरेज खाते बंद करताना त्या खात्यातील शेअर्स दुसऱ्या ब्रोकरेज खात्यात हलवण्याचा प्रसंग आला. अशा वेळी सर्वात सोपा मार्ग म्हणजे जे खाते बंद करायचे त्या खात्याच्या ब्रोकरकडून त्या शेअर्सचे प्रमाणपत्र घेणे, व ते प्रमाणपत्र एखाद्या चेकप्रमाणे दुसऱ्या ब्रोकरकडील खात्यात जमा करणे. इथे ते जमा करताना त्यावर सही करण्याचा प्रश्न आला.
एरवी मी नेहमीच्या व्यवहारांत (अगदी चेकवरसुद्धा) कशाही प्रकारे (उदा. नावाची आद्याक्षरे अधिक संपूर्ण आडनाव, किंवा संपूर्ण प्रथम नाव अधिक मधल्या नावाचे आद्याक्षर अधिक संपूर्ण आडनाव, किंवा इतर कोणतीही पद्धत) सही करत असलो, तरी या ठिकाणी ,संपूर्ण प्रथम नाव अधिक संपूर्ण आडनाव, तेही रोमन लिपीत आणि रनिंग हँडमध्ये, अशाच प्रकारची सही अपेक्षित आहे असे सांगण्यात आले.
२. अमेरिकन नागरिकीकरणाच्या फॉर्ममध्ये आणि अमेरिकन नागरिकीकरण प्रमाणपत्रावरसुद्धा काहीशी अशाच प्रकारची सही (संपूर्ण नाव, रोमन लिपीत आणि रनिंग हँडमध्ये) अपेक्षित आहे. (बहुधा अमेरिकन पासपोर्टवरील अथवा त्याच्या आवेदनपत्रावरील सहीसुद्धा अशाच प्रकारची असणे अपेक्षित आहे असे वाटते, परंतु याबद्दल खात्री करून घ्यावी लागेल.)
अशी स्वाक्षरी करणारी व्यक्ती एरवी इतर व्यवहारांत आपली स्वाक्षरी कशी करते याच्याशी याचा काहीही संबंध नाही.
चूभूद्याघ्या.