असो तर येथेच, पहील्यांदाच मी स्पष्ट करतो की   येथे फक्त ५ ज्ञानेंद्रीये   यांना अनुभवता येणारे अनुभव प्रमाण मानले जातील!  

नाक, कान, त्वचा, जीभ आणि डोले एवढीच ज्ञानेंद्रिये आहेत असे आपण समजता. कधी कधी ज्ञानेंद्रिये चुकीचे ज्ञान देतात त्याचे काय? उदाहरणार्थ, स्वप्न आणि मृगजळ. पैकी स्वप्न कोणत्या इंद्रियाने जाणवते? ते खोटे असते हे उत्तर नाही. स्वप्न सुरू असताना ते खरेच असते. जाग आल्यावर भास झाल्याचे जाणवते. मृगजळ दुरून खरेच वाटते.

त्यापेक्षाही "झकवती चामाचे डोळे" (चर्मचक्षू फसवतात) याचे उदाहरण म्हणजे "पृथ्वीभोवती सूर्याचे भ्रमण" हे डोळ्यांना दिसत असूनही खरे नाही हे आपण आज जाणतो. म्हणजे एका ज्ञानेंद्रियाने होणारे ज्ञान मिथ्या आहे हे आपल्याला कोण सांगते? तर बुद्धी. ऍरिस्टार्कसपासून (इ. स. पू. २५०) ते कोपर्निकस, केपलर, गॅलिलिओ या सर्वांनी बुद्धीचा वापर करून हा भास आहे हे सिद्ध केले. म्हणजेच या सर्व इंद्रियांना "ओव्हरराईड" करणारे "बुद्धी" हे सर्वश्रेष्ठ ज्ञानेंद्रिय आहे.

म्हणजे पाच ज्ञानेंद्रियांनी होणारे ज्ञान संपूर्णपणे ग्राह्य मानणे निदान एका बाबतीत चुकीचे ठरले.  गेली शेकडो वर्षे अध्यात्मिक लोक याच प्रकारचा तर्क लावून युक्तिवाद करतात. स्वप्न, मृगजळ आणि निदान ज्ञानेश्वरीत लिहिल्याप्रमाणे सूर्याचे पृथ्वीभोवतीचे भासमान "फिरणे" याप्रमाणेच सध्याची द्वैताची अवस्था ही भासमान आहे हा त्यांचा युक्तिवाद असतो.  "जागृत"अवस्था हेच एक स्वप्न असल्याने त्यात द्वैत जाणवते. या स्वप्नामधून जाग आल्यावर अद्वैत अवस्थेचा अनुभव येईल असे सांगतात ते निदान तर्काच्या पातळीवर तरी "खरे असण्याची शक्यता असलेले" समजायला काय हरकत आहे?

"आदावन्ते च यन्नास्ती वर्तमानेऽपी तस्तथा" असे एक गौडपादाचार्यांची कारिका आहे. "जे विश्वाच्या सुरूवातीला नव्हते आणि शेवटीही नसेल ते आताही नाही" हे विधान तर्कशुद्ध नाही असे कोण म्हणेल? मूळ वस्तू एकच आहे, बाकी सजीव आणि निर्जीव सृष्टी, त्यातले प्राणी, वनस्पती, ग्रह, तारे, वगैरे ही एकाच वस्तूची रूपे आहेत. जशा पाण्यावरच्या लहरी किंवा सूर्याची किरणे, अश्या प्रकारचा युक्तिवाद अध्यात्मिक लोक करतात तो दुर्लक्ष करण्यासारखा नाही.

असो. प्रतिसाद बराच लांबला. फक्त एका मुद्द्याबद्दल लिहायचे होते.