(मिसळपाव संकेतस्थळावर याबाबत लेख लिहिणारा लेखक "धनंजय" हा मीच आहे. येथे "धनंजय" आयडी उपलब्ध नाही, म्हणून "डीजे" आयडी वापरलेला आहे. हा प्रतिसाद लिहिणारा वेगळा नसल्याची शहानिशा तेथे "धनंजय" आयडीला विचारून करून घेता येईल. )

काही शब्दस्वरूपांच्या मागे-पुढे पाणिनी "अनुबंध" लावतो, हे खरे आहे. पण त्याचे कारण "अक्षर सुरक्षित ठेवणे" असे नव्हे.
उदाहरणार्थ : भू सत्तायाम् : "असणे" या अर्थी भू धातू वापरतात. येथे "भू"या मागे-पुढे कुठलेच अनुबंध नाहीत, आणि "भू"हे अक्षर चांगले सुरक्षित राहिलेले आहे.

"डु-कृ-ञ् करणे" मध्ये
"डु"चा संदर्भ -> कृ धातूला "त्रिम" प्रत्यय लागू शकतो. संस्कृतात "कृत्रिमम्" हे रूप दिसते. (लक्षात असू द्या "भूत्रिमम्" असे रूप दिसत नाही, म्हणून "भू"ला तो अनुबंध नाही. )
"ञ् "चा संदर्भ : "कृ"धातू उभयपदी आहे, आणि करण्याचे फळ जर कर्त्याला मिळत असेल, तर धातूचे रूप आत्मनेपदी होते (उदाहरणार्थ "सः कुरुते" = तो करतो, आणि करण्याचे फळ त्यालाच मिळते); 
मात्र करण्याचे फळ जर अन्य कोणाला मिळत असेल तर धातूचे रूप परस्मैपदी होते (उदाहरणार्थ : "सः करोति" = तो करतो, आणि करण्याचे फळ दुसऱ्या कोणाला मिळते)

लक्षात असू दे, की "भू" धातूचे रूप नेहमीच परस्मैपदी होते, उदाहरणार्थ : "सः भवति" - त्याला "ञ्" अनुबंध नाही.

शंकराचार्यांनी त्या ब्राह्मणाला "मृत्युकाली उपयोग नाही" म्हटले असले, तरी शंकराचार्यांना पाणिनीचा धातुपाठ उत्तम ओळखीचा होता. उपनिषद्भाष्यात "सत्यमेव जयते" वाक्याच्या संदर्भात ते म्हणतात - "जयति इत्यर्थः" - (भाष्याची प्रत या क्षणी माझ्यापुढे नाही, क्षमस्व.) उपनिषद्वचन सोडता "जि" धातूचे "जयति" असेच रूप होते, कारण पाणिनीच्या शास्त्रात (जि जये १।८४२) त्याला फक्त परस्मैपद होते, हे शंकराचार्यांना मान्य आहे. म्हणून वाअकांना अर्थपूर्ण असा "जयति" शब्द त्यांनी या असामान्य "जयते" शब्दाचा शब्दार्थ म्हणून दिलेला आहे.