वैज्ञानिक (खरेतर विज्ञानवादी) यांचे असे मत असते, की ही सर्व सृष्टी हे पदार्थ, उर्जा वगैरे व्यक्त गोष्टींनी बनलेली आहे. ही सर्व भूते काही विशिष्ठ नियमांनी बांधलेली असतात, आणि ते नियम शोधून काढणे हे विज्ञानाचे काम आहे. सध्या विज्ञानातही शाखा-शाखांमध्ये परस्पर विरोध जाणवू लागला आहे . त्या सर्व शाखां 'पलिकडे' विज्ञानाचे, किंवा या जड सृष्टीचे एकत्व (युनिफाईड थिअरी) शोधण्यात वैज्ञानिक आपली सर्व प्रज्ञा (जी त्या जड नियमांनिच बांधलेली आहे) खर्ची घालत आहेत. तर त्या अर्थाने विज्ञान हे अद्वैताकडे जाण्याचा रस्ता आहे... आणि विज्ञान फक्त जडाचेच अस्तित्व मानते, म्हणजे त्याला जडाद्वैत म्हटले पाहिजे.

आध्यात्मिक लोक, यांच्या मते सुक्ष्म हेच खरे अस्तित्व. जाणीव त्यातूनच येते. आणि भौतिक नियम पाळणारी जड सृष्टीही त्यातूनच येते. त्यांच्या मतेही सुक्ष्म-जड, मी-तुम्ही, यांत अद्वैतच आहे. पण ते पदार्थात नसून सुक्ष्मात आहे (म्हणजे जाणीवेच्या पातळीवर).

आता जर अद्वैतच असेल, तर ते जड किंवा सुक्ष्म असू दे ना! काय फरक पडतो? कदाचित त्या एकाच सत्याला हे दोघे जड किंवा सुक्ष्म म्हणत असतील!

आता कितीही डोकेफोडी केली तरी जाणीव ही रासायनिक प्रक्रीयेत बसवता येत नाही. तसेच मेंदुच्या बाहेरही जाणीवेचे अस्तित्व दाखवून देता येत नाही (म्हणजे रासयनिक प्रक्रीया नाही असेही नाही).

मग जर कोणीच धडपणे सांगू शकत नसेल, तसेच अंतीमतः काहितरी एकच 'निर्वचनीय' आहे असे दोघांचे मत असेल, तर भांडण कसले आहे?