मात्रावृत्तांना नावे असतात, हे खरेच मला माहीत नव्हते. किंवा असेही असेल की, केवळ अक्षरगणवृत्तांनाच नावे असतात, मात्रावृत्तांना नसतात, हे समीकरण माझ्या मनात कुठेतरी ठाण मांडून असावे. (आणखी एक हेही कारण असू शकेल की, तुलनेने अक्षरगणवृत्तातच लिहायला मला अधिक आवडते. परिणामी, मात्रावृत्तांकडे (म्हणजे त्यांच्या नावांकडे दुर्लक्ष झाले असावे. )
तुम्ही इथे ज्या तीन वृत्तांची उदाहरणे दिलेली आहेत, त्यापैकी शेवटचे उदाहरण 'आनंदकंद'चे आहे. आनंदकंद हे मात्रावृत्त नसून अक्षरगणवृत्त आहे.
समजा, अक्षरगणवृत्तातील कोणत्याही एका वृत्तात (उदाहरणादाखल आपण आनंदकंद हेच वृत्त घेऊ या) गझल (किंवा कविताही) लिहिली गेली, तर त्या वृ्त्ताचा जो रचनाबंध ठरलेला आहे, त्याच रचनाबंधात प्रत्येक(च) कवीची गझल (किंवा कविता) आली पाहिजे... किंबहुना ती आपोआपच येईल. कारण आनंदकंद वृत्ताचा रचनाबंध ठरलेला आहे.
उदाहरणार्थ ः
१) आनंदकंद ऐसा हा हिंद देश माझा (कविवर्य आनंदराव टेकाडे)
२) स्वामी तिन्ही जगांचा आईविना भिकारी (कविवर्य यशवंत)
३) केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली (कविवर्य सुरेश भट)
४) जेव्हा तिची नि माझी चोरून भेट झाली (कविवर्य मंगेश पाडगावकर)
५) स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केव्हा (कविवर्य म. पां. भावे)
आता, टेकाडे असोत, यशवंत असोत, भट असोत, पाडगावकर असोत की भावे असोत... पाचही जणांच्या या रचना एका एकसारख्याच रचनाबंधात आहेत, हे लक्षात येईल. कवी कोणताही असो, अक्षरगणवृत्तात लिहिताना तो ज्या कोणत्या वृत्तात लिहील, त्या वृत्ताचा रचनाबंध तो बदलू शकत नाही. (दोन लघूंचा एक गुरू, एका गुरूचे दोन लघू ही बाब वगळता. कारण तसे करण्यास परवानगी आहे! )
या बाबीमुळे अक्षरगणवृत्तातील (कोणत्याही कवीची) कोणतीही कविता स्वतःच तिचे वृत्त कोणते आहे, ते सांगत असते. हे सूत्र मात्रावृत्तांमधील कवितांच्या संदर्भात ठामपणे लावता येणार नाही.
कारण, उच्चारणाच्या दृष्टीने आणि लयीच्या दृष्टीने मी ज्या मात्रावृत्तात रचना करीन, त्याच आणि तशाच शब्दक्रमाच्या मात्रावृत्तात आणखी कोणी कवी (एकमेकांच्या नकळत) तशीच रचना करेल, हे संभवत नाही. कारण मात्रावृत्तात (अक्षरगणवृत्ताप्रमाणे) शब्दांचा क्रम अजिबातच निश्र्चित नसतो. कारण अशी अनेक मात्रावृत्ते त्या त्या कवीच्या मगदुराप्रमाणे आणि वकुबाप्रमाणे बनू शकतात. (मग या मात्रावृत्तांना कोण(कोण)त्या नावांच्या साच्यात बसवायचे? )समजा मी मात्रावृत्तात एक रचना केली...
१) व्याकुळ होतो आठवणींनी प्राण कितीदा...
ठेवलीस रे तू याची पण जाण कितीदा?
(आता येथे पहिल्या आणि दुसऱया ओळीतील शब्दक्रम एकसारखाच नाही. पुढील शेरांमध्येही तो या मतल्याप्रमाणे एकसारखाच असायला हवा, असे नाही. तसे बंधनकारकही नाही. कारण मात्रावृत्त! )
समजा आणखी एका कवीने याच शब्दक्रमात मात्रावृत्तात रचना केली...
२) श्रावण आला मात्र कुठे आलीस तशी तू...
कोरडीच का वैशाखासम सांग अशी तू?आता, तुम्ही म्हणता त्यानुसार व चालत आलेल्या पद्धतीनुसार पहिल्या रचनेचे वृत्त ठरेल 'व्याकुळ' आणि दुसऱया रचनेचे वृत्त ठरेल 'श्रावण'. (पहिल्या ओळीचा पहिला शब्द तो तो आहे म्हणून)
पण मग या दोन्ही रचना तर सारख्याच मात्रावृत्तांत आहेत. मग दोन्ही रचनांची वृत्तनामे वेगळी कशी? शिवाय हीच लय घेऊन (मात्र वेगळ्या शब्दक्रमात) आणखीही कुणी कुणी कविता रचेल... मग त्या वृत्तांची नावे कोणती असतील?शिवाय, हीही वस्तुस्थिती असेल की, कोणत्याही दोन कवींना अगदी त्याच शब्दक्रमात मात्रावृत्तात कविता सुचेल असे नाही. किंबहुना असा 'योगायोग' येणारच नाही. आला तरी शंभरात एखादा. (मात्र एक आहे की, आधी प्रसिद्ध झालेली कविता वाचून एखाद्याने त्याच शब्दक्रमात, तशीच लिहायची ठरवली तर हे होऊ शकेल!!!... पण एवढ्या जिकिरीचे आणि चिकाटीचे काम कुणी करणार नाही. ) कारण मात्रावृत्तांची संयुगेच इतकी संमिश्र असतात की व्यक्तिगणिक ती बदलू शकतात. बदलतात.
.........हा घोटाळा अक्षरगणवृत्तात अजिबात होत नाही. वृत्ताचे नाव एकच; पण शब्दक्रमात वैविध्य असे येथे होत नाही.
'आनंदकंद ऐसा...' चे वृत्तही आनंदकंदच आणि ' स्वामी तिन्ही जगांचा ', ' केव्हातरी पहाटे ', ' जेव्हा तिची नि माझी ', ' स्वप्नातल्या कळ्यांनो... ' या चार रचनांचेही वृत्त आनंदकंदच! कारण त्यांचा लघू-गुरूसंदर्भातील शब्दक्रम निश्तिच झालेला आहे आणि सारखाच आहे.
म्हणून मला प्रश्न पडला होता की, मात्रावृत्तांना नावे असतात का, आणि असतील तर त्यांचे नियम (अक्षरगणवृत्ताप्रमाणे) काय आहेत, आणि असायला हवेत...? केवळ पहिला शब्द घेऊन मात्रावृत्तांची नावे निश्चित केली जाऊ शकत नसावीत, असे मला वाटते.
ज्या रचनाबंधामध्ये व्यक्तिगणिक शब्दक्रम बदलत जाईल, त्याला एकच एक वृत्तनाम कसे देता येऊ शकेल, अशी मला शंका आहे.
.......
तुमच्या प्रतिसादामुळे या दृष्टिकोनातून विचार करता आला; त्याबद्दल धन्यवाद.
.......