आपादमस्तक, आसेतुहिमाचल हे समास, तत्पुरुष नाहीत की बहुव्रीही. ज्या समासातले पहिले पद प्रमुख असून अव्यय असते आणि सर्व मिळून तो  सामासिक शब्द क्रियाविशेषण अव्यय बनतो, त्या समासाला संस्कृतमधला  अव्ययीभाव समास म्हणतात.  आ हे अव्यय आणि आपाद हे क्रियाविशेषण अव्यय, म्हणून आपाद हा अव्ययीभाव समास. आपाद हे अव्यय आणि आपादमस्तक हे क्रियाविशेषण अव्यय, म्हणून आपादमस्तक हा अव्ययीभाव समास.
अशा प्रकारे आसेतुहिमाचल हा अव्ययीभाव समास.
आजानुबाहू हा जरा वेगळा प्रकार आहे. राम आजानुबाहू होता; या वाक्यातले आजानु‌ आणि बाहू हे अनुक्रमे विशेषण-विशेष्य, म्हणून या वाक्यातला आजानुबाहू हा, कर्मधारय समास. हा तत्पुरुष समासाचाच एक उपप्रकार असल्याने यात तत्पुरुषप्रमाणेच दुसरे पद प्रमुख. मात्र, दोन्ही पदे प्रथमा विभक्तीत असायला पाहिजेत.
परंतु जर,  आजानुबाहूवरून रामाचा(च) उल्लेख होत असेल, तर तो बहुव्रीही समास. फोड अशी : गुडघ्यापर्यंत
ज्याचे(=षष्ठी विभक्ती) हात (पोहोचतात) असा जो, तो (राम). बहुव्रीहीमध्ये दोन्ही पदे बिनमहत्त्वाची,  तिसऱ्याच गोष्टीचा बोध. म्हणून या समासाला अन्यपदप्रधान बहुव्रीही असेही म्हणतात. आजानुबाहू हा षष्ठी बहुव्रीही आहे.
मराठीतले काही अव्ययीभाव समास : दरमजल. बेलाशक, बरहुकूम, गैरशिस्त, बिनतक्रार वगैरे.
मराठीत, आरंभी अव्यय नसतानाही अव्ययीभाव समास होतात. उदाहरणार्थ : घरोघर, जागोजागी, रात्रंदिवस, दिवसेंदिवस, घरन्‌घर, दिवसानदिवस इत्यादी. या समासातल्या पहिल्या किंवा दुसऱ्या किंवा दोन्ही पदांत काहीतरी बदल झालेला असतो.

मूळ प्रतिसाद सुमारे अडीच वर्षांपूर्वीच वाचला होता, पण त्याचा प्रतिवाद करायला आजचा दिवस उजाडावा लागला. दिरंगाईबद्दल माफी असावी.
--अद्वैतुल्लाखान