चणक नावाच्या पित्याचा पुत्र या अर्थाने चाणक आणि चाणक्य असे दोन तद्धित शब्द बनतात. चणक ही जर स्त्री असेल तर तिचा पुत्र चाणकेय, आणि कन्या चाणकेयी.  चणक हे जर वंशाचे नाव असते तर चाणक(पु) आणि चाणकी(स्त्री) ही तद्धिते बनली असती.  वडलांचे नाव  चणक असलेला विष्णुगुप्त जर स्त्री असता , तर त्याचे नाव चाणकी किंवा चाणक्यी  झाले असते. चणक नावाच्या पित्याच्या मुलाला/मुलीला, चणकायण/चणकायणी  किंवा चनकतनय/तनया अशीही नावे असू शकतात.चणक हे जर डोंगराचे, देशाचे, गांवाचे  किंवा राज्याचे नाव असते तर तेथे राहणारा किंवा वाढलेला विष्णुगुप्त चणकी किंवा चणकीय झाला असता.  इंग्रजीत चणकियन, चणकिश किंवा चणकीज़. चणक जर गांवाचे नाव असेल तर विष्णुगुप्ताचे आडनाव चणककर, चणके, चणकवाला, चणकवाले, किंवा चणकवार झाले असते. चणक हे जर विष्णुगुप्ताने लिहिलेल्या ग्रंथाचे किंवा नियतकालिकाचे नाव असते, तर त्याचा लेखक/संपादक चणककर्ता वा चणककार म्हणवला गेला असता. वगैरे वगैरे. विष्णूगुप्ताचे नाव ज्या अर्थी चाणक्य होते, त्याअर्थी त्याच्या वडलांचे नाव चणक असावे, आणि तसे ते होते. हे चणक एक आचार्य होते.
हेमचंद्राच्या अभिधानचिंतामणीमध्ये विष्णूगुप्ताला  वात्स्यायन, मल्लनाग, कुटिल, चणकात्मज, द्रामिल, पक्षिलस्वामिन्‌, आणि अंगुल अशीही नावे होती असे म्हटले आहे.
महामहोपाध्याय गणपतिशास्त्रींच्या मते त्याच्या गोत्राचे नाव कुटल असल्याने कौटल्य हेच त्याचे खरे नाव. आपण मात्र कुटिलनीतितज्ज्ञ म्हणून 
त्याला कौटिल्य या नावाने ओळखतो. --अद्वैतुल्लाखान