सुंदर मी होणार ही कविता आम्हांला अकरावी एस एस सी ला होती. माझें भाग्य असें कीं त्या वर्षीं आम्हांला कवी प्रफुल्ल दत्त - श्री. द. वि. तेंडुलकर हे मराठी शिकवायला होते. त्यांनीं विविध कवितांतील अनेक सौंदर्यस्थळें उलगडून दाखवलीं आणि आम्हांला कवितेंकडे पाहायची वेगळी दृष्टी दिली. हसत खेळत गप्पा मारीत ते आम्हांला कविता शिकवीत. त्यांच्या वर्गातील अमूल्य क्षण ही लेखमाला वाचतांना दर लेखाच्या वेळीं जागे होतात.

प्रफुल्ल दत्तांच्या दोन आठवणीः
१. संक्रांत झाली कीं मुलें आपल्या आवडत्या सरांना आवर्जून तिळगूळ देत आणि लोकप्रिय सरांजवळ भरपूर तिळगूळ जमत असे. एकदां एक बुजरा मुलगा - चंदू मांजर्डेकर मधल्या सुटीत जिन्यावरून वर येतांना त्याला हे सर खाली उतरत असतांना भेटले. 'खिशांत काय रे तुझ्या बघूं' म्हणून दरडावून त्याचे खिसे तपासले. कधीं न रागावणारे आपले आवडते सर विनाकारण ओरडले म्हणून त्याला वाईट वाटलें आणि तो रडकुंडीला आला होता. कांहीं वेळानें त्याला खिशांत तीळगुळाची पुडी आढळली आणि त्याची कळी खुलली.

२. कवी आरती प्रभू ऊर्फ चि. त्र्यं खानोलकर यांचे देहावसान झालें तेव्हां त्यांची आर्थिक परिस्थिती फार वाईट होती. आमचे सर पण कांहीं सुखवस्तू नव्हते. तरी त्यांनीं त्यांच्या कुटूंबाला रु. ५,०००/- ची मदत केली होती.

अशा अनेक हृद्य आठवणी जागे केल्याबद्दल अनेक धन्यवाद.

सुधीर कांदळकर