'प्रेम एक जुनाट गोंधळ' या प्रसादच्या लेखाशी बहुतांशी सहमत. त्यात काही गोष्टी वाढवाव्याश्या वाटतात.
प्रथम एक खुलासा करतो. जन्माला आलेला प्राणी, एखादी प्रजाति, कुटुंब किंवा 'DNA' स्वतःच्या अस्तित्वाचे, 'आहे' पणाचे रक्षण करत असतो, ते का हे मला सांगता येणार नाही. प्राण्यांना मिळालेल्या 'मूळ प्रेरणा' (बे. इं.) या अस्तित्व टिकवण्याच्याच एक भाग आहे. आहार, निद्रा, भय आणि मैथुन या चारी प्रेरणा स्वतःचा जीव वाचवणे आणि वीण वाढवणे याचाच भाग आहे. पण त्यामागचे कारण मला अजून पुरेसे कळलेले नाही. म्हणजे जीवसृष्टी स्वतःचे अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न का करते हे फारसे समजत नाही. परंतु हे करते मात्र निश्चित. आणि आपल्या अस्तित्वाचे रक्षण आणि वृद्धी, इतर प्राण्यांप्रमाणेच , मनुष्य ही करतो. ही मूळ प्रेरणा लक्षात घेतल्यावर पुढे अनेक गोष्टींचे स्पष्टीकरण करता येते.
प्रेम ही आदीम भावना त्या अस्तित्व टिकवण्याच्या प्रेरणेशी सुसंगत आहे. प्राण्यांमध्ये 'प्रेमाचा अभाव' असतो या प्रसाद च्या मताशी मात्र मला सहमत होता येत नाही. फारफार तर असे म्हणता येईल की मनुष्या एवढी त्यांच्यात प्रेमभावना विकसित नसते. बिरबलाच्या गोष्टित स्त्री आणि तिचा मुलगा असले, तरी काही वेळा (म्हणजे काही आयांच्या बाबतीत) त्या माकडीणी सारखे वागणे दिसू शकेल. एकुण अस्तित्व टिकवण्यासाठी आपण आणि आपले मूल यापैकी ज्याचा जीव वाचवणे त्या वेळी बे. इं. ला अधिक महत्त्वाचे वाटेल, त्याच्याविषयी अधिक प्रेम असेल.
इतर प्राण्यांपेक्षा माणसाचे समाज-जीवन अधिक क्लीष्ट (किंवा समृद्ध म्हणू, बरे वाटते ऐकायला) असल्यामुळे, प्रियकर प्रेयसी ह्या नात्याचा कालावधी वाढून नवरा-बायको हे नाते आले, त्याच प्रमाणे, भाऊ बहीण, आई मुलगा भाऊ-भाऊ वगैरे असंख्य नाति, आणि त्यामधले प्रेम (जे वीण वाढवण्यासाठी नव्हे, पण टिकवण्यासाठी उपयुक्त आहे) निर्माण झाले. त्या प्रेमाचेच अधिक उदात्त स्वरूप मोठ्या समुहाच्या अस्तित्त्वासाठी आवश्यक ठरले, जसे धर्मप्रेम, देशप्रेम, जातिप्रेम .... वगैरे.
यातच 'प्रेम' या संकल्पनेचे उदात्तीकरण पिढ्यानुपिढ्या करून सर्व संस्कृतींनी भर घातलेली आहे.
तसं जर नसेल, तर माझा देशबंधू, रक्तबंधू इतरांपेक्षा अधिक प्रिय असण्याचे कारण काय? प्रेमाचा 'निराकार' असण्याशी संबंध असेल, तर प्रेम काही विशिष्ठ व्यक्तिंशीच का?
जीवन हे नश्वर आहे, आणि आपले हृदय हे आपल्याला न सांगता बंद पडू शकेल यात वादच नाही. पण त्याचा अर्थ असा नव्हे की अस्तित्व टिकवणे ही प्रेरणाच आपल्याला नसते. आपल्याला शक्य त्या प्रकारे आपले हृदय चालू ठेवण्याचा आपण प्रयत्न करत असतो. त्यासाठी जेवतो, झोपतो, रस्त्यावर गाड्या धावत असतील तर त्या आपल्या अंगावर येणार नाहीत अश्या बेताने चालतो . काही जखम झाल्यास ती बरी होईल असा प्रयत्न करतो... यादी कितीही वाढवता येईल. कधितरी मरणारच आहोत, तर आत्ता मेल्यास काहीच हरकत नाही, असा विचार या मृत्युलोकातले किती लोक करतात? मरणारच आहोत, पण आत्ता नको, असा विचार मात्र सतत चालू असतो नाही का?
तात्पर्य, आपण जगत असताना जे काही करतो (प्रेमासकट), त्यातल्या बर्याच गोष्टींचे 'जिवंत राहण्याची प्रेरणा' यात वर्गीकरण करता येते.
बरं या सर्वामुळे कुणाचे 'प्रेमावरील प्रेम' बाधित व्हायला नको. प्रेम हे असतेच, फक्त त्याचे मूळ हे अस्तित्वाच्या लढाईत सापडते.