मराठी शब्दांच्या उच्‍चाराचे काही अलिखित नियम आहेत.  शब्दाचा उच्‍चार करताना जोडाक्षराच्या आधीच्या अक्षरावर जर आघात होत असेल, तर असला शब्द मराठी नसतो; तो संस्कृतच असू शकतो. रुद्र, भद्र हे शब्द बोलताना अनुक्रमे रु आणि भ वर आघात होतो. त्यामुळे हे (मूळ)मराठी शब्द नाहीत. तद्वतच,  क़द्र हा शब्द मराठी असणेच शक्य नाही.  तो संस्कृतपण नाही, म्हणून मराठीत तो कदर म्हणून येतो. असे आणखी शब्द सद्र-सदर;  अक़्ल-अक्कल, नज़्र-नजर;  उम्र-उमर;  सब्र-सबूर;  क़त्ल-कत्तल;  ग़ुस्लख़ाना-गुसलखाना वगैरे.
दुसरे असे की मराठी शब्दातल्या अकारान्‍त जोडाक्षराआधी साधारणपणे ऱ्हस्व स्वर असतो. चिन्‍च, चींच नाही;  भिन्‍त, भींत नाही;  चुप्प, चूप्प नाही.  आता, भेद्र संस्कृत नाही, आणि भेद्रमध्ये द्र च्या आधी भे हा दीर्घ स्वर आहे.  त्यामुळे भेद्र मराठी असूच शकत नाही.
अर्थात, या नियमाला काही थोडे अपवाद असू शकतील. नियम सिद्ध करायला तेवढे हवेच!. पण एकंदरीत काय, तर भेद्र हा शब्द मराठीच्या प्रमाणभाषेत जसाच्या तसा आला तर भाषेची प्रतिष्ठा कमी होते.