मी अशा अनेक लग्न/ रिसेप्शन पार्ट्या अटेंड केल्या आहेत.... जिथे गाणारे कधी जीवतोड गातात तर कधी नखरे, अदाकारी दाखवत गातात... मोजकी टाळकी त्यांच्या समोर गाणी ऐकत असल्याचे दाखवत असतात... किंबहुना अशी टाळकी समोर बसलेली असली तर गाणाऱ्याचे अहोभाग्यच! उर्वरित जनसमुदायास अशा गाण्याऱ्यांशी व गाण्याशी काहीही देणेघेणे नसते.... त्यांना फक्त वधुवरांस भेटणे, मनसोक्त पदार्थ चापणे, ओळखी-नात्यातल्या लोकांच्या भेटीगाठी व पार्किंगमधून गाडी नीट काढून घरी वेळेत परत जाणे एवढीच काय ती चिंता असते. गाण्याचा अगदी टेपरेकॉर्डरवर लावलेल्या गाण्यासारखा पार्श्वसंगीत म्हणून वापर चांगला होतो अशा समारंभात! अगदी ख्यातनाम, इंडस्ट्रीतील लोकांना बोलावूनही त्यांचे असेच तीन-तेरा वाजवले जातात. उगाच नाही ते लोक लाखो रुपये चार्ज करत! आधी पैसे खिशात, मग कोणी कार्यक्रम ऐको अगर न ऐको, काय फरक पडतो?!!!!