श्रावणराव,
उत्तराला उशीर झाल्याबद्दल माफी असावी :)
'सुंदर मी होणार' या कवितेविषयी आणखी लिहावे. प्रस्तावनेतील 'कालमहिमा' याचा मीही एक बळी आहे. त्या कवितेबाबत तुम्ही लिहिता की, ती तत्वज्ञानपर कविता आहे. कशी? त्याचा संबंध गोविंद यांच्या अपंगत्वाशी आहे का? ही कविताच पूर्ण माहिती नसल्याने हे प्रश्न.
'सुंदर मी होणार... 'ही कवी गोविंद यांची संपूर्ण कविता पुढे देत आहे. ठळक केलेली कडवी मला तत्त्वज्ञानपर वाटतात. काही कडवी त्यांच्या अपंगत्वाशी संबंधित आहेत, असे वरकरणी तरी दिसते; पण अंतःकरणी ती तशी नाहीत!!! याचे कारण असे की, अपंगत्वामुळे आलेल्या स्वतःच्या दुःखाबद्दलचा विषाद त्यांत आहे, असे वाटत नाही. देशकार्यासाठी आपला देह आपण पुरेशा सामर्थ्याने वापरू शकत नाही, ही खंत आढळते.
हा जुना, निकामी (? ) देह संपून जाऊन पुन्हा नव्याने जन्म घ्यायचा व सुंदर (इथे सुंदर या शब्दाचा अर्थ अर्थातच नेहमीचा, गुळगुळीत नाही, हे सांगायला नकोच. ) होऊनच पुन्हा यायचे... (आणि देशकार्याला स्वतःला समर्पित करायचे! ) अशी या कवितेची मध्यवर्ती कल्पना असावी. (आताच्या निबर, निर्ढावलेल्या काळात हे सारेच तत्त्वज्ञान भाबडेपणाचे वाटेल आपल्या सगळ्यांना... पण इथेही 'कालमहिमा' असे म्हणून गप्प बसावे, झाले!!! )
'माझ्या देशाला गुलामगिरीतून मुक्त कर', असे मागणे प्रभूपाशी जाऊन गोविंदांना करायचे आहे... प्रभूपाशी जायचे तर जुना देह घेऊनच जावे लागणार... या देहाच्या माध्यमातून देशकार्य झाले नाही ते नाहीच; पण निदान देशाच्या स्वातंत्र्याचे मागणे करण्यासाठी तरी जुन्या देहाचा उपयोग होईल, असे त्यांना वाटते. आणि प्रभूकडून परत येताना तर काय 'सुंदर होऊन'च यायचे आहे...!
अमर आशावाद व्यक्त करणारी ही कविता तिच्यातील तरल कारुण्याने खूपच उंचीवर जाऊन पोहोचली आहे.
जिथे म्हणे, प्रभूचा वास आहे, त्या स्वर्गाइतक्या उंचीवर!!!
प्रतिसादाबद्दल मनापासून आभार.
.............................................
सुंदर मी होणार...!
.............................................
सुंदर मी होणार, आती सुंदर मी होणार ।
सुंदर मी होणार! हो! मरणाने जगणार ।।
वर्षत्रय मम देह मरतसे, तो आता मरणार
वर्षत्रय मम प्राण जातसे, तो आता जाणार ।।१।।
प्राशुनी माझ्या रुधिरा हसतो, तो व्याधी रडणार
व्याधिक्लेशें रडतो तो मम जीवात्मा हसणार ।।२।।
हृद्रोगाच्या ज्वाला विझुनी सुख माझे निवणार
माझा मृत्यू माझा सारा अश्रुपूर गिळणार ।३।।
कंटक-पंजर तनुपीडेचा पिचूनिया फुटणार
बंदिवान मम आत्मा चातक सुखेनैव सुटणार ।४।।
जुनी इंद्रिये, जुना पिसारा, सर्व सर्व झडणार
नव्या तनूचे, नव्या शक्तिचे पंख मला फुटणार ।५।।
त्या पंखांनी कर्तृत्वाच्या व्योमी मी घुसणार
देशहिताच्या पवनसागरी पोहाया सजणार ।।६।।
प्रतिभाप्रसन्न नव बुद्धीची चंचू मला येणार
चंचुरूप मुरलीने प्रभुचे काव्यगान होणार ।।७।।
मम हृदयांतरी ज्ञानफुलांचा फुलबगिचा फुलणार
फुलांत झुलुनी आत्मदेव मम नवानंद लुटणार ।।८।।
नवो ओज मज, नवे तेज मज, सर्व नवे मिळणार
जीर्ण जुन्यास्तव कोण अवास्तव सुज्ञ झुरत बसणार ।।९।।
गहनोगहनी, भुवनोभुवनी शोधित मी फिरणार
भूमातेला हुडकून काढून तद्दर्शन घेणार ।।१०।।
माझी भरारी विमान उडते भरकन तिज देणार
परवशतेचे जाल तोडुनी उडवुनी तिज देणार ।।११।।
उडतउडत मग, रडररडत मग प्रभुपाशी जाणार
'स्वतंत्र तिजला करा' म्हणूनी तच्चरणी पडणार ।।१२।।
व्यंग देह हा याने कामुक काम कसे पुसणार?
पुरले नच ते पुढती पुरवून आणणार शतवार ।।१३।।
या जन्मी नच मोद लाभला, खेद मात्र अनिवार
प्रीती अतृप्ता, तृप्ती अशांता, जन्म मला देणार ।।१४।।
मृत्यू म्हणजे वसंत माझा मजवरती खुलणार
सौंदर्याचा बह्मा तो मज सौंदर्ये घडणार! ।।१५।।
तळमळ हरुनी कळकळ देई मृत्यू असा दातार
कळकळ भक्षुनी जळफळ वितरी रोग असा अनुदार ।।१६।।
प्रेम हासते, हास्य नाचते, मृत्यूचा परिवार
शोक क्रंदतो, भय स्फुंदते, रोगाचा दरबार ।।१७।।
जगण्याच्या नव अवताराचा मरणे हा व्यवहार
जगते जगणे प्रभुप्रमाणे, मरणे क्षण जगणार ।।१८।।
मरण्याविरहित जगणे मिळवू असा करू निर्धार
शाश्वत जगण्यामध्ये कोठचा दुःखाचा संचार ।।१९।।
आनंदीआनंद जाहला, तनुक्रांती होणार
मरणाचा परमेश्वर मजवर करुणाघन वळणार ।।२०।।
आनंदीआनंद जाहला मरता मी हसणार
हासत मरणे गोविंदाचा प्रेमपंथ ठरणार ।।२१।।
- कवी गोविंद