त्यांच्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय गाण्यांमधले हे नसावे कदाचित, कारण त्यावरची रसग्रहणे किंवा संदर्भ फारसे वाचनात आलेले नाहीत. (कदाचित वाचनच तोकडे असेल.
हे गाणे यूट्यूबवर शोधले, मिळाले नाही. पण त्यानिमित्ताने त्यांची इतर काही गाणी ऐकली.
हे कशामुळे होत असेल? नस्रत फतेह अलींचे स्वर, समूहाच्या टाळ्यांचा नाद की पंजाबी-सरायकी चे आपलेसे वाटणारे शब्द? की सुरुवातीची एक धून जी नंतरही आवर्तित होत राहते? टाळ्यांचे मात्र एक आहे. त्या वाजायला लागल्या की ब्रह्मानंदी टाळी लागतेच. 'ना तो कारवां की तलाश' ऐकताना सुद्धा असेच होते. पण इथे तलाश तरी आहे. 'सैंयो माही विछड गयो मेरा, किसेदी नजर लग गयी' मध्ये काय आहे? एक गाऱ्हाणे फक्त.
तुम्हाला नुस्रत फते अलिंच्या गाण्यावरून "ना तो कारवां की तलाश है" आठवले. त्यावरून संगीतकार खय्यामने सांगितलेली एक गोष्ट सांगतो. नुस्रत फते अलिंच्या वडिलांच्या काही प्रसिद्ध कव्वाल्यांच्या रेकॉर्डस घेऊन भारतभूषण आणि त्याचा भाऊ (जो "बरसात की रात" चा निर्माता होता) संगीतकार खय्यामकडे गेले आणि त्याला या चालींवर कव्वाल्या संगीतबद्ध करण्याची विनंती केली. त्यासाठी नुस्रत यांच्या वडिलांची परवानगी त्यांनी घेतली होती. खय्यामने आपण कोणाचीही नक्कल करणार नसल्याचे सांगून ते काम नाकारले. पुढे हे दोघे रोशनकडे गेले आणि त्याने त्यावर आधारित कव्वाल्या रचल्या. पुढचा इतिहास आहे.
ही गोष्ट खरी असण्याची शक्यता मला वाटते कारण ना तो कारवां की तलाश है मधला आणि नुस्रत फते अलिंच्या तुम एक गोरख धंदा हो मधला तबला, टाळ्यांचा ठेका सारखाच आहे, इतका की "तुम एक गोरख धंदा हो" सुरू असताना मध्येच आता "जब जब कृष्ण की बन्सी बाजी" या ओळी सुरू होतील की काय असे वाटते.
रोशनने "बरसात की रात (१९६०)" च्या आधीही "चांदनी चौक (१९५४)" चित्रपटात हर बात पूछिये ही कव्वाली दिली होती. त्यात ढोलकी आणि टाळ्यांचा ठेका जास्त प्रकर्षाने जाणवतो. लता मंगेशकरचा आवाज असलेली ही एकमेव कव्वाली असावी.
टाळ्यांचा ठेका असलेली आणि मला अतिशय आवडणारी आणखी एक रचना म्हणजे निगाहें मिलाने को "दिल ही तो है (१९६३)" मधली कव्वाली. अनेक वेळा रोशनच्या नवीन गाण्यात जुन्या चालींचे प्रतिबिंब दिसते. वरील गाण्यात ५.३३ इथे "नीरेग.. " अशी सरगम आहे तशीच थोडीशी सरगम त्या आधी अकरा वर्षे आलेल्या "रागरंग"मधल्या एरी आली पियाबिन या गाण्यात जिथे बोलताना सुरू होतात तिथे आहे.
विनायक