तो
म्हणजे ह्या दिल्लीकरांच्या नाकावर टिच्चून आम्ही महाराष्ट्रीय बंधू आणि
भगिनी दर ३ महिन्यानी छोटासा चहापानाचा समारंभ आयोजीत करतो आणि त्या
समारंभात नवागतांची ओळख, वाढदिवस साजरे करणे ई. ई. उपक्रम राबवतो..
काय सांगता राव!
'दिल्लीकरांच्या नाकावर टिच्चून' हा भाग काही कळला नाही.
माझ्या आठवणीप्रमाणे आणि अनुभवाप्रमाणे दिल्लीत मोठ्या प्रमाणात मराठी वस्ती साधारणतः माझ्या वडिलांच्या पिढीपासून आहे. (माझे
वय आज चाळिशीच्या घरात आहे. आणि माझे स्वतःचे दिल्लीत एकेकाळच्या धावत्या भेटींव्यतिरिक्त विशेष वास्तव्य झालेले नसले, तरी १९५०-६०च्या दशकांच्या सुमारास माझ्या वडिलांनी आणि अभियांत्रिकी महाविद्यालयातील त्यांच्या बहुतांश तत्कालीन सहाध्यायांनी नोकरीनिमित्ताने आपापल्या करियरची सुरुवातीची अनेक वर्षे दिल्लीत घालवली, आणि त्यांपैकी काहीजणांचे पुढे निवृत्तीपर्यंत, अगदी परवापरवापर्यंत दिल्लीत वास्तव्य होते. पैकी काहीजण पुढे विविध सरकारी क्षेत्रांत उच्चपदांवरसुद्धा होते. त्या सर्वांच्या तोंडून आणि बद्दल ऐकलेल्या गोष्टींवरून अर्वाचीन काळात दिल्लीत मराठी वस्ती बहुतकाळापासून असण्याबद्दल चांगलाच अंदाज आहे.) त्यात मित्रमंडळींच्या भेटी, सणावारानिमित्त एकत्र येणे, वाढदिवस वगैरे प्रकार सर्रास चालत आलेले आहेत. (फारा वर्षांपूर्वी विद्यार्थिदशेत दिल्लीस अशीच धावती भेट देत असता अशाच एका सणावारानिमित्तच्या बहुकौटुंबिक चहापान समारंभास मीही उपस्थित राहिल्याचे आठवते.) यांपैकी कोणाला कधी असे काही 'दिल्लीकरांच्या नाकावर टिच्चून' वगैरे काही करावे लागल्याचे ऐकिवात नाही.
तसेच दिल्लीतील महाराष्ट्र मंडळसुद्धा बहुतकाळापासून कार्यरत असावे असे वाटते. या महाराष्ट्र मंडळाससुद्धा 'दिल्लीकरांच्या नाकावर टिच्चून' वगैरे आपले अस्तित्व टिकवून राहण्याची गरज भासली असावी असे वाटत नाही.
परप्रांतात मराठीभाषकांनी एकत्र जमणे, झालेच तर काही स्नेहसंमेलनात्मक किंवा सांस्कृतिक कार्यक्रम करणे वगैरे या सर्व चांगल्याच गोष्टी आहेत. पण या सर्वांचे वर्णन करताना 'दिल्लीकरांच्या नाकावर टिच्चून' वगैरेंसारखे अतिशयोक्त, अतिरंजित आणि हास्यास्पद दावे करण्याची काही गरज आहे असे वाटत नाही. आपली स्वप्रतिमा उंचावण्याकरिता असल्या निरर्थक दाव्यांच्या कुबड्यांचा आधार घेण्याची गरज भासण्याइतका मराठी माणसाचा न्यूनगंड आणि भयगंड (पॅरानोइया) आजकाल पराकोटीला पोहोचला आहे काय? तो तसा पोहोचण्याचे काही कारण नाही, आणि पोहोचू नये, असे मनापासून वाटते.