प्रलगो,
तुमच्या भावनेशी कुणीही संवेदनशील वाचक सहमतच होईल, पण एकाच घटनेवरून सर्व समाजाची वृत्ती आणि विचारसरणी किडलीय, असे मात्र नाही म्हणता येणार. अशी गुन्हेगारी वृत्ती ही व्यक्तीनिष्ठ असते, तिचे लेबल संपूर्ण समाजावर नको चिकटवायला. समाजात वाढत असलेली आत्मकेंद्रितता, दुसऱ्याच्या भावनेप्रती बेफिकीरी, मूल्यांचा ऱ्हास, स्पर्धेत अस्तित्व टिकवण्यासाठी ओघानेच येणारा स्वार्थ या गोष्टी चिंताजनक आहेत, पण आश्वासकही बरेच घडत आहे.
तुम्ही दोन अनुभव वर्णन केले आहेत. पहिला पुस्तक विकणाऱ्या आजोबांचा आणि दुसरा आई-वडिलांना विमानतळाबाहेर सोडून परदेशात पळून गेलेल्या मुलाबाबतच्या वृत्ताचा. यात मला अपुरेपणा जाणवला. त्या आजोबांशी तुमचा सविस्तर संवाद झालेला नाही. ते इतक्या रात्री पुस्तक का विकत होते, याचे कारण तुम्ही विचारलेले नाही अथवा त्यांनी सांगितलेले नाही. म्हणजेच त्यानंतर तुमच्या मनात आलेले विचार हे केवळ एक तुमचा तर्क आहे. आजोबांना मुले विचारत नसतील ही एक शक्यता, पण इतरही शक्यता असू शकतील. उदा - १) आजोबांना निद्रानाशाचा विकार असू शकेल त्यावर त्यांनी हा उपाय शोधला असेल. २) दीनवाणा चेहरा व वय हे आजोबांचे भांडवल असू शकेल. त्या जोरावर ते निवृत्तीनंतर व्यवसाय करत असतील ३) दिवसा लहान मुले व इतर विक्रेते पुस्तके विकतात. त्या स्पर्धेत दमण्यापेक्षा रात्रीच्या निवांत वेळी विकणे त्यांना फायद्याचे ठरत असेल. ४) आजोबांचे घरी पटत नसेल म्हणून पुस्तके विकून ते वेळ घालवत असतील व सगळे झोपल्यावर ते घरी जात असतील. वगैरे. म्हणजेच सत्य समजत नाही तोवर हे चित्र आपण रंगवू तसेच राहील.
आई-वडिलांना विमानतळाबाहेर सोडून मुलगा परदेशात निघून जातो, हे वृत्त पेपरमध्ये आले. त्यांचा खर्च भाचा का करतो? त्याने मुलाशी संपर्क साधला नाही का? मुलाचे कृत्य गुन्हेगारी स्वरुपाचे आहे. या बातमीचे कात्रण जरी संबंधित देशाच्या दूतावासाला किंवा तो काम करत असलेल्या कंपनीला पाठवले तर त्या मुलाची नोकरी जाऊ शकते किंवा भारतात परत पाठवणी होऊ शकते. परदेशात अशा गोष्टी हलकेच घेत नाहीत. परदेशात गेलेल्या मुलांच्या भारतात एकट्या राहणाऱ्या पालकांची संघटना आहे. तिने काय केले? जर ही घटना नावानिशी प्रसिद्ध झाली असेल तर जवळच्या नातलगांनी, मित्र परिवाराने, अमेरिकेतील भारतीय समाजाने काही मध्यस्थी केली नाही का? हा पाठपुरावा प्रसिद्ध झाला का? तसे नसेल तर मग सांगोवांगीचा किस्सा यापलिकडे त्याला महत्त्व उरत नाही.
(मला थोडे आणखी सांगायचे आहे, पण ते स्वतंत्र प्रतिसादात...)