नाकावर टिच्चून-बिच्चून काही करण्यापेक्षा आपल्या जिभेला थोडे कष्ट देऊन मराठीतले  'ळ' 'ण' हे वर्ण व्यवस्थित, स्पष्ट उच्चारले तरी खूप होईल. इंग्लिश मध्ये किंवा परप्रांतीयांशी बोलताना पुणे, शीळफाटा मुळुंद,नाळासोपारा,विखरोळी, नळस्टॉप, हिंगणे, एरंडवणे, ठाणे असेच उच्चार करावे. तसेच मलाड,कामशेट,वरोरा,देओलाली,शहद असे चुकीचे उच्चार न करता ते मालाड, कामशेत,वरोडा,देवळाली,शहाड असे करावे.असे अनेक शब्द आहेत.

महानगराभोवतालच्या ग्रामीण भागाचे झपाट्याने शहरीकरण होताना मूळचे रहिवासी अल्पसंख्य ठरून त्यांची संस्कृतीही अल्पसंख्य बनते. शहरवासीयांनी थोडी जागरुकता दाखवली तर मूळ ग्रामनामे तरी टिकून राहातील. टिळक,पाणंदीकर, पेंडसे, आणि यासम नावांच्या इंग्लिश लेखनावरून अन्य प्रांतीय जसे उच्चार करतात, तसे आपण करण्याचे काहीच कारण नाही.

हे अगदी सहज होण्यासारखे आहे म्हणून याचे उदाहरण दिले. मराठीच्या हितासाठी करता येण्याजोग्या अन्य अनेक गोष्टी आहेतच.