१. भुताखेतांचें अस्तित्त्व हीं देखील गंमतीची गोष्ट आहे. व्यसनी, मादक पदार्थ विक्रेते, वेश्या अशा लोकांचा गांवाबाहेर अंधाऱ्या जागीं वावर असतो. सामान्य आगंतुकांचें आगमन त्यांच्यासाठीं धोकादायक असतें. म्हणून अशा आगंतुकांना भुताखेतांचें भय दाखवून, प्रसंगीं मार देऊनही पळवून लावण्याकडे त्यांचा कल असतो. भुतांचें अस्तित्त्व हें असें आहे.
२. एम डी पी अर्थात मॅनिक डिप्रेसिव्ह सायकॉसिस या रोगांत रुग्णाला प्रथम नैराश्याचा झटका येतो. म्हणजे मानसिक उत्तेजन कमी होऊन दौर्बल्य येतें. मग आस्ते आस्ते त्याचा दौर्बल्याचा भर ओसरून कांहीं दिवस रुग्ण सामान्य होतो. नंतर कांहीं दिवसांनीं मानसिक उत्तेजन होऊन त्याला उन्मादावस्था प्राप्त होते. बहुतेक वेळां अशा दोन उत्तेजनांतला काळ चार आठवडे असतो. त्याचा संबंध मग पौर्णिमा आणि अमावस्येशीं जोडला जातो. मनोवस्थेच्या चांद्रकलेशीं जोडलेल्या या संबंधाला कोणताही शास्त्रीय आधार नाहीं.
वकिली युक्तिवाद आणि शब्दच्छल करून कोणतेंही असत्य हें सत्य असल्याचें सिद्ध करतां येतें. त्यातूनच देव, धर्म, प्रेषित, भुतें, ज्योतिष इ. संकल्पना निर्माण झाल्या. आणि बहुसंख्य लोकांकडून वर्षानुवर्षें तेच तेच युक्तिवाद ऐकले कीं तें सामान्य माणसाला खरें वाटूं लागतें. परंतु एक मात्र खरें कीं अशा संकल्पनांची समाजप्रिय सामान्य माणसाला भावनिक गरज असते. यांत शास्त्रज्ञ, तत्त्ववेत्ते देखील आले. बुद्धिप्रामाण्यवादी मात्र या गोष्टी तर्काच्या कसोटीवर घासल्याशिवाय स्वीकारीत नाहींत. जगन्मान्य शास्त्रज्ञांच्या पॅनेसलसमोर इंगलंडमधील कोर्टांत युरी गेलर या जादुगारानें केवळ नजरेच्या ताकदीनें खिळे वाकवून दाखवले. सर्वांनीं त्याचें सामर्थ्य मान्य केल्यावर त्यानें ती एक साधी हातचलाखी आहे हें भर कोर्टांत दाखवून दिलें. तेव्हां अशा युक्तिवादाला कितीही बुद्धिमान व्यक्ती फसूं शकते. पण चोराच्या वाटा मात्र चोरालाच ठाऊक असतात. हेंच या तथाकथित शक्तीचें, तथाकथित शास्त्रांचें सामर्थ्य आहे. पण तर्काच्या तसेंच प्रयोगाच्या कसोटीवर मात्र हीं शास्त्रें नाहींत हें दिसून येतें.
सुधीर कांदळकर