ह्या लोकांच्या प्रभावामुळे लोक खरेच अध्यात्माकडे वळतात का? अध्यात्म खरेच इतके सहजसाध्य आहे का? प्रवचनानंतर घरी परतणाऱ्या लोकांच्या गप्पांमधे गटबाजी,परनिंदा,आत्मप्रौढी,राष्ट्रीय राजकारणावरील चर्चेत आत्यंतिक द्वेषाने आणि त्वेषाने बोलणे ऐकायला मिळते.कधी कधी तर वाटते की या प्रवचनांतून एखाद्या राजकीय पक्षाचा प्रचारच चाललेला नाही ना.
हां, एक गोष्ट आहे. काही स्वामी-महाराज आहाराविषयी काही नियम जाहीर करतात आणि लोक ते श्रद्धेने पाळतात. उदा. इडली, ढोकळा, दोसे, पाव वगैरे आंबवलेले पदार्थ खाऊ नका, कांदा-लसूण खाऊ नका इ.
उघड आहे की ह्या सर्व अगदी वरवरच्या गोष्टी आहेत . पोथ्या-पुस्तके वाचणे, यंत्रवत मंत्र उच्चारणे किंवा लिहिणे, नेम-नियम, उपासतापास करणे या गोष्टी तुम्हाला आत्मशोधाकडे नेत नाहीत. 'योग- याग-विधी, येणे नोहे सिद्धी, वायांच उपाधी, देहधर्म. '
तोटा असा आहे की हे लोक स्वनिर्णयक्षमता आणि तारतम्य गमावून बसतात.संमोहित होतात. सुमारे पंधरा वर्षांपूर्वी ओळखीतल्या एका बाईंनी एका महाराजांच्या पादुकांचे पूजन करण्यासाठी पंचवीस हजार रुपये, परिस्थिती नसतानाही, कर्ज काढून खर्च केल्याचे बघितलेले आहे. त्याच बाईंनी नवरात्रात नऊ दिवस कडक, अगदी निर्जळी उपास करून मरणासन्न अवस्थेत इस्पितळात दाखल करायला लावून हजारो रुपयांचा चुराडा केलेलाही बघितला आहे.आम्ही भेटायला गेल्यावर त्यांनी 'गुरूंनीच सर्व करून घेतलं, परीक्षा घेतली, मारणारेही तेच आणि तारणारेही तेच, ' असे धन्योद्गार काढले!