विजयराव,
भारतीयांनी 'आपले पूर्वज श्रेष्ठ होते', असा अभिमान बाळगण्यात गैर ते काय? युरोपमध्ये सोळाव्या शतकात प्रबोधनाचे युग सुरू झाल्यावर हळूहळू शास्त्रीय दृष्टीकोन विकसित झाला. ती बैठक त्यांनी आजतगायत टिकवून धरली आहे. त्यांचे शोध, संशोधकवृत्ती, सामाजिक शिस्त, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान या गोष्टी प्रशंसनीय आहेत पण म्हणून आमचे पूर्वज कनिष्ठ कसे काय ठरतात? म्हणजे त्यांच्या उण्यापुऱ्या ३०० वर्षांच्या प्रगतीवर तुम्ही आपल्या ५००० वर्षांच्या संस्कृतीची मापे काढणार असाल तर मग प्रश्नच मिटला.
नालंदा आणि तक्षशिला विद्यापीठांचा अत्यंत क्रूरतापूर्वक विद्ध्वंस परकी आक्रमकांनी केला. नालंदा विद्यापीठाला प्राचीन परंपरा होती. तेथे शेकडो वर्षांपासून संशोधक आणि विचारवंतांनी जीवनभरच्या तपश्चर्येने मिळवलेले ज्ञान भूर्जपत्रांवर लिखित पोथ्यांत जतन केले होते. हे विद्यापीठ जेव्हा जाळून भस्मसात केले तेव्हा ती ग्रंथसंपदा पुढची सहा महिने जळत होती. नंतर तेथे राखेचे ढीग उरले. (युरोपात रोमन संस्कृतीही अशीच लयाला गेली.) ह्यू एन त्संग सारख्या चीनी प्रवाशाने अनेक ग्रंथ खेचरांवर लादून तिबेटमार्गे चीनला नेले होते आणि नालंदा विद्यापीठाचे प्रमुख आचार्य शीलभद्र यांनी त्याला त्याच्या अभ्यासू वृत्तीवर खूष होऊन तशी भेट दिली होती. हे सांगण्याचे कारण म्हणजे भारतात पूर्वीपासूनच ज्ञानजतनाची लिखित आणि मौखिक परंपरा होती, पण तिचे दुवे नष्ट झाले असल्यास पुरावे कुठून मिळवणार? याचाच अर्थ आपण जे काही अवशेष शिल्लक असतील त्याकडेच बघून अंदाज करणार ना? अहो दक्षिण भारतात अडगळीत पडलेले एक चोपडे शामशास्त्री नामक एका विद्वानाने लोकांच्या नजरेसमोर आणले नसते तर चाणक्य नावाचा मूलगामी अर्थशास्त्रज्ञ आणि राज्यशास्त्राचा प्रवर्तक भारतात होऊन गेला होता हे तरी आपल्याला आज ठाऊक झाले असते का?
पण लोक फिदी फिदी हसतात. म्हणतात 'कसलं आलंय संशोधन. पुरावे दाखवा पुरावे' इतिहास मात्र कधीच खोटे बोलत नाही. तो आपल्याला विचार करायला भाग पाडतो आणि कुठेतरी सत्याला वाचा फोडतो. ते विमानशास्त्राचे जाऊ देत आपण वेगळा विचार करुया.
१) दिल्लीला लोहस्तंभ आहे. त्याची शुद्धता ९९.९९ आहे. हजारो वर्षानंतर आजही तो टिकून आहे. हे मेटलर्जीचे प्रगत तंत्र कसे काय साधले असेल तत्कालीन भारतीयांना?
२) डाक्क्याची मलमल इतकी तलम होती, की पूर्ण साडी काडेपेटीइतक्या डबीत मावत असे. ही कुणीतरी मारलेली बात असेल कदाचित, पण पंधराव्या शतकात भारतीय रेशमी आणि चिटाच्या कपड्यांनी युरोपला एवढे आकर्षित केले होते, की तेथील व्यापाऱ्यांनी पार्लमेंटवर दबाव आणून या व्यापारावर बंदी आणली. हे का घडले असेल? इस्ट इंडिया कंपनीच्या अमलात प्रथम बंगालमधील विणकरांचे अंगठे का कापले गेले? (डाक्का आता बांगलादेशात असले तरी त्यावेळी बंगालमधील प्रमुख कापडनिर्मिती केंद्र होते. ) टेक्स्टाईलमधील हे प्रगत तंत्र कसे साधले असेल भारतीयांना?
युरोपातले लोक मागासलेले जीवन जगत होते त्या काळात भारतीय लोक येथील वेगवान नद्यांच्या प्रवाहांना घाट बांधत होते. ताजमहालासारख्या सौंदर्यशिल्पांची निर्मिती करत होते. हैदराबादला गोवळकोंडा किल्ल्यात आजही बघा. प्रवेशद्वारात वाजवलेल्या चुटकीचा आवाज बालेकिल्ल्यात ऐकू येतो. विजापूरला गोलघुमटात टाळी वाजवली तर त्याचे सात प्रतिध्वनी येतात. ऍकॉस्टिकचे ज्ञान असल्याशिवाय का असल्या करामती करता येतात?
भारतीय संस्कृतीच्या समकालीन असलेल्या इजिप्शियन, रोमन, ग्रीक आणि चीनी या संस्कृतींनी परस्परांत खूप आदानप्रदान केले आहे. आज त्यांच्याही तत्कालीन प्रगतीच्या पाऊलखुणा अस्पष्ट आढळतात. पण म्हणून ते लोक आपल्या पूर्वसुरींचा हीणकस उल्लेख करत नाहीत.
तुम्ही विचारताय ३० टक्के भारतीय लोक संगणक उद्योगात काम करतात, पण त्यांनी एखादी तरी ऑपरेटिंग सिस्टिम बनवलीय का? नसेलही कदाचित, पण काळ कुठे संपलाय? उद्या कुणी सांगावे, एखादा भारतीय अकल्पित असे संशोधन जगापुढे आणेलसुद्धा. ते संगणक क्षेत्रातले नसेल, पण नॅनो तंत्रज्ञानातले असेल, जैव अभियांत्रिकीमधले असेल.
पाश्चात्यांचे चांगले-वाईट त्यांच्यापाशी. आपले आपल्यापाशी.