प्रलगो,
माझ्या प्रतिक्रियेतून मी तुम्हाला कॉर्नर करतोय किंवा तुमच्या अनुभवांवर अविश्वास दाखवतोय किंवा या विषयावरील संवेदनेचा अपमान करतोय, असे कृपया समजू नका. जन्मदात्या आईवडिलांशी मुलांनी कृतघ्नपणे वागणे शोभते का, असा प्रश्न विचारल्यास आपल्या सर्वांचे उत्तर सारखेच असणार आहे. म्हणूनच मी प्रतिक्रियेच्या सुरवातीलाच म्हटले आहे, की तुमच्या भावनेशी कुणीही संवेदनशील व्यक्ती सहमतच होईल.
पण मला असेही वाटते, की घटनेमागील सत्य हे सर्व बाजूंनी समोर येत नाही तोवर आपला तर्क, त्याआधारे व्यक्त होणारी भावना याचाही परीघ मर्यादितच राहील. म्हणून मी म्हटले, की या अनुभवात अपुरेपणा जाणवतो. आता त्या आजोबांनी स्वतःच्या तोंडाने 'मुले मला विचारत नाहीत म्हणून पोटाची खळगी भरण्यासाठी मी इतक्या रात्रीचा पुस्तके विकतो' असे संपूर्ण सत्य सांगितलेले नाही तोवर या अनुभवाला आपल्याच तर्काने 'मुलांचा कृतघ्नपणा' या चौकटीत का कोंबायचे? मी उदाहरणादाखल दिलेल्या शक्यता बाजूला ठेवा. समजा 'त्या आजोबांना मुलेबाळेच नाहीत, पत्नीही नाही आणि उतारवयात चरितार्थाचे साधन नाही म्हणून ते पुस्तके विकतात' असे वेगळेच सत्य समोर आले तर? मग आपण तरुण पिढीला आरोपीच्या पिंजऱ्यात का उभे करावे?
आपण एखाद्या प्रसंगावर केवळ तर्काने किंवा कल्पनेने विसंबून काही निष्कर्ष काढणे कसे उतावीळपणाचे ठरू शकते, याचा मलाच आलेला अनुभव मी तुम्हाला सांगतो. मी काही वर्षांपूर्वी वृत्तपत्रात काम करत होतो. एके दिवशी दुपारी कार्यालयात एक फोन आला. ड्युटीवर असल्याने तो मी घेतला. फोनवर एक म्हातारे गृहस्थ बोलत होते. त्यांना एका लेखकाचा पत्ता हवा होता. मी तो दिला. फोन ठेवणार इतक्यात ते गृहस्थ काकुळतीने म्हणाले 'मी घरी एकटा आहे हो. दिवसेंदिवस कुणी माझ्याशी बोलत नाही. प्लीज माझ्याशी बोला. ' मलाही ते ऐकून वाईट वाटले. मी त्यांची विचारपूस केली. बोलता बोलता त्यांनी मला धक्कादायक माहिती दिली. ते म्हणाले, 'माझा मुलगा आणि सून मला घरात कोंडून जातात. बाहेरून कुलुप लावतात. कुत्र्यासारखे मला ताटलीत वाढून जातात आणि शेजारणीला माझ्यावर पहारा करायला नेमले आहे. ' हे ऐकल्यावर माझ्यातला पत्रकार जागा झाला. ही तर खरी ह्युमन इंटरेस्ट स्टोरी. शिवाय मला त्या कृतघ्न मुलाचा रागही आला. मी आमच्या संपादकांना ही घटना सांगितली आणि बातमी करू का, असे विचारले. त्यावर ते म्हणाले, 'मुलाशी व शेजाऱ्याशी पण एकदा बोलून घ्या आणि ही घटना खरी असेल तरी बातमीत कुठेही नावाचा उल्लेख करू नका. कारण वर्तमानपत्रांनी बातमी पोचवावी, पण वैयक्तिक बदनामी करू नये. ' मी रात्री मुलाला फोन केला. मला वाटले, की तो संतापणार, रागाने शिव्या देणार, पण उलट त्याने अगदी शांतपणे सांगितले, 'आई गेल्यापासून बाबांच्या डोक्यावर थोडा परिणाम झाला आहे. पण ते ठार वेडेही नाहीत. त्यांना आम्ही एकटे घराबाहेर पडू देत नाही. निघून गेले तर कुठे कुठे शोधणार? ते दिवसभर घरी टीव्ही बघतात. पेपर वाचतात. मी आणि माझी बायको कामाला जातो. दुपारी त्यांचे ताट वाढून जातो. सायंकाळी एकत्र जेवतो. कोंडून वगैरे काही ठेवत नाही. त्यांना काही लागले सवरले तर शेजारच्या बाईंना लक्ष ठेवायला सांगितले आहे. मुख्य म्हणजे आम्ही त्यांना फोन वापरू देत नाही कारण ते कुणालाही काय वाटेल ते सांगतात. गेल्या रविवारची गोष्ट. माझी बहीण तिच्या छोट्या मुलीला घेऊन सुटीसाठी घरी येणार होती. त्या मुलीला आवडतो म्हणून मी घरात दोरीचा झोपाळा बांधत होतो तर यांनी तिकडे परस्पर फोन करून सांगितले, की वसंता बहुतेक फास लावून जीव देतोय. बहिणीच्या काळजाचे पाणी झाले. तिने शेजारी फोन करून धाव घ्यायला सांगितले. शेजारणीकडे किल्ली आहे, ती थेट आत आली आणि मला झोपाळा बांधताना बघून तिने कपाळावर हात मारला. आज आमच्याकडून फोनला लॉक लावायचे राहिले म्हणून तुम्हाला त्रास झाला. सॉरी. '
तो सांगत होता ते सत्य होते, याची खात्री मी करून घेतली आणि त्याला मनातल्या मनात कृतघ्न ठरवल्याबद्दल ओशाळलोही.
असो. तुमचे लिखाण वाचल्यावर प्रथमदर्शनी जे वाटून गेले ते लिहिले. चर्चेतले एक मत, एवढेच त्याचे महत्त्व. रागावू नका.