अवश्य जमेल. लायनक्समध्ये न जमण्यासारखं काहीही नाही. सध्या उपलब्ध असलेल्या लायनक्सच्या लोकप्रिय अद्यतन वितरणांपैकी कोणतेही वितरण तुम्ही सहजगत्या वापरु शकता. तुम्हाला प्रोग्रॅमिंग येत नसल्याचे तुम्ही लिहिल्याने तुम्हाला संगणकशास्त्र वा लायनक्स प्रणालीचे मूलभूत ज्ञान नसल्याचे गृहित धरुन थेट उबुंटूऐवजी, उबुंटूवर आधारित लायनक्स मिंट वापराचा सल्ला द्यावासा वाटतो.

उबुंटूच्या तबकडीसोबत येणाऱ्या वितरणामध्ये काही कंपन्यांनी त्यांच्या बुडाखाली दाबून ठेवलेल्या तंत्रज्ञानाचा आदर राखण्यासाठी व जीएनयू व संबंधित अनुज्ञप्तीशी असलेली बांधिलकी कायम ठेवण्यासाठी एमपी-३, फ्लॅश, गाणी वा जालावरील फ्लॅशव्यतिरिक्त असणाऱ्या ध्वनिचित्रफिती पाहणे किंवा तारविरहित जालजोडणी करणे अशा सोयी वापरकर्त्याला आपोआप उपलब्ध होत नाहीत. त्या त्याला टाकाव्या लागतात. (हे टाकणे अवघड नसले तरी नव्या वापरकर्त्याला त्रासदायक वाटू शकते.)

मात्र या सोयी लायनक्स-मिंटमध्ये वितरणासोबतच अंतर्भूत केल्या आहेत. त्यामुळे हे वितरण टाकल्यावर तुमचा संगणक 'वापरास त्वरित तयार' होतो. फक्त तारविरहित आंतरजालजोडणी सुरु करण्यासाठी सिस्टम-ऍप्लिकेशन्सऱ्हार्डवेअर ड्रायवर मध्ये जाऊन तिथे आपोआप शोधलेला हार्डवेअर ड्रायवर 'इनेबल' करावा लागतो. इतकेच.

अश्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या लायनक्स करू शकणार नाही.

लायनक्समध्ये इंटरनेट एक्प्लोरर उपलब्ध नाही. (ते चोरवाटेने उपलब्ध करवून घेता येते मात्र त्या वाटेवर बरेच काटे पेरलेले आहेत.) त्यामुळे जी संकेतस्थळे मायक्रोसॉफ्टचे बुडाखाली दाबून धरलेले तंत्रज्ञान वापरुन रचलेली आहेत (उदा. ऍक्टिव-एक्स कंट्रोलांचा भरमसाट वापर) अशी संकेतस्थळे लायनक्सवर पूर्ण क्षमतेने हाताळता येत नाहीत. अशा संकेतस्थळांची संख्या खूप कमी असली तरी ती आहे. त्यामुळे असी संकेतस्थळे नियमित हाताळावी लागत असल्यास विंडोज सहजगत्या उपलब्ध होईलसे ठेवणे उत्तम. (त्यासाठी तुमचा संगणक विंडोज व लायनक्स दोन्ही वापरास सक्षम ठेवणे किंवा व्हर्चुअल मशीन तंत्रज्ञान वापरणे असे काही पर्याय उपलब्ध आहेत.)

बाकी लायनक्स करु शकणार नाही अशा गोष्टी मला तरी आढळल्या नाहीत.