क्वेर्टी कळफलक वापरून मराठी शब्दाचे रोमन लिपीत लिप्यंतर करून आपण जेव्हा देवनागरी टंकलेखन करतो, तेव्हा अनेकदा मराठीतल्या दीर्घ ऊकारासाठी दोनदा ओ दाबला जातो.  यावरून असा एक गैरसमज झालेला आढळतो की, इंग्रजीतल्या डबल ओ चा मराठीत दीर्घ ऊकारच होतो. त्यामुळे, 'या पोषाखाचा लूक फार चांगला आहे, ही प्युअर वूल आहे, मला बाई, वूडन फर्निचरच आवडते' अशी वाक्ये ऐकू येतात. मराठीतले उपान्‍त्य अक्षर दीर्घ असते या नियमाचा या इंग्रजी शब्दांच्या उच्चारणावर परिणाम झालेला दिसतो आहे. (याचीच अनुवृत्ती-फर्दर एक्सटेन्शन होऊन पीन कोड , बॅगची झीप असे चुकीचे उच्चार करायची प्रवृत्ती निर्माण होते.) प्रत्यक्षात डबल ओ चा दीर्घ उच्चारच करायला पाहिजे अशी स्थिती नाही.
वरील लेखात आणि त्याच्यावरील मनोगतावर आणि अन्य संस्थळावर प्रसिद्ध झालेल्या प्रतिसादांत अनेकांनी ओपन बूक असे अयोग्य लिखाण केले आहे.
डबल ओ असलेले काही इंग्रजी शब्द आणि त्यांचे मराठीत लिखाण आणि उच्चार :
बुक, टुक, लु‌क, शुक, गु‌ड, हु‌ड.
ब्लड, फ़्लड.
डोअर(अस्सल उच्चार डॉअर, किंवा डोऽर), फ्लोअर.
पुअर, बुअर .
फूड, बूट, लूप, लूज़, लूट, हूट, फूल‌, मून, सून.
परंतु वुड, वुडन, फ़ुट(पाऊल), फुटवेअर, वुल, वुलन.  
मराठीत बारा इंचाचे मोजमाप अशा अर्थाने लिहायचा शब्द मात्र फूट.