विजयजी,

तुम्ही जे म्हणताय ते अगदी १०० टक्के सत्य असले तरी ते या घडीला रोखठोकपणे मांडण्याची स्थिती नाही. याचे कारण आपण सगळेच आजूबाजूला पाहतो आहोत. आपले राजकीय नेते व कार्यकर्ते भ्रष्टाचाराच्या दलदलीत रुतले आहेत. तरुण पिढीने ज्यांचा आदर्श घ्यावा, असे कुणी समोर दिसत नाही. मध्यमवर्ग आत्मकेंद्रित आणि बदल घडवण्याप्रती उदासीन झाला आहे. आपल्याकडे नियोजन नाही, व्यवस्थापन नाही, समाजाप्रती उत्तरदायित्व नाही. एखाद्या युद्धात जितके सैनिक मरत नाहीत त्याच्या कित्येक पटीने गरीब शेतकरी कर्जबाजारी होऊन व्यसनांच्या आधीन होऊन आत्महत्या करून मरतात. प्रसारमाध्यमेही भ्रष्टाचाराचे आगर आणि धनदांडग्यांची कुरणे झाली आहेत. सामाजिक असुरक्षितता वाढत आहे. लाचलुचपत तर इतक्या भयानक पातळीला पोचली आहे (एका डॉक्टरच्या घरात १७०० कोटी रुपये आणि कित्येक टन सोने सापडते). गुन्हे करण्याची तितकीशी लाज वाटत नाहीय. कुणीही स्वार्थी नेता किंवा पैसेवाला बेरोजगार तरुणांची माथी भडकवू शकतो. आता असे असताना 'आपण कसे करंटे' असे जाहीर आसूड मारून घेण्याची ही वेळ आहे का? तुम्हीच विचार करा.

अहो आता शाळेच्या परीक्षेत नापास झाले किंवा वर्गात शिक्षक काही बोलले म्हणून खुशाल मरणाला कवटाळणारी कोवळी पोरे बघितली की मनात दाटून येते. अजाण वयातच जीवनाची लढाई हरणाऱ्यांना आपण हे असे सांगायचे का? जर वर्तमानातील आदर्श सांगण्याजोगे नसतील तर पूर्वजांच्या पराक्रमाचेच दाखले देणार ना? त्यांची साधीशी अपेक्षा आहे आपल्याकडून 'मोडली नाही पाठ, तुटला नाही कणा. पाठीवर हात ठेऊन फक्त लढ म्हणा' मग तेवढेही आपण करायचे नाही का? सायंकाळी अंधार पडल्यावर मुलांना भुताराक्षसाच्या गोष्टी सांगाव्यात, की एक निरांजन लाऊन रामरक्षा म्हणावी? यातील कशामुळे मुलांच्या मनात धीर निर्माण होईल? त्याचप्रमाणे आपल्याच समाजाबाबत नकारात्मक भावना बाळगण्याने त्यातून संशोधक, साहसवीर, कर्तृत्ववान व्यक्ती निर्माण होतील का?

'उत्कट भव्य तेचि घ्यावे, मिळमिळीत अवघे टाकावे' असे समर्थ रामदास सांगून गेले. ते आठवले तरी पुरेसे आहे.

बरं गंमतीखातर वादच घालायचाय तर माझ्या प्रश्नाचे उत्तर द्याल काय? (हे आपले खेळीमेळीत हं. कृपया आव्हान समजू नका.)

अमेरिकेत जसा एडिसन होऊन गेला तसा भारतातही गेल्या शतकात एक कल्पक आणि प्रचंड बुद्धिमान मराठी संशोधक होऊन गेला. ज्याच्या बुद्धिमत्तेमुळे ब्रिटिशांच्या पोटात दुखत होते. पण पुढे त्याच्याच कर्तृत्वाने भारावलेल्या इंग्रज आणि अमेरिकन संशोधकांनी त्याचा 'हिंदुस्थानचा एडिसन' म्हणून गौरविले. कोण होता हा माणूस?